
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवार १२ मे रोजी रात्री आठ वाजता देशाला संबोधित करणार आहेत. याआधी पंतप्रधान मोदी यांनी जेव्हा अचानक देशाला संबोधित केले त्यावेळी एखादा मोठा निर्णय घेतला आहे. नोटाबंदी, कोविड संकटाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर करणे, कृषी कायदे मागे घेणे हे तीन मोठे निर्णय पंतप्रधान मोदी यांनी देशाला अचानक संबोधित करत जाहीर केले होते. यामुळे आता पंतप्रधान रात्री आठ वाजता काय बोलणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे. सध्या भारत आणि पाकिस्तान दरम्यान तणावाचे वातावरण आहे. सीमेवर सैन्य हाय अलर्टवर आहे. यामुळे पंतप्रधान या तणावाशी संबंधित मुद्यांवर बोलण्यासाठी देशाला संबोधित करण्याची शक्यता जास्त आहे.
पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी पहलगाममध्ये २२ एप्रिल २०२५ रोजी २६ नागरिकांची हत्या केली. यापैकी २५ भारतीय होते आणि एक नेपाळी होता. ठार मारलेल्या २६ जणांपैकी २५ जणांना फक्त हिंदू आहेत म्हणून ठार करण्यात आले होते. नाव आणि धर्म विचारुन त्यांना अतिरेक्यांनी निष्ठुरपणे ठार केले होते. यावेळी मध्यस्तीचा प्रयत्न केला म्हणून एका स्थानिक मुसलमानाला ठार करण्यात आले होते. या घटनेनंतर ७ मे रोजी भारताने पाकिस्तान व्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमध्ये हवाई हल्ले करुन अतिरेक्यांचे नऊ तळ नष्ट केले होते. भारताची कारवाई ही फक्त अतिरेक्यांच्या विरोधात होती. पण पाकिस्तानने थेट भारताच्या नागरी वस्त्यांवर आणि सैन्य तळांवर हवाई हल्ले करण्याचा प्रयत्न केला. भारताने पाकिस्तानचे हल्ले परतवले. नंतर भारताने पाकिस्तानच्या ११ हवाई तळांवर तसेच अतिरेक्यांच्या निवडक लाँचपॅडवर हल्ले करुन ते निकामी केले. भारत जोरदार कारवाई करत आहे आणि आपण बचाव करण्यास असमर्थ आहोत, याची जाणीव होताच पाकिस्तानने भारतापुढे शस्त्रसंधीचा प्रस्ताव ठेवला. भारताने हा प्रस्ताव स्वीकारत १० मे रोजी संध्याकाळी पाच वाजल्यापासून शस्त्रसंधीला सहमती दर्शवली. लष्करी संकेतानुसार शस्त्रसंधी झाल्यानंतर दोन्ही देशांच्या डीजीएमओंनी चर्चा करुन पुढील कारवाईचे निर्णय घ्यायचे असे ठरले. आता सोमवार १२ मे रोजी संध्याकाळी भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचे डीजीएमओ चर्चा करणार आहेत. चर्चा यशस्वी झाली तर शस्त्रसंधी कायम राहील. पण चर्चा अयशस्वी झाली तर पुन्हा संघर्ष सुरू होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी देशाला संबोधित करणार आहेत.