
मुंबई : भारत-पाकिस्तान यांच्यात तात्पुरत्या शस्त्रसंधीच्या घोषणेनंतर निर्माण झालेल्या आश्वासक वातावरणाचा सकारात्मक परिणाम सोमवारी शेअर बाजारावर दिसून आला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स तब्बल २९७५.४३ अंशांनी उसळून ८२,४२९.९० वर बंद झाला. ही पातळी सेन्सेक्सने पाच महिन्यांनंतर प्रथमच गाठली, याआधी १६ डिसेंबर २०२४ रोजी सेन्सेक्सने ही उंची गाठली होती.
नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टीही ९१६.७० अंशांनी वधारून २४,९२४.७० वर बंद झाला. बाजारात सकाळपासूनच तेजीचा माहोल होता. सेन्सेक्सने ८०,८०३.८० वर मजबूत सुरुवात केली आणि दिवसभरात ३०४१ अंशांची कमाल उसळी घेत ८२,४९५.९७ पर्यंत पोहोचला. यानंतर तो ८२,४२९.९० वर स्थिरावला.
भारत-पाकिस्तान दरम्यान झालेल्या तात्पुरत्या शस्त्रसंधीचा तसेच अमेरिका-चीन व्यापार चर्चेत झालेल्या सकारात्मक प्रगतीचा शेअर बाजारावर सकारात्मक परिणाम झाला. यामुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढला.
सर्व क्षेत्रांमध्ये तेजी
सर्वच क्षेत्रातील शेअर्स हिरव्या चिन्हात बंद झाले. आयटी क्षेत्रात सर्वाधिक ६.७४% वाढ झाली. त्यानंतर रिअल्टी क्षेत्रात ५.८७%, टेक्नॉलॉजीत ५.२१% आणि मिड कॅपमध्ये ३.८५%, स्मॉल कॅपमध्ये ४.१८% इतकी वाढ नोंदली गेली.
३० पैकी २८ शेअर्स वधारले :
सेन्सेक्सच्या ३० पैकी २८ शेअर्सने वाढ नोंदवली.
इन्फोसिस : ७.६७% वाढून ₹१६२३
एचसीएल टेक्नॉलॉजीज : ५.९७% वाढून ₹१६६३.७०
टाटा स्टील : ५.६४% वाढून ₹१५०.८०
ईटरनल : ५.५१% वाढून ₹२३९.४५
टीसीएस : ५.४२% वाढून ₹३६२८.८०
घसरणीचे शेअर्स :
इंडसइंड बँक : ३.३८% घसरण, ₹७९०.२०
सन फार्मा : ३.१४% घसरण, ₹१६९०
जागतिक बाजारातही तेजी
अमेरिकन आणि युरोपीय शेअर बाजारही मजबूत दिसले. आशियाई बाजारात देखील तेजी होती – तैवान वेटेड १.०२%, कोस्पी १.१५%, तर शांघाय कम्पोझिट ०.८१% ने वधारले.
भारत-पाकिस्तान दरम्यान शांततेचा सूर, आंतरराष्ट्रीय व्यापारातील सकारात्मक हालचाली आणि देशांतर्गत मजबूत गुंतवणूक भावनांमुळे बाजारात तेजीतून नवा आत्मविश्वास दिसून आला.