Monday, May 12, 2025

नवी मुंबई

नवी मुंबई परिसरातील जोडणी मार्गांचे काम जूनमध्ये होणार पूर्ण

नवी मुंबई परिसरातील जोडणी मार्गांचे काम जूनमध्ये होणार पूर्ण

नवी मुंबई : सिडको आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला पश्चिमेकडून जोडणी करण्याकरिता पश्चिम प्रवेश आंतरबदलाचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम जूनमध्ये पूर्ण होणे अपेक्षित आहे. पश्चिम प्रवेश आंतरबदलाद्वारे आम्र मार्ग आणि उलवे किनारी मार्ग येथून विमानतळाकडे ये-जा करणारी वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.



नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा पहिला टप्पा परिचालनाच्या मार्गावर आहे. या विमानतळाला उत्तमप्रकारे जोडले जावे, याकरिता त्या परिसराच्या परिघातील महत्त्वाच्या मार्गांना विमानतळाशी जोडण्याकरिता परिधीय मार्गांचे नियोजन करण्यात येत आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा बंदर जोडणी कार्यक्रम हा त्यातील एक महत्त्वाचा भाग असल्याचे सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी सांगितले. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिघातील महत्त्वाचे मार्ग आणि विमानतळ या दरम्यान व्यवस्थितरीत्या जोडले जावे, यासाठी याकरिता सिडकोतर्फे काही कनेक्टिव्हिटी प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. अटल सेतू ते विमानतळ दरम्यान अशी जोडणी निर्माण करण्याकरिता उलवे किनारी मार्ग नियोजित आहे. तसेच आम्र मार्ग आणि उलवे किनारी मार्ग येथून विमानतळाकडे ये-जा करणारी वाहतूक सुरळीतरीत्या चालावी, याकरिता एमजेपीआरसीएल प्रकल्पांतर्गत विमानतळ पश्चिम प्रवेश आंतरबदल मार्गाचा समावेश करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे, विमानतळाच्या पूर्व बाजूस राष्ट्रीय महामार्ग ४ बी सोबत जोडणीसाठी पूर्व प्रवेश आंतरबदल मार्गाचा देखील समावेश करण्यात आला आहे. उन्नत विमानतळ जोड रस्त्याला जोडला गेला आहे. याशिवाय आंतरबदल मार्गावर दोन लूप आणि दोन रैम्प यांचा समावेश आहे.

Comments
Add Comment