
रोमानिया : विद्यमान वर्ल्ड चॅम्पियन डी गुकेशला फ्रान्सच्या मॅक्झिम वॉशियर लॅग्रेव्हकडून सुपरबेट क्लासिक बुद्धिबळ स्पर्धेच्या चौथ्या फेरीत धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला. गुकेशला येथे अग्रमानांकन मिळाले असून तोच संभाव्य विजेता असल्याचे मानले जात आहे.
आतापर्यंतच्या चार फेऱ्यांत त्याला एकही विजय मिळविता आलेला नाही. स्पर्धेच्या अजून पाच फेऱ्या बाकी आहेत. आर. प्रज्ञानंद व स्थानिक खेळाडू डीक बोग्डन-डॅनियल यांचा सामना अनिर्णीत राहिला तर अमेरिकेच्या लेव्हॉन अॅरोनियनने पहिला विजय नेंदवताना पोलंडच्या डुडा जान क्रीस्तॉफचा पराभव केला.
अन्य सामन्यात अमेरिकेचा फॅबियानो कारुआना व उझ्बेकचा नोदिरबेक अब्दुसत्तोरोव्ह आणि फ्रान्सचा फिरोझा अलिरेझा व अमेरिकेचा वेस्ली सो यांचे डावही अनिर्णीत राहिले.
कारुआना, प्रज्ञानंद व वॉशियर लॅग्रेव्ह प्रत्येकी २.५ गुणांसह संयुक्त आघाडीवर आहेत तर अलिरेझा, वेस्ली सो, अॅरोनियन व डीक बोग्डन-डॅनियल २ गुणांसह त्यांच्या पाठोपाठ आहेत. गुकेश व डुडा सध्या १.५ गुणांसह संयुक्त आठव्या स्थानावर आहे.