Monday, May 12, 2025

रायगड

रायगड जिल्ह्यात ३९२ गावांत भूस्खलनाचा धोका

रायगड जिल्ह्यात ३९२ गावांत भूस्खलनाचा धोका

भूवैज्ञानिक सर्वेक्षणानुसार पोलादपूर-महाडमध्ये सर्वाधिक धोकादायक गावे


अलिबाग : भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाने केलेल्या सर्वेक्षणानुसार रायगड जिल्ह्यातील दरडप्रवण गावांमध्ये झालेली असून, ३९२ गावांत भूस्खलनाचा धोका निर्माण झालेला आहे. पैकी जिल्ह्यातील पोलादपूर व महाडमध्ये सर्वाधिक धोकादायक गावे आहेत. गेल्या पंचवीस वर्षांपासून दरवर्षीच्या पावसाळ्यातील भूस्खलन आणि दरडी कोसळण्याच्या नैसर्गिक आपत्तीमुळे दरडप्रणव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रायगड जिल्ह्यात भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाने केलेल्या सर्वेक्षणानुसार जिल्ह्यात काहीठिकाणी दरडी कोसळण्याचा संभाव्य धोका असणाऱ्या गावांच्या संख्येत यंदा मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. गतवर्षी दरडी कोसळण्याचा संभाव्य धोका असणाऱ्या गावांची संख्या १०३ होती. त्यामध्ये यावेळी तब्बल २८९ ने वाढ होऊन यंदा दरडी कोसळण्याचा संभाव्य धोका असणाऱ्या गावांची संख्या ३९२ झाली आहे.


भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाने केलेल्या सर्वेक्षणानुसार संभाव्य धोकादायक या ३९२ गावांमधील सर्वाधिक १४० गावे पोलादपूर तालुक्यात, तर त्या खालोखाल १२१ धोकादायक गावे महाड तालुक्यात आहेत. जिल्ह्याच्या उर्वरित तालुक्यांपैकी माणगाव तालुक्यात २२, रोहा तालुक्यात २०, म्हसळा तालुक्यात १४, पेण तालुक्यात १३, श्रीवर्धन तालुक्यात १२, खालापूर तालुक्यात १२, अलिबाग, मुरुड व सुधागड तालुक्यात प्रत्येकी ९, कर्जत तालुक्यात ५, तर पनवेल व तळा तालुक्यात प्रत्येकी तीन गावे आहेत. दरम्यान, ३९२ संभाव्य धोकादायक गावे ही एकूण धोका तीव्रतेच्या पाच वर्गवारीत आहेत. यामध्ये सर्वाधिक धोका असणाऱ्या पहिल्या वर्गात १८, दुसऱ्या वर्गात ७१, तिसऱ्या वर्गात १५९, चौथ्या वर्गात ४९, तर पाचव्या वर्गात २२ गावांचा समावेश आहे.


गेल्या २५ वर्षांपासून सातत्याने होत असलेल्या दरडी कोसळण्याच्या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर भूवैज्ञानिकांनी केलेल्या सर्वेक्षणात गावांची संख्या लक्षात घेवून रायगड जिल्हा आपत्ती निवारण प्राधिकरणाच्या माध्यमातून येत्या पावसाळ्यातीस संभाव्य नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी प्रशासनानेही जय्यत तयारी केली आहे. महाड व पोलादपूर हे दोन अतिदुर्गम तालुके आहेत. पावसाळ्यात जिल्ह्यात सरासरी तीन हजार मिलीमीटर पाऊस पडतो. अतिवृष्टीमुळे डोंगरातील मातीची दरड कोसळण्याची शक्यता निर्माण होते. त्यामुळे दरडप्रवण क्षेत्रात राहणाऱ्या ग्रामस्थांचे प्रशाससनाकडून स्थलातर
करण्यात येते.



जिल्हा नियंत्रण कक्षातून एकाचवेळी याठिकाणी हवामान पूर्वसुचना प्रसारित करण्यात येणार आहेत, तसेच आपत्तीकाळात थेट संदेश प्रसारित होणार आहे. धोकादायक ठिकाणी सायरनची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्ह्यातील वर्ग एक व दोन अशा धोकादायक असणाऱ्या ९१ गावांना संपर्कासाठी सार्वजनिक उद्घोषणा प्रणाली देण्यात आली आहे. या प्रणालीसाठी इन्व्हर्टर बॅटरीही देण्यात आल्या आहेत.


नैसर्गिक आपत्तीचा धोका असणाऱ्या ४०० गावांना आपत्ती व्यवस्थापन किट पाठविण्यात आले आहेत. किटमध्ये ३० हून अधिक वस्तू असणारी तरंगणारी प्रथमोपचार पेटी आहे. त्यात सीपीआर मास्क, बँडेज, नेक बेल्ट, सेफ्टी गॉगल, टॉर्च, शोध व बचाव दिवा, टूल किट, वेगवेगळे दोरखंड, हेल्मेट, हॅन्डग्लोज, लाईफजॅकेट, गमबूट, तरंगणारे व फोल्डिंग स्ट्रेचरचा समावेश आहे.

Comments
Add Comment