Monday, May 12, 2025

देशब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

भारत - पाकिस्तानचे डीजीएमओ दुपारी १२ वाजता भेटणार

भारत - पाकिस्तानचे डीजीएमओ दुपारी १२ वाजता भेटणार

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचे डीजीएमओ अर्थात डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स हे सोमवार १२ मे रोजी दुपारी बारा वाजता चर्चेसाठी भेटणार आहेत. यावेळी कोणकोणत्या मुद्यांवर चर्चा होणार हे अद्याप अधिकृतरित्या जाहीर झालेले नाही. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानने अतिरेक्यांचे सर्व तळ बंद करावे, अतिरेक्यांना प्रशिक्षण देणे तसेच मदत करणे थांबवावे अशी मागणी भारताकडून केली जाणार आहे. भारताकडून मोस्ट वाँटेड अतिरेक्यांची यादी पाकिस्तानला दिली जाण्याची आणि या अतिरेक्यांना २४ तासांत भारताच्या ताब्यात द्यावे अशी मागणी केली जाण्याचीही शक्यता आहे. पाकिस्तान व्याप्त काश्मीरचा ताबाही भारत मागण्याची शक्यता आहे. भारताकडून केल्या जाणाऱ्या मागण्यांना पाकिस्तान कसा प्रतिसाद देतो यावर शस्त्रसंधीचे भवितव्य अवलंबून असेल.





याआधी २२ एप्रिल रोजी पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी पहलगाम येथे २६ नागरिकांची हत्या केली. यापैकी २५ भारतीय होते आणि एक नेपाळी होता. ठार मारलेल्या २६ जणांपैकी २५ जणांना फक्त हिंदू आहेत म्हणून ठार करण्यात आले होते. नाव आणि धर्म विचारुन त्यांना अतिरेक्यांनी निष्ठुरपणे ठार केले होते. यावेळी मध्यस्तीचा प्रयत्न केला म्हणून एका स्थानिक मुसलमानाला ठार करण्यात आले होते. या घटनेनंतर ७ मे रोजी भारताने पाकिस्तान व्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमध्ये हवाई हल्ले करुन अतिरेक्यांचे नऊ तळ नष्ट केले होते. भारताची कारवाई ही फक्त अतिरेक्यांच्या विरोधात होती. पण पाकिस्तानने थेट भारताच्या नागरी वस्त्यांवर आणि सैन्य तळांवर हवाई हल्ले करण्याचा प्रयत्न केला. भारताने पाकिस्तानचे हल्ले परतवले. नंतर भारताने पाकिस्तानच्या ११ हवाई तळांवर तसेच अतिरेक्यांच्या निवडक लाँचपॅडवर हल्ले करुन ते निकामी केले. भारत जोरदार कारवाई करत आहे आणि आपण बचाव करण्यास असमर्थ आहोत, याची जाणीव होताच पाकिस्तानने भारतापुढे शस्त्रसंधीचा प्रस्ताव ठेवला. भारताने हा प्रस्ताव स्वीकारत १० मे रोजी संध्याकाळी पाच वाजल्यापासून शस्त्रसंधीला सहमती दर्शवली. लष्करी संकेतानुसार शस्त्रसंधी झाल्यानंतर दोन्ही देशांच्या डीजीएमओंनी चर्चा करुन पुढील कारवाईचे निर्णय घ्यायचे असे ठरले. आता सोमवार १२ मे रोजी दुपारी बारा वाजता भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचे डीजीएमओ चर्चा करणार आहेत. चर्चा यशस्वी झाली तर शस्त्रसंधी कायम राहील. पण चर्चा अयशस्वी झाली तर पुन्हा संघर्ष सुरू होण्याची शक्यता आहे.


पहलगाममधील घटनेनंतर भारताने पाकिस्तान विरोधात केलेली कारवाई




  1. सिंधू नदी पाणी वाटप करार स्थगित. शस्त्रसंधी झाली तरी या करारावरील स्थगिती भारताने कायम ठेवली आहे.

  2. भारत - पाकिस्तान दरम्यान रेल्वे, रस्ते, विमान आणि जल मार्गाने होणारी वाहतूक बंद.

  3. भारत - पाकिस्तान दरम्यान व्यापार बंद.

  4. पाकिस्तानच्या नागरिकांचे भारतीय व्हिसा स्थगित. पाकिस्तानच्या नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश.

  5. पाकिस्तानच्या दुतावासातील संरक्षण मंत्रालय, भूदल, नौदल आणि हवाई दलाचे प्रतिनिधी यांची हकालपट्टी.

  6. पाकिस्तानच्या दुतावासातील कर्मचाऱ्यांची संख्या ५५ वरुन ३० वर आणली.

  7. पाकिस्तानव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमधील अतिरेक्यांचे नऊ तळ आणि अतिरेक्यांचे निवडक लाँचपॅड केले नष्ट.

  8. पाकिस्तानचे ११ हवाई तळ केले निकामी

  9. भारताच्या हल्ल्यात युसुफ अजहर, अब्दुल मलिक रउफ, मुदस्सीर अहमद यांच्यासह १०० पेक्षा जास्त अतिरेकी ठार.

  10. आयसी ८१४ विमान अपहरण आणि पुलवामा हल्ला प्रकरणाशी संबंधित मोस्ट वाँटेड अतिरेकी ठार

  11. पाकिस्तानच्या सैन्याच्या अनेक पायाभूत सोयीसुविधा निकामी

  12. लाहोर, गुरजनवाला येथील पाकिस्तानची हवाई संरक्षण यंत्रणा आणि रडार नष्ट.

  13. पाकिस्तानचे अनेक ड्रोन, निवडक लढाऊ विमानं, क्षेपणास्त्र भारताने केली नष्ट

  14. आगळीक केली तर चोख प्रत्युत्तर देणार; भारताचा पाकिस्तानला इशारा

  15. इथून पुढे अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्ल्याला मदत करणारा देश हा भारताचा शत्रू समजला जाणार आणि त्यांच्याविरोधात करवाई होणार

Comments
Add Comment