
भारताची ठाम भूमिका – तिसऱ्या पक्षाची गरज नाही, काश्मीर आमचाच!
नवी दिल्ली : “काश्मीर हे भारताचे केंद्रशासित क्षेत्र आहे आणि त्यावर कोणत्याही तृतीय पक्षाच्या मध्यस्थीला भारत संमती देणार नाही,” अशा ठाम शब्दांत परराष्ट्र मंत्रालयाने पुन्हा एकदा जगाला भारताची भूमिका स्पष्ट केली आहे. पाकिस्तानच्या अलीकडील वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी ठामपणे सांगितले की, “भारत आणि पाकिस्तानमधील सर्व प्रश्न हे केवळ द्विपक्षीय पातळीवरच सोडवले जातील.”
जयस्वाल म्हणाले, “दहशतवाद पोसणाऱ्या देशाला वाटतं की तो यातून मोकळा होईल, तर ती भ्रमाची दुनिया आहे. भारताने नष्ट केलेली दहशतवादी केंद्रे ही जगभरातील निष्पाप लोकांच्या मृत्यूस जबाबदार होती. पाकिस्तानने हे जितकं लवकर समजून घेतलं, तितकं चांगलं!”
ते पुढे म्हणाले, “पाकिस्तानने बेकायदेशीररीत्या व्यापलेला भारतीय भूभाग रिकामा करणं हाच खरा मुद्दा आहे. आम्ही कोणत्याही दबावाला किंवा हस्तक्षेपाला भीक घालत नाही.”
दरम्यान, ऑपरेशन सिंदूरनंतर अमेरिका आणि भारत यांच्यात झालेल्या चर्चांमध्ये व्यापाराचा कोणताही मुद्दा उपस्थित करण्यात आलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.