Saturday, September 13, 2025

‘ज्या दिवशी वाटेल की, मी संघाला मदत करत नाही तेव्हा निवृत्त होईन’

‘ज्या दिवशी वाटेल की, मी संघाला मदत करत नाही तेव्हा निवृत्त होईन’

निवृत्तीवरून रोहित शर्माची स्पष्टोक्ती

मुंबई : भारताचा कर्णधार रोहित शर्माने ८ मे रोजी कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. तेव्हापासून त्याच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील भविष्याबद्दल प्रश्न उपस्थित केले जात होते. आता त्यावर रोहितने स्पष्ट शब्दांत उत्तर दिले आहे. रोहितने एका मुलाखतीत बोलताना म्हटले की, पूर्वी मी १० षटकांमध्ये ३० चेंडू खेळायचो आणि फक्त १० धावा करायचो, पण आता जर मी २० चेंडू खेळलो तर मी ३०, ५० किंवा ८० धावा करू शकत नाही का? मी ते केले आहे, मला जितक्या धावा करायच्या होत्या त्या मी केल्या आहेत. आता, मला वेगळ्या पद्धतीने क्रिकेट खेळायचे आहे.

मी काहीही हलक्यात घेत नाही. असे समजू नका की गोष्टी अशाच चालतील, मी २० किंवा ३० धावा करत राहीन आणि खेळत राहीन. ज्या दिवशी मला वाटेल की मी मैदानावर जे करायचे आहे ते करू शकत नाही, त्या दिवशी मी खेळणे थांबवेन. ते नक्की आहे, पण सध्या, मला माहीत आहे की मी जे करत आहे ते अजूनही संघाला मदत करत आहे. रोहितने पुढे असेही म्हटले की, जरी टी-२० विश्वचषक जिंकला नसता तरी मी निवृत्त झालो असतो. कारण मी खूप प्रयत्न केले होते आणि टी-२० विश्वचषकानंतर पुढे जाणे माझ्यासाठी योग्य नव्हते. तुम्हाला इतरांनाही संधी द्यावी लागेल, पण जिंकल्यानंतर तुम्हाला असे वाटते की तुमच्यात अजूनही काहीतरी शिल्लक आहे.

Comments
Add Comment