Monday, May 12, 2025

देशब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वी! भारताची ‘तयारी पाहून’ पाकिस्तान हादरला; तीनही दलांचा पाकिस्तानला खणखणीत इशारा

‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वी! भारताची ‘तयारी पाहून’ पाकिस्तान हादरला; तीनही दलांचा पाकिस्तानला खणखणीत इशारा

नवी दिल्ली : पहलगाम येथील हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत दहशतवाद्यांवर तुफान हल्ला चढवत पाकिस्तानला जबरदस्त प्रत्युत्तर दिले. यावेळी भारतीय लष्कराच्या तिन्ही दलांनी एकत्र येत शक्तीप्रदर्शन करताना स्पष्ट केले की, “भारत सज्ज आहे... आणि गरज भासली तर पुन्हा हल्ला करण्यास मागेपुढे पाहणार नाही!”


एअर मार्शल ए. के. भारती यांनी स्पष्टपणे सांगितले, “आपली लढाई पाकिस्तानशी नव्हे, तर दहशतवाद्यांशी आहे. पण पाकिस्तानने त्यांना पाठीशी घालून ही लढाई स्वतःवर घेतली आणि आता त्याला त्याची किंमत मोजावी लागेल.”


भारतीय लष्कराने ७ मे रोजी पहाटे पाकिस्तानने पाठवलेले ड्रोन उद्ध्वस्त केले. त्यानंतर ड्रोन, क्षेपणास्त्रे आणि दहशतवादी तळांवर हल्ला करून भारताने आपली सैन्यताकद दाखवून दिली. “पाकिस्तानचे पाप पहलगामपर्यंत भरले होते... आता त्याचा शेवट झाला आहे,” असे लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी सांगितले.


भारतीय नौदलानेही एकाच वेळी हवाई, जमीन व समुद्रातील हालचालींवर बारीक लक्ष ठेवत पाकिस्तानचे प्रयत्न निष्फळ ठरवले. “सर्व सिस्टम आणि लष्करी तळ पुढील मोहिमेसाठी सज्ज आहेत,” असा कडक इशाराच व्हाइस अॅडमिरल ए. एन. प्रमोद यांनी दिला.



“एअर डिफेन्स सिस्टम अभेद्य आहे. पाकिस्तानने डागलेली क्षेपणास्त्रे फसली आणि आमच्या एकाही तळावर धक्का लागू दिला नाही,” अशी माहिती देत एअर मार्शल भारती यांनी ऑपरेशन सिंदूरचे फोटो व व्हिडिओही दाखवले.


लेफ्टनंट जनरल घई यांनी म्हटले की, मी बीएसएफ जवानांचेही कौतुक करेल. कारण, जागता पहारा देणारे जवान या मोहिमेत मोठ्या हिंमतीने आमच्यासोबत उभे राहिले, त्यामुळे पाकिस्तानच्या नापाक कृत्यांचा नायनाट करण्यात आला.


शेवटी लेफ्टनंट जनरल घई यांनी "जब हौसले बुलंद हों, तो मंजिलें भी कदम चूमती हैं..." अशी शायरी करत जवानांच्या शौर्याला सलाम केला.

Comments
Add Comment