
आमच्या आया-बहिणींचं कुंकू पुसण्याचा परिणाम दाखवून दिला
नवी दिल्ली : "टेरर आणि टॉक एकत्र चालणार नाहीत. पाणी आणि रक्ताचे पाट एकत्र वाहू शकत नाहीत. पाकिस्तानच्या मातीत दहशतवादाचं मूळ आहे आणि भारत त्याला आता सहन करणार नाही," असा सज्जड इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी देशवासीयांशी संवाद साधताना दिला.
ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच राष्ट्राला संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी थेट पाकिस्तानवर घणाघात केला. पहलगाम हल्ल्यात २६ निष्पाप भारतीयांचा बळी घेतल्यानंतर भारताने केलेल्या प्रत्युत्तरात्मक कारवाईचं समर्थन करत त्यांनी स्पष्ट केलं – “दहशतवाद्यांना मातीत गाडण्यासाठी भारतीय लष्कराला पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आलं होतं. आमच्या आया-बहिणींचं कुकूं पुसण्याचा परिणाम काय होतो, हे आम्ही दाखवून दिलं.”
"दहशतवाद्यांचा चेहराच उद्ध्वस्त केला"
७ मेच्या पहाटे भारतीय हवाई दलाने पाकिस्तानातील ९ दहशतवादी अड्ड्यांवर अचूक हल्ले केले. "फक्त अड्डेच नाही, तर दहशतवाद्यांच्या इच्छाशक्तीलाही गारद केलं आहे," असं मोदी म्हणाले. ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तान गोंधळात सापडला आणि त्यांच्या सैन्याला मैदानात उतरून हल्ल्यांना तोंड द्यावं लागलं.

नवी दिल्ली : पहलगाम येथील हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत दहशतवाद्यांवर तुफान हल्ला चढवत पाकिस्तानला जबरदस्त प्रत्युत्तर दिले. यावेळी ...
"तीन दिवसांत पाकिस्तानचं कंबरडं मोडलं"
भारतीय सैन्याच्या आक्रमक आणि अचूक कारवाईमुळे पाकिस्तानला मोठं नुकसान झालं. त्यांचे हवाई अड्डे, क्षेपणास्त्र तळ, ड्रोन यंत्रणा उद्ध्वस्त झाल्या. “आपण केवळ सीमारेषेवर नाही, तर त्यांच्या छातीत घुसून प्रत्युत्तर दिलं आहे. पहिल्या तीन दिवसांत पाकिस्तानला जेवढं नुकसान झालं, त्याचा त्यांनाही अंदाज नव्हता,” असं मोदींनी ठणकावून सांगितलं.
"जर पाकिस्तानने पुन्हा आगळीक केली तर..."
“पाकिस्तानने अणुबॉम्बचा धाक दाखवून भारताला ब्लॅकमेल करु नये. भारत अचूक आणि निर्णायक कारवाई करु शकतो. जर पुन्हा कुठेही दहशतवादी कारवाया दिसल्या, तर कारवाई त्या जागीच होईल,” असा ठाम इशाराही पंतप्रधानांनी दिला.
"ऑपरेशन सिंदूर म्हणजे भावनेची रणधार"
“हे फक्त एक लष्करी कारवाईचं नाव नाही, तर कोटी कोटी भारतीयांच्या राग, वेदना आणि न्यायासाठीची रणधार आहे. देश जेव्हा एकवटतो तेव्हा अशा पोलादी निर्णयांचा जन्म होतो,” असं सांगत त्यांनी ऑपरेशन सिंदूरला 'न्यायाची अखंड प्रतिज्ञा' म्हटलं.
"शांतता हवी तर शक्ती लागते"
भगवान बुद्धांचा दाखला देत मोदी म्हणाले, “शांततेसाठी शक्ती लागते आणि भारत ही शक्ती बाळगतो. जर शांततेला धोका निर्माण झाला, तर ही शक्ती वापरणं गरजेचं ठरतं.”
"शहीदांच्या रक्ताला न्याय मिळालाच पाहिजे"
२२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या आठवणी जागवत, मोदी म्हणाले, “धर्म विचारून, कुटुंबासमोरच पर्यटकांना गोळ्या घालणं हे दहशतवादाचं विकृत स्वरूप आहे. भारत हे कधीच विसरणार नाही.”