
नवी दिल्ली: भारत-पाकिस्तान यांच्यात झालेल्या शस्त्रसंधीनंतर जम्मू-काश्मीर आणि नियंत्रण रेषेजवळील इतर भागात ११-१२ची रात्र शांततेत गेली.कोणत्याही प्रकारच्या घटनेची माहिती समोर आलेली नाही. पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदा शेजारील देशाकडून कोणत्याही प्रकारची कुरापत समोर आलेली नाही. भारतीय लष्कराने ही माहिती दिली.
१० मेच्या संध्याकाळी भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधीचा करार झाला त्यानंतर दोन्ही देशांनी शांतता कायम राखण्याचा निर्णय घेतला. मात्र पाकिस्तानकडून तीन तासांतच शस्त्रसंधी कराराचे उल्लंघन करण्यात आले आणि भारतातील काही शहरांमध्ये ड्रोनने हल्ला करण्यात आला. भारतीय लष्करानेही प्रत्युत्तर देत सर्व ड्रोन्स पाडले. पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान सातत्याने जम्मू-काश्मीरच्या सीमेलगतच्या भागांमध्ये गोळीबर करत होता. याला भारताच्या लष्करानेही तोडीस तोड उत्तर दिले. ७ ते १० मे दरम्यान पाकिस्तानन भारताची अनेक सैन्य ठिकाणी उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले. भारताने पाकिस्तानचे सर्व हल्ले उधळून लावले. तसेच त्यांच्या एअरबेसचेही मोठे नुकसान केले.
६-७मेच्या रात्री ऑपरेशन सिंदूर
६-७मेच्या रात्री भारताच्या वायूदलाकडून ऑपरेशन सिंदूर लाँच करण्यात आले. या ऑपरेशन अंतर्गत पाकिस्तानातील ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले. यात १००हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाला. या हल्ल्याने पाकिस्तान चांगलाच चवताळला आणि त्यांनी सातत्याने भारतावर ड्रोन आणि मिसाईल्सचा हल्ला केला. ७ ते १० मे दरम्यान दोन्ही देशांदरम्यान तणावाची स्थिती होती.
पहलगाम हल्ल्यानंतर केले होते ऑपरेशन सिंदूर
जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिलला दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला होता. या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांना आपले प्राण गमवावे लागले होते तर अनेक जण जखमी झाले होते. या २६ पर्यटकांमध्ये एका नेपाळी नागरिकाचा समावेशही होता. पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ६-७ मेच्या रात्री कारवाई केली आणि १००हून अधिक दहशतवाद्यांना ठार केले.