
उत्तर प्रदेश : भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने केवळ पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले नाहीत, तर जनतेच्या मनात एक गडद लाल ठसा उमटवला आहे. आज तो 'सिंदूर' एक कारवाई नसून भावना बनली आहे. याचे सुंदर उदाहरण पाहायला मिळाले आहे उत्तर प्रदेशातील कुशीनगर जिल्ह्यात.
२२ एप्रिल रोजी पहलगामजवळ बैसरन भागात दहशतवाद्यांनी केलेल्या भीषण गोळीबारात २६ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला. या हल्ल्याच्या प्रत्युत्तरात भारतीय लष्कराने 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकिस्तानातील ९ दहशतवादी अड्ड्यांचा नाश केला. त्यानंतर पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यालाही भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिले.
या पराक्रमाच्या प्रेरणेतून, कुशीनगर जिल्ह्यातील मेडिकल कॉलेजमध्ये १० व ११ मे रोजी जन्मलेल्या १७ नवजात मुलींना 'सिंदूर' हे नाव देण्यात आले आहे. मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर. के. शाही यांनी ही माहिती दिली. हे नाव आता शौर्य, त्याग आणि देशप्रेमाचे प्रतीक ठरत आहे.
या घटनेमुळे स्पष्ट होते की, केवळ सीमेवर नव्हे, तर सामान्य नागरिकांच्याही हृदयात 'देशभक्ती'चा रंग भरलेला आहे. 'सिंदूर' आता लढाईचे नाव नाही, तर नव्या पिढीचा आत्मगौरव आहे.