
नवी दिल्ली : अरुणाचल प्रदेशमधील २७ ठिकाणांना नवीन नावे देण्याचा चीनचा ताजा प्रयत्न भारताने ठाम शब्दांत फेटाळला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्टपणे सांगितले की, ‘नावे बदलल्याने भौगोलिक वस्तुस्थिती बदलत नाही, अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि कायम राहील. भारत सरकारने चीनच्या या सर्व प्रयत्नांना नेहमीच स्पष्टपणे नाकारले आहे. भारताने वारंवार सांगितले आहे की, अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि चीनकडून काल्पनिक नावे देऊन त्या भूमीवर दावा सांगणे हे अवैध आणि अमान्य आहे.
चीनच्या नागरी उड्डाण मंत्रालयाने ११ ते १२ मे २०२५ रोजी अरुणाचल प्रदेशमधील २७ ठिकाणांची ‘नवीन नावे’ प्रसिद्ध केली होती. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, चीनकडून भारतीय राज्य असलेल्या अरुणाचल प्रदेशातील ठिकाणांना नवीन नावे देण्याचे निरर्थक व हास्यास्पद प्रयत्न सुरूच आहेत. आमच्या ठाम भूमिकेनुसार, आम्ही अशा प्रयत्नांना स्पष्टपणे नाकारतो. कल्पनाशक्तीने ठेवलेली नावे वास्तव बदलू शकत नाहीत. अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आणि घटक राज्य आहे आणि तो नेहमीच राहणार आहे.
यापूर्वीही चीनने अरुणाचल प्रदेशातील भूप्रदेशांवर दावा सांगत ‘प्रमाणित नावे’ जाहीर केली होती. एप्रिल २०२४ मध्ये चीनने अरुणाचल प्रदेशातल्या ३० ठिकाणांची नावे बदलली होती. यामध्ये अरूणाचल प्रदेशमधील १२ डोंगर, ४ नद्या, १ सरोवर, १ पर्वतमार्ग, ११ वसाहती आणि १ भूभाग यांचा समावेश होता. याआधी २०१७ मध्ये चीनने ६ ठिकाणांची नावे बदलण्याची पहिली यादी जाहीर केली होती. त्यानंतर २०२१ मध्ये १५ ठिकाणे आणि २०२३ मध्ये ११ ठिकाणांची नावे बदलण्याचे प्रयत्न झाले.