Saturday, May 10, 2025

किलबिल

विहिरीचे पाणी गरम का असते?

विहिरीचे पाणी  गरम का असते?

कथा : प्रा. देवबा पाटील


आनंदराव आजोबांसोबत स्वरूप दररोज सकाळी फिरायला जात होता. फिरताना तो आजोबांना खूप प्रश्न विचारायचा. “आपण आज घरी गेल्यावर मस्तपैकी आपल्या घरच्या विहिरीच्या पाण्याने स्नान करू.” आजोबा म्हणाले. “ नाही हो आजोबा, त्या थंडगार पाण्याने उलट जास्त थंडी वाजेल आपल्याला ” स्वरूप म्हणाला.


“अरे बाळा, हिवाळ्यात आपल्या सभोवतीच्या वातावरणाचे तापमान हे खूप कमी असते; परंतु जमीन थंड व्हायला वेळ लागत असल्याने जमिनीखालील खोलवर भागाचे तापमान जास्त असते. त्यामुळे जमिनीखालील बंदिस्त पाण्याचे तापमान सुद्धा बाहेरच्या हवेच्या तापमानापेक्षा जास्त असते म्हणून हिवाळ्यात विहिरीचे किंवा कूपनलिकेचे पाणी गरम असते. उलट उन्हाळ्यात जमिनीवरच्या हवेचे तापमान हे जमिनीखालील तापमानापेक्षा जास्त असल्याने उन्हाळ्यात विहीर किंवा कूपनलिकेतून काढलेले पाणी बाहेरच्या पाण्यापेक्षा थंड वाटते.” आजोबांनी सांगितले.


“मग करायचं का विहिरीच्या पाण्याने स्नान? स्नानानंतर झकास तेल लावू आपण आपल्या अंगाला.” आनंदरावांनी स्वरूपला विचारले. “ आजोबा आंघोळीनंतर तेल कशासाठी लावायचे हो अंगाला? सगळ अंग चिकट होईल तेलाने.” स्वरूप म्हणाला.


आनंदराव म्हणाले, “आपल्या शरीरावरील त्वचेखाली तैलग्रंथी व घर्मग्रंथी असतात. त्यांच्यामधून स्त्रवलेले तेल व घामाच्या मिश्रणाने एक पातळ थर आपल्या कातडीवर पसरतो. हा थर आपल्या कातडीखालील आर्द्रता म्हणजे ओलावा टिकवून ठेवतो व आपली त्वचा मऊ राहते. हिवाळ्यात आपण आंघोळीसाठी गरम पाणी वापरतो त्यामुळे त्वचेखालील तेलाचे सूक्ष्म बाष्पीभवनाने प्रमाण कमी होते. तसेच हिवाळ्यात हवा कोरडी व थंड असते. या कोरड्या हवेने कातडीवरील तेल व घाम बाष्पीभूत झाल्याने त्वचेखालील आर्द्रतेचे सुद्धा बाष्पीभवन होते. त्यामुळे त्वचेखालील ओलावा कमी होऊन आपली त्वचा कोरडी पडते व उलते, ओठ फुटतात, हात उलतात, पायाला भेगा पडतात. म्हणूनच हिवाळ्यात स्नानानंतर स्वच्छ रुमालाने त्वचा कोरडी करून अंगाला किंचितसे तेल लावतात. हिवाळ्याच्या दिवसांत आंघोळीआधी असे तेल लावून जर उन्हात बसले, तर आपली त्वचा सूर्यकिरणातील ऊर्जा शोषून घेते व त्या सूर्यकिरणांची आपल्या रक्तातील विशिष्ट घटकांवर प्रक्रिया होऊन आपल्या शरीरात भरपूर ‘ड’ जीवनसत्त्व तयार होते.”


असे गप्पा गोष्टी करीत करीत दोघेही नाताजले घरी आले. घरी आल्याबरोबर स्वरूप त्याच्या आईला म्हणाला, “आई, आता मी दररोज आजोबांसोबत विहिरीच्याच कोमट पाण्याने आंघोळ करेन” आईने हसत हसत त्याला “ हो बाळा, करीत जा” असे म्हटले आणि दोघांचे स्नानाचे कपडे आणायला घरात गेली. इकडे आजोबांनी विहिरीवरील मोटारपंप सुरू करून दिला. आईने कपडे आणून दिल्यानंतर आई पुन्हा घरात निघून गेली व या दोघां नाताजल्यांनी मोटरपंपच्या पाईपच्या पाण्याच्या कोमट धारेखाली आपली आंघोळ सुरू केली.

Comments
Add Comment