
यंदा ११ मे ला ‘नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर’ मध्ये झालेल्या शुभारंभाच्या प्रयोगाला नाट्यरसिकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला. नृत्य,संवाद आणि अभिनय यांचा उत्तम मिलाफ असलेली “एक तिची गोष्ट” चा पुढील प्रयोग शनिवार १७ मे रोजी पुण्याच्या भारत नाट्य मंदिर येथे रात्रौ ९.३० वा. आणि शनिवार २४ मे रोजी रात्रौ ८.३० वा. श्री शिवाजी मंदिर दादर येथे होणार आहे.
मनमोहक नृत्य, त्याला अर्थपूर्ण संगीताची आणि उत्तम अभिनय, निवेदनाची जोड मिळाल्यावर उभी राहणारी सुंदर कलाकृती आनंदाची अनुभूती देऊन जाते, हीच अनुभूती “एक तिची गोष्ट” च्या माध्यमातून नाट्यरसिकांना मिळणार आहे. या सृजनशील कलाकृतीचं खास आकर्षण म्हणजे फुलवा खामकर आणि त्यांची मुलगी आस्मा खामकर यांच्या नृत्याची अदाकारी रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. अभिनेता विराजस कुलकर्णी, सूरज पारसनीस यांनी याचे दिग्दर्शन केले आहे.आर्या आंबेकर, वैशाली सामंत, ऋषिकेश रानडे यांनी यातील गाणी स्वरबद्ध केली आहेत. संगीत निषाद गोलांब्रे यांचे आहे. चाळीशीतली अनया आणि तिच्या आयुष्यात आलेली एक किशोरवयीन मुलगी या दोघींच्या भावविश्वातून या नृत्यनाटिकेची कथा उलगडते.
येत्या काळात मराठी कला, साहित्य आणि संस्कृती सर्वदूर पोहोचवणं हे ‘मधुसूदन कालेलकर प्रॉडक्शन्स’चं उद्दिष्ट असल्याचं गौरी कालेलकर-चौधरी यांनी सांगितलं. भविष्यात वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या व विषयाच्या माध्यमातून सांस्कृतिक उपक्रम राबवणार असून ज्यात कला संस्कृतीपासून तरुणांच्या कल्पनाशक्तीला, सृजनशक्तीला वाव देण्याचा प्रयत्न असल्याचे गौरी कालेलकर-चौधरी यांनी सांगितले.