
मुंबई डॉट कॉम : अल्पेश म्हात्रे
मुंबईकरांचा प्रवास सुखकर करण्यासाठी मेट्रो मार्ग क्रमांक तीन म्हणजेच एक्वा लाईनच्या व कुलाबा सीप्झ मार्गिकेवरील भूमिगत मेट्रोवरील एक मार्गीका नुकतीच सुरू करण्यात आली आणि मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर झाला. कुलाब्यातील कफ परेड ते सिप्झजवळील आरे जेवीएलआर स्थानक या दरम्यान संपूर्णपणे भूमिगत असणारी मेट्रो मुंबई शहरातील वाहतूक सुधारण्यासाठी एक महत्त्वाचा प्रकल्प ठरली आहे, तर हा महत्त्वाचा प्रकल्प पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर या मार्गावरून दररोज सुमारे १३ लाख प्रवासी प्रवास करतील असा अंदाज आहे. कुलाबा ते सिप्झ दरम्यान धावणाऱ्या मेट्रो मार्ग क्रमांक तीनची लांबी ३६.५ किमी असून ही मार्गीका पूर्णपणे भूमिगत मार्गीका आहे. यावर २७ स्थानके असून २६ स्थानके भूमिगत असून एक जमिनीवर आहे. या प्रकल्पाचा एकूण खर्च ३७ हजार २७६ कोटी अंदाजे आला आहे. या मार्गिकेवरील गाडी ताशी ८५ किलोमीटर वेगाने धावते तर स्थानकांवर थांबण्यासह याचा प्रभावी सरासरी वेग हा ३४ किलोमीटर प्रतितास एवढा आहे. या मार्गिकेवर एकूण सरकत्या जिन्यांची संख्या ४२० असून एकूण १८५ उदवाहक लिफ्ट बसवण्यात आलेल्या आहेत. या मार्गिकेवरील एकूण आतापर्यंत ९४.८% काम पूर्ण झाले असून ९९.८३% स्थापत्य कामे पूर्ण झाली आहेत तर शंभर टक्के टर्निंगचे काम पूर्ण झाले असून ट्रॅकची शंभर टक्के कामे पूर्ण झालेली आहेत. यातील टप्पा एक हा जे. व्ही. एल. आर. सीप्झ ते बीकेसी हा ७ ऑक्टोबर २०२४ रोजी कार्यान्वित करण्यात आला. यात दहा स्थानके असून याचे अंतर १२.६९ किलोमीटर होते. या मार्गीकेवरील तिकिटांचे दर १० रुपये कमीतकमी असून जास्तीतजास्त पन्नास रुपये आहे.
सध्या यावर एकूण प्रवासी संख्या ही ४१ लाख ६६ हजार ३६३ जणांनी आतापर्यंत प्रवास केला असून दररोज सरासरी २० ते ३० हजार प्रवासी प्रवास करत आहेत. यातील पहिल्या टप्प्यातील गाड्यांची संख्या १० असून बीकेसी ते आरे दरम्यान केवळ २२ मिनिटात प्रवास पूर्ण करता येतो तर दिवसभर २६० फेऱ्या पूर्ण होतात. आता कालपासून सुरू झालेल्या बीकेसी ते आचार्य अत्रे चौक यातील स्थानकांची संख्या सहा असून अंतर ९.७७ किलोमीटर आहे. तिकिटाचे दर हे कमीतकमी दहा रुपये असून कमाल भाडे ४० रुपये आहे. यातील गाड्यांची संख्या ८ असून प्रवास वेळ हा बीकेसी ते आचार्य अत्रै चौक हा १५ ते २० मिनिटं लागणार आहे. यातील फेऱ्यांची संख्या २४४ होणार असून आरे ते आचार्य चौक आता ३६ मिनिटात पार करता येणार आहे. तिकीट दर हा आरे सीप्झ ते आचार्य अत्रे चौक दरम्यान कमल ६० रुपये असणार आहे. आरे ते आचार्य अत्रेच्या दरम्यान रेल्वे स्थानकातील सरकतील जिन्याची संख्या २०८ होणार असून एकूण ६७ उदवाहक लिफ्ट असतील. ही रेल्वे सेवा सुरू झाल्यामुळे वांद्रे, कुर्ला संकुल, वरळी यासारख्या व्यापारी आस्थापने जोडले जाणार असून बीकेसी स्थानक मेट्रो मार्ग दोन डी आणि बुलेट ट्रेनशी देखील भविष्यात जोडले जाणार आहेत. त्यामुळे प्रवासी संख्येत वाढ होणार आहे .
सिद्धिविनायक मंदिर, माहीम दर्गा, माहीम चर्च यासारखी धार्मिक स्थळे तसेच शिवाजी पार्क, रवींद्र नाट्यमंदिर, शिवाजी मंदिर, यशवंतराव नाट्यमंदिर, प्लाझा सिनेमा यासारखी मनोरंजनाची ठिकाणे या मार्गाने जोडली जाणार आहेत. आता थोड्याच दिवसात आचार्य अत्रे चौक ते कफ परेड हा आणखी एका टप्पा सुरू होणार आहे. याचे अंतर ११ किलोमीटर असून या मार्गावर ११ स्थानके असतील आणि तीही सर्व भुयारी स्थानके असतील. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास पूर्णपणे कफ परेड ते आरे सिप्झ जाण्यासाठी एक तासापेक्षा कमी कालावधी लागणार आहे. यामुळे एकूण सहा प्रमुख रोजगार व व्यावसायिक केंद्रांशी कनेक्टिव्हिटी जोडली जाईल. नरिमन पॉईंट, कफ परेड, फोर्ट, लोअर परेल, वांद्रे कुर्ला संकुल व सिप्झ एमआयडीसी एकमेकांशी जोडले जातील. जवळपास ३०हून अधिक शैक्षणिक संस्था, १३ रुग्णालय, १४ धार्मिक स्थळे व ३० हून अधिक मनोरंजन स्थळे आता जोडली जातील. उपनगरिय रेल्वेने जोडली न गेलेले गिरगाव, काळबादेवी, वरळी व आंतरराष्ट्रीय विमानतळ व आंतरदेशीय विमानतळ या एका मेट्रो सेवेने जोडले जातील.

मुंबई : "३५ दिवसांत फक्त १० टक्के नालेसफाई? मग उरलेली रक्कम कुठं गेली?" असा थेट सवाल करत मुंबई उपनगर पालकमंत्री आशिष शेलार यांनी मुंबई महानगरपालिकेच्या ...
या संपूर्ण मेट्रो मार्गावरील प्रवाशांचा भार हा मुंबई उपनगरिय सेवा मोनोमार्ग व बस मार्गावरील पंधरा टक्के प्रवासी याचा वापर करतील अशी अपेक्षा असून त्यामुळे मुंबई उपनगरीय रस्ते मार्गावरील भाग कमी करण्यास मदत करेल अशी अपेक्षा आहे. या मेट्रो मार्गावरील गाड्या या मानवरहित गाड्या आहेत, मात्र सध्या ही मानवरहित यंत्रणा चालकासह कार्यान्वित केलेली आहे. मात्र कालांतराने या मार्गांवरील गाड्या या चालकविरहित धावतील. ही मेट्रो मार्गीका कार्यान्वित झाल्यास पर्यावरणीय फायदेही बरेच होणार असून ६.६५ लाख वाहने रस्त्यावरील कमी होतील अशी अपेक्षा आहे. दिवसाला ३.५४ लाख लिटर इंधन मागणी कमी होईल. तथापि रस्त्यावरील वाहतूक ३५ टक्क्यांनी कमी होईल. ध्वनी प्रदूषणालाही आळा बसेल. या रेल्वे डब्यांमध्ये संपूर्ण वातानुकूलित यंत्रणा असून प्रवाशांना आरामदायक प्रवास होईल याकडे कटाक्षाने लक्ष देण्यात आलेले आहे.
माहिती व जाहिरातीसाठी प्रत्येक डब्यात एलसीडी स्क्रीन बसवण्यात आलेल्या आहेत. सुलभ प्रवासी घोषणा सिस्टीम प्रत्येक डब्यात आहेत. दिव्यांग प्रवाशांसाठी व्हीलचेयर ठेवण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था असेल. दृष्टिहीन प्रवाशांसाठी रंगीत ग्रीप हिल्स बसवण्यात आले आहेत. ही मुंबई मेट्रो जरी भूमिगत रेल्वे असली तरी सुरक्षिततेच्यादृष्ट्या पूर्णपणे अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून सुसज्ज अशी ही मेट्रो रेल्वे असून जपान तसेच इतर प्रगतिशील देशांनी या मेट्रोसाठी तांत्रिक व आर्थिक मदत केली आहे. त्यामुळे इथून प्रवास करताना आपण भारतात आहोत की परदेशात असाच प्रश्न पडतो. ही मेट्रो मार्गीका कार्यान्वित झाल्यास रेल्वेवरील भार व रस्त्यावरील भार नक्कीच कमी होईल यात कोणतीच शंका नाही! असो...पण नुकतेच दोन टप्पे सुरू झाले आहेत. सध्या गर्दी कमी असेल तेव्हा एकदा तरी हा प्रवास करून पाहावाच असा आहे.