
इस्लामाबाद : पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी केलेल्या पहलगाम हल्ल्याचा बदला म्हणून भारताने ऑपरेशन सिंदूर केले. पाकिस्तान व्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमधील अतिरेकी तळांना लक्ष्य करुन भारताने हल्ले केले. यानंतर पाकिस्तानने भारताच्या सैन्य तळांवर आणि नागरी वस्त्यांवर हल्ल्ल्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न अयशस्वी झाला. नंतर भारताने पाकिस्तानच्या सैन्य तळांना लक्ष्य करुन हल्ले केले. यापैकी एका हल्ल्यात पाकिस्तानचे ११ सैनिक ठार झाले. तसेच पाकिस्तानचे ७८ सैनिक जखमी झाले.
सुरुवातीला मौन बाळगणाऱ्या पाकिस्तानी लष्कराने अखेर भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानचे सैनिक ठार झाल्याची कबुली दिली. पाकिस्तानच्या इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्सने अर्थात आयएसपीआरने भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानचे ११ सैनिक ठार झाल्याचे आणि ७८ सैनिक जखमी झाल्याचे कबुल केले. आयएसपीआरने भारताच्या हल्ल्यात ठार झालेल्या पाकिस्तानच्या ११ सैनिकांची नावं जाहीर केली आहेत.
भारताच्या हल्ल्यात ठार झालेल्या पाकिस्तानच्या ११ सैनिकांची नावं
- नायक अब्दुल रहमान, भूदल
- लान्स नायक दिलावर खान, भूदल
- लान्स नायक इक्रामुल्ला, भूदल
- नायक वकार खालिद, भूदल
- शिपाई मुहम्मद अदिल अकबर, भूदल
- शिपाई निसार, भूदल
- स्क्वॉड्रन लीडर उस्मान युसुफ, हवाई दल
- मुख्य तंत्रज्ञ औरंगजेब, हवाई दल
- वरिष्ठ तंत्रज्ञ नजीब, हवाई दल
- कॉर्पोरल टेक्निशियन फारुख, हवाई दल
- वरिष्ठ तंत्रज्ञ मुबशीर, हवाई दल
ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताच्या हवाई हल्ल्यात १०० पेक्षा जास्त अतिरेकी ठार झाले. तसेच पाकिस्तान व्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमधील अतिरेक्यांचे तळ, अतिरेक्यांचे लाँचपॅड, ड्रोनचे लाँचपॅड आणि पाकिस्तानच्या सैन्य तळांचे प्रचंड नुकसान झाले.