Monday, May 12, 2025

सोमवारपासून अभयारण्यात पक्षांच्या गणनेस सुरुवात

सोमवारपासून अभयारण्यात पक्षांच्या गणनेस सुरुवात

कर्नाळा परिसरात आज पर्यटकांना प्रवेश बंदी


पनवेल : बौद्धपौर्णिमेच्या रात्री कर्नाळा पक्षी अभयारण्यात निसर्गानूभव कार्यक्रम २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे सोमवार आणि मंगळवार या दोन दिवशी या कार्यक्रमासाठी अभयारण्य परिसरात पर्यटकांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. निसर्गअनुभव कार्यक्रमासाठी अभयारण्यातील ३ ठिकाणी पाणवठ्यांवर ३ मंचान उभारण्यात आले आहे. या कार्यक्रमादरम्यान ट्रॅप कॅमेऱ्याच्या साहाय्याने पाणवठ्यावर येणाऱ्या पक्षी आणि प्राण्यांचे फोटो संग्रहीत करून त्यांच्या संख्येची गणना करण्यात येणार असल्याची माहिती वनशेत्रपाल नारायण राठोड यांनी दिली आहे.


मुंबई-गोवा महामार्गावर पनवेलपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कर्नाळा पक्षी अभयारण्यात विविध प्रजातीच्या वृक्षांसोबतच पशु-पक्षांचे वास्तव्य आहे. वैशाख शुक्ल पौर्णिमा म्हणजेच बुद्ध पौर्णिमा ही उन्हाळ्याच्या दिवसातील सर्वाधिक प्रकाशमान रात्र असते. वैशाख महिन्यात उन्हाच्या झळा तीव्र असतात. त्यामुळे अरण्यातील प्राणी पाणी पिण्यासाठी हमखास पाणवठ्यावर येतात. त्यामुळे बौद्ध पौर्णिमेच्या दिवशी पडणाऱ्या प्रखर चांदण्याच्या प्रकाशात देशभरातील अभयारण्यात प्राणी आणि पक्षी गणनेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. या प्रक्रियेला शास्त्रीय पुरावा नसल्याने या कार्यक्रमाचे आता ‘निसर्गानुभव’ कार्यक्रम असे नामकरण करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे यंदादेखील कर्नाळा पक्षी अभयारण्यात सोमवारी निसर्गानुभव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कर्नाळा पक्षी अभयारण्य परीसरातील कल्हे येथील दोन तर आपटा येथील एका पाणवट्यावर मंचाण तयार करण्यात आले आहे. प्रत्येक मंचाणावर दोन कर्मचारी बसणार असून, त्यांच्यासोबत प्राणी गणनेसाठी उपस्थित राहणाऱ्या निसर्गप्रेमी संस्थांचे सदस्य देखील असणार आहेत.



निसर्गानुभव कार्यक्रमात वेश्वी येथील केयर ऑफ नेचर संस्थेचे २,चिरनेर येथील फ्रेंड्स ऑफ नेचर संस्थेचे दोन तर पनवेल येथील स्नेक अँड ऍनिमल रेस्न्यू संस्थेचे २ सदस्य सहभागी होणार आहेत. त्याचसोबत नियंत्रण अधिकारी म्हणून कर्नाळा वनपरिशेत्र अधिकारी आणि समन्वय अधिकारी म्हणून कल्हे वनपाल जवाबदारी सांभाळणार आहेत. तसेच, २ वनपाल आणि ४ वनसरक्षकांचा देखील यात सहभाग असणार आहे. सोमवारी दुपार ते मंगळवार दुपारपर्यंत २४ तास निसर्गानुभव कार्यक्रमादरम्यान पाणवठ्यावर येणाऱ्या प्राण्यांचे आणि पक्षांचे निरीक्षण करण्यात येणार आहे. या करता ट्रॅप कॅमेऱ्यात कैद छायाचित्र आणि पाऊल खुणांचा अभ्यास करण्यात येणार आहे.

Comments
Add Comment