Sunday, May 11, 2025

महामुंबई

मुंबईतून विरारला अवघ्या ४५ मिनिटांत पोहोचता येणार

मुंबईतून विरारला अवघ्या ४५ मिनिटांत पोहोचता येणार

उत्तन ते विरारदरम्यान सागरी सेतू उभारण्यास राज्य सरकारने दिली मंजुरी


मुंबई : उत्तन ते विरारदरम्यान सागरी सेतू उभारण्यास राज्य सरकारने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणास (एमएमआरडीए) मंजुरी दिली आहे. या प्रकल्पामुळे मुंबईतून विरारला पोहोचणे अवघ्या ४५ मिनिटांत शक्य होणार आहे.
उत्तन-विरार सागरी सेतू हा जोडरस्त्यांसह ५५.१२ किमी लांबीचा असेल. त्यासाठी ८७ हजार ४२७.१७ कोटी रुपयांच्या खर्च होणार आहे. या खर्चाला एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील एमएमआरडीएच्या १५९व्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. तसेच विरार ते पालघर दरम्यान टप्पा-२ चा देखील अभ्यास करण्यात येत आहे. या नव्या सी-लिंकमुळे उत्तर ते दक्षिण प्रवास करणे सोप्पे होणार आहे. एकूण आठ लेनचा महामार्ग असून भविष्यात थेट दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गाला जोडला जाणार आहे. नियंत्रित महामार्ग म्हणून हा कॉरिडॉर कार्यरत असेल आणि शहरांतर्गत प्रवास सुलभ होईल. त्याचबरोबर या महामार्गामुळे पश्चिम द्रूतगती महामार्ग, एस. व्ही. रोड आणि लिंक रोडसारख्या प्रमुख मार्गांवरील ताण कमी होऊन यूव्हीएसएलमुळे वाहतुकीची कोंडी दूर होईल. यामुळे प्रवासाचा कालावधी कमी होईल, रस्ते अपघात कमी होतील आणि ध्वनी व वायुप्रदूषणात लक्षणीय घट होईल.



वर्सोवा ते उत्तन हा भाग मुंबई महापालिकेच्या उत्तर सागरी किनारा मार्ग प्रकल्पात असल्यामुळे तो सध्याच्या संरेखनातून वगळण्यात आला आहे. उत्तन-विरार सागरी सेतू प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याची उभारणी 'एमएमआरडीए'मार्फत करण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे उत्तर मुंबई महानगर क्षेत्राचा विकास होणार आहे. २८ मार्च २०२५ रोजीच्या बैठकीत सुधारित टप्पा -१ प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) वर्सोवा-विरार सागरी सेतू (व्हीव्हीएसएल) प्रकल्पाची संकल्पना मांडली होती. मात्र, ऑक्टोबर २०२२ मध्ये हा प्रकल्प एमएमआरडीएकडे हस्तांतरित करण्यात आला. फेब्रुवारी २०२४ मध्ये दोन टप्प्यांमध्ये प्रकल्पाची अंमलबजावणी करण्याचे निशित झाले. एमएमआरडीएने टप्पा-१ च्या (उत्तन-विरार) अंमलबजावणीसाठी मंजुरी दिली असून टप्पा-२ बाबत (विरार-पालघर) व्यवहार्यता अभ्यास करण्यात येत आहे. वर्सोवा ते उत्तन हा भाग मुंबई महानगरपालिकेच्या उत्तर सागरीकिनारा मार्ग प्रकल्पात समाविष्ट असल्यामुळे तो सध्याच्या संरेखनातून वगळण्यात आला आहे.


टप्पा-१ चा तांत्रिक तपशील

यूव्हीएसएल टप्पा-१ची एकूण लांबी (सागरी सेतू आणि जोडरस्त्यांसह) ५५.१२ किमी असून यात पुढील जोडरस्त्याचा समावेश आहे.

  • उत्तन ते विरार सागरी सेतू : २४.३५ किमी

  • उत्तन जोडरस्ता : ९.३२ किमी

  • वसई जोडरस्ता : २.५ किमी

  • विरार जोडरस्ता : १८.९५ किमी.

Comments
Add Comment