Saturday, September 6, 2025

जिल्ह्यातील गावांमध्ये पाणीटंचाईची समस्या

जिल्ह्यातील गावांमध्ये पाणीटंचाईची समस्या

२४ गावांतील ६१ वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा

रत्नागिरी : जिल्ह्यात सध्या ३ दिवस अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. असे असले तरी गावांमध्ये पाणीटंचाईची वाढतच आहे. सध्या पाणीटंचाईच्या वाड्यांनी अर्धशतक पार केले आहे. अवकाळी पाऊस पडत असला तरीही त्याचा जिल्ह्यातील पाणीटंचाईवर कोणताही परिणाम झालेला नाही. जिल्ह्यातील २४ गावातील ६१ वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. त्याचा फायदा १५ हजार ४७३ लोकांना होत आहे.

सर्वाधिक टंचाई तीव्रता रत्नागिरी तालुक्यात जाणवत आहे. तर गुहागर, दापोली, लांजा व राजापूर या चार तालुक्यांत प्रशासनाला अजूनही टँकरने पाणीपुरवठा करावा लागलेला नाही. उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. पारा ३४ ते ३६ अंश सेल्सिअसपर्यंत स्थिर आहे. आर्द्रतेमुळे उन्हाची काहिली अधिक जाणवत आहे. या परिस्थितीमुळे नद्या, नाल्यांमधील पात्र कोरडी पडलेली आहेत. विहिरींची पाणीपातळीही खालावली आहे. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. गावाच्या एका बाजूला डोंगरावर असलेल्या वाड्यांपर्यंत शासनाच्या जलजीवन मिशनमधील योजना अजूनही पोहोचलेल्या नाहीत. पाणीपुरवठ्याचे स्रोत नसल्यामुळे तिथे नळपाणी योजना राबवण्याचे आव्हानच आहे.

खेड, चिपळूण तालुक्यात ही परिस्थिती अधिक आहे. त्यामध्ये दहाहून अधिक धनगरवाड्यांचा समावेश आहे. येथील काही लोकांनी पाणी नसल्यामुळे स्थलांतर केले आहे, तर रत्नागिरी तालुक्यात खाडीकिनारी भागात मचूळ पाणी असल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झालेला आहे. यावर अजूनही प्रशासनाला तोडगा काढता आलेला नाही. तालुक्यात शिरगाव, नाचणे, सडामिऱ्या, सोमेश्वर, खेडशी, केळ्ये, कासारवेली या परिसरातील नागरिकांना टँकरने पाणी दिले जात आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा