
मुंबई : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव निवळण्याची चिन्ह दिसताच भारतीय शेअर बाजार वधारला. गुंतवणूकदारांमध्ये शेअर खरेदीचा उत्साह दिसू लागला. बीएसई सेन्सेक्स २३५० .४२ गुणांनी वधारला आणि ८१,८०४.८९ गुणांवर जाऊन पोहोचला. गुंतवणूकदारांच्या उत्साहामुळे बीएसई सेन्सेक्स २.९६ टक्क्यांनी वधारला. तणाव निवळण्याचे सकारात्मक परिणाम एनएसईच्या निफ्टीतही दिसून आले. निफ्टी फिफ्टी ७२८.२५ गुणांनी वधारला आणि २४,७३६.२५ गुणांवर जाऊन पोहोचला. गुंतवणूकदारांच्या उत्साहामुळे निफ्टी फिफ्टी ३.०३ टक्क्यांनी वधारला.
याआधी २२ एप्रिल रोजी पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी पहलगाम येथे २६ नागरिकांची हत्या केली. यापैकी २५ भारतीय होते आणि एक नेपाळी होता. ठार मारलेल्या २६ जणांपैकी २५ जणांना फक्त हिंदू आहेत म्हणून ठार करण्यात आले होते. नाव आणि धर्म विचारुन त्यांना अतिरेक्यांनी निष्ठुरपणे ठार केले होते. यावेळी मध्यस्तीचा प्रयत्न केला म्हणून एका स्थानिक मुसलमानाला ठार करण्यात आले होते. या घटनेनंतर ७ मे रोजी भारताने पाकिस्तान व्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमध्ये हवाई हल्ले करुन अतिरेक्यांचे नऊ तळ नष्ट केले होते. भारताची कारवाई ही फक्त अतिरेक्यांच्या विरोधात होती. पण पाकिस्तानने थेट भारताच्या नागरी वस्त्यांवर आणि सैन्य तळांवर हवाई हल्ले करण्याचा प्रयत्न केला. भारताने पाकिस्तानचे हल्ले परतवले. नंतर भारताने पाकिस्तानच्या ११ हवाई तळांवर तसेच अतिरेक्यांच्या निवडक लाँचपॅडवर हल्ले करुन ते निकामी केले. भारत जोरदार कारवाई करत आहे आणि आपण बचाव करण्यास असमर्थ आहोत, याची जाणीव होताच पाकिस्तानने भारतापुढे शस्त्रसंधीचा प्रस्ताव ठेवला. भारताने हा प्रस्ताव स्वीकारत १० मे रोजी संध्याकाळी पाच वाजल्यापासून शस्त्रसंधीला सहमती दर्शवली. लष्करी संकेतानुसार शस्त्रसंधी झाल्यानंतर दोन्ही देशांच्या डीजीएमओंनी चर्चा करुन पुढील कारवाईचे निर्णय घ्यायचे असे ठरले. आता सोमवार १२ मे रोजी दुपारी बारा वाजता भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचे डीजीएमओ चर्चा करणार आहेत. चर्चा यशस्वी झाली तर शस्त्रसंधी कायम राहील. पण चर्चा अयशस्वी झाली तर पुन्हा संघर्ष सुरू होण्याची शक्यता आहे. पण रविवारच्या रात्रीपासून सोमवारी अद्यापपर्यंत सीमेवर गोळीबाराचे वृत्त नाही. यामुळे तणाव निवळणार अशी चर्चा गुंतवणूकदारांमध्ये सुरू आहे. याचाच सकारात्मक परिणाम शेअर बाजारत दिसला.
शेअर बाजार वधारण्याची प्रमुख कारणे
- भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यानचा तणाव निवळण्याची शक्यता
- भारत आणि इंग्लंड यांच्यात मुक्त व्यापार करार
- परकीय गुंतवणूकदारांनी भारतात मोठ्या प्रमाणात केलेली गुंतवणूक
- एप्रिल २०२५ मध्ये म्युच्युअल फंडांद्वारे भारतीय शेअर बाजारात २६ हजार ६३२ कोटी रुपयांची गुंतवणूक
- अमेरिकेमुळे सुरू झालेले टॅरिफ वॉर शांत होण्याची शक्यता, अमेरिका आणि चीन यांच्यात होणार चर्चा
- रशिया आणि युक्रेन यांच्या दरम्यान झालेली युद्धबंदी, युरोपशी आणि युरोपद्वारे होणारा आंतरराष्ट्रीय व्यापार सुरळीत होण्याची शक्यता