
कणकवली : करंजेच्या माळरानावर उभे झालेले नंदनवन म्हणजे कै. तातु सिताराम राणे ट्रस्ट संचलीत गोवर्धन गोशाळा! या गोशाळेचा दिमाखदार शुभारंभ रविवारी ११ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,माजी केंद्रीय मंत्री खा. नारायण राणे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे, आ. निलेश राणे तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर व मंत्रीगण उपस्थित होते.
हिरव्या वनराईने नटलेल्या, निसर्गरम्य करंजे गावात सुमारे ७० एकर जागेत अत्याधुनिक ‘गोशाळा’ उभारण्यात आली आहे. या गोशाळेत गीर, साहीवाल, देवणी, पुंगनूर आदी भारतातील व महाराष्ट्रातील विविध जातींच्या तसेच खिल्लार, स्थानिक कोकण कपिला अशा विविध गायी आहेत. करंजे गावातील गोशाळेत दुधापासून तयार केले जाणारे विविध पदार्थ विक्रीसाठी ठेवले जाणार आहेत. गोमूत्र वापरुन तयार केलेली ओषधे, खते, गोबरगॅस आणि रंग यांची खरेदी या गोशाळेच्या माध्यमातून लवकरच करता येईल.
करंजेमध्ये गोशाळेसह शेळी - मेंढीपालन, कुक्कुटपालन हे प्रकल्पही लवकरच सुरू केले जाणार आहेत. या प्रकल्पांमुळे करंजे तसेच आसपासच्या गावांतील तरुण - तरुणींना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. पशुपालन, दुग्ध व्यवसाय, शेळी-मेंढी पालन, कुक्कुटपालन, खत निर्मिती,दुग्धजन्य पदार्थ निर्मिती आदी विषयावर विविध चर्चासत्रे, अभ्यास शिबीरे, कार्यशाळा घेण्याचेही गोशाळेचे नियोजन आहे. या कार्यक्रमांमध्ये तज्ज्ञ मंडळी मार्गदर्शन करणार आहेत.