
अमेरिकेने देशाच्या सुरक्षेचे कारण देत स्टील आणि अॅल्युमिनियमवर २५ टक्के आयात शुल्क लागू केले आहे. पण या निर्णयामुळे भारत अमेरिकेला निर्यात करत असलेल्या ७७.६ अब्ज डॉलरच्या मालाच्या किंमतीत वाढ होणार आहे. भारतीय उत्पादनांवर थेट १.९१ अब्ज डॉलरचा भार पडणार आहे. भारताच्या निर्यात व्यापारात घट होण्याचा धोका आहे. यामुळे भारताने जागतिक व्यापार संघटनेच्या नियमांचा आधार घेतला आहे. भारत सरकारने जागतिक व्यापार संघटनेकडे आयात शुल्कांचा नवा प्रस्ताव पाठवला आहे. या प्रस्तावानुसार अमेरिकेच्या निर्णयाला उत्तर म्हणून देशहिताच्या रक्षणासाठी भारत अमेरिकेच्या निवडक उत्पादनांवर आयात शुल्क वाढवून नुकसान भरपाई वसूल करणार आहे.
याआधी २०१८ मध्ये अमेरिकेने स्टील आणि अॅल्युमिनियम संदर्भातले स्वतःचे आयात धोरण बदलले होते. त्यावेळी भारताने नुकसान भरपाईसाठी अमेरिकेतून भारतात येणाऱ्या २८ उत्पादनांवर वाढीव आयात शुल्क अर्थात टॅरिफ लागू केले होते.