
पाकिस्तानने रहीम यार खान नूर एअरबेस सात दिवसांसाठी बंद केल्याचे नोटॅम (नोटीस टू एअरमन) जारी केले आहे. हा नोटॅम म्हणजे भारताच्या हवाई हल्ल्यात रहीम यार खान नूर एअरबेसचे मोठे नुकसान झाल्याचा पाकिस्तानकडून देण्यात आलेला अप्रत्यक्ष पुरावा असल्याची चर्चा आहे. कारण रहीम यार खान नूर एअरबेस हा पाकिस्तानसाठी सामरिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा आहे. भारत - पाकिस्तान दरम्यान संघर्ष थांबताच हा एअरबेस बंद करण्यात आला आहे. याचा अर्थ भारताच्या हवाई हल्ल्यात या एअरबेसचे प्रचंड नुकसान झाले आहे. जर हे नुकसान झाले नसते तर तणावाचे वातावरण असताना हा एअरबेस बंद करण्यात आलाच नसता, असे माजी वरिष्ठ सैन्य अधिकारी सांगत आहेत.
हवाई दलाच्या तळावर काम सुरू असल्यानं तो बंद ठेवण्यात येत असल्याचं पाकिस्तानच्या नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाकडून सांगण्यात आले आहे. प्राधिकरणाने नोटॅम काढताना दिलेली ही माहिती म्हणजे भारताच्या हल्ल्यात नुकसान झाल्याची कबुली असल्याचे माजी वरिष्ठ सैन्य अधिकारी सांगत आहेत. पाकिस्तानने नोटॅम काढताना हवाईतळ बंद करण्याचे कारण सांगितलेले नाही. पण हवाईतळ अर्थात विमानतळ १२ मे ते १८ मे २०२५ असे सलग सात दिवस बंद राहणार आहे, असे जाहीर केले आहे.