
मनुष्यबळाची गरज लक्षात घेता एसटीत लवकरच विविध पदांची भरती
मुंबई : एसटीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी भविष्यात २५ हजार स्वमालकीच्या बसेस एसटी महामंडळ घेत आहे. या बसेस चालविण्यासाठी मनुष्यबळाची गरज लक्षात घेता चालक तथा वाहक पदांबरोबरच अन्य काही वर्गातील पदे येत्या काही वर्षांत एसटी महामंडळात भरती केली जाणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
याबाबतच्या ठरावाला नुकतीच संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली. एसटी महामंडळाची तत्कालीन आर्थिक परिस्थिती लक्षात घेता उच्च न्यायालयाने एसटी महामंडळातील नोकर भरतीला सन २०२४ पर्यंत मनाई केली होती.
तथापी, येत्या काही वर्षांमध्ये निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची लक्षणीय संख्या लक्षात घेता, नव्या बसेस चालवण्यासाठी चालक तथा वाहक या पदासह अन्य कर्मचारी व अधिकाऱ्यांची भरती करणे आवश्यक आहे. याबाबतच्या ठरावाला एसटी महामंडळाच्या ३०७ व्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली.
प्रताप सरनाईक परिवहन मंत्री
एसटीच्या सक्षमीकरणासाठी कुशल मनुष्यबळाबरोबरच तांत्रिकदृष्ट्या सक्षम अधिकाऱ्यांची भविष्यात एसटीला गरज भासणार असून त्या अनुषंगाने भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
शासनाच्या मंजुरीनंतरच भरती प्रक्रिया
सदर प्रस्ताव शासनाच्या मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे. नवीन आकृतीबंधाला मंजुरी घेण्यात येईल. त्यानुसार पुढील भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. नव्या नोकर भरतीच्या अानुषंगाने एसटीच्या प्रत्येक खात्यांनी आपल्या विभागातील रिक्त पदांचा फेर आढावा घेऊन आवश्यक असणाऱ्या पदांची भरती करणे संदर्भात एकत्रित मागणी सादर करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.
कुशल मनुष्यबळाचा अभाव
सध्या एसटी महामंडळाच्या अनेक विभागांमध्ये कुशल मनुष्यबळाचा अभाव आहे. अनेक ठिकाणी कुशल अधिकाऱ्यांची आवश्यकता असून, विशेषतः भविष्यात पीपीपी तत्त्वावर विकसित होणाऱ्या एसटीच्या जागेबाबतीत बांधकाम विभागाकडे कुशल अभियंत्यांची गरज भासणार आहे. त्यामुळे सध्या रिक्त असलेल्या अभियंत्यांच्या जागा करार पद्धतीने आणि सरळ सेवा भरतीच्या माध्यमांतून भरण्यात येणार आहेत.