ऋषितुल्य रामकृष्ण भांडारकर

कोकणी बाणा : सतीश पाटणकर


रामकृष्ण गोपाळ भांडारकर हे संस्कृत पंडित, मराठी शिक्षणतज्ज्ञ, समाजसुधारक व प्रार्थना समाजाचे कार्यकर्ते होते. त्यांचे मुळ आडनाव पत्की तथापि त्यांचे पूर्वज खजिन्यावर अधिकारी होते म्हणून ‘भांडारकर’ हे नाव पडले. आजोबा लाडो विठ्ठल शिरस्तेदार म्हणून अव्वल इंग्रजीत पुढे आले. वडील महसूल खात्यात होते. त्यांच्या मातोश्रींचे नाव रमाबाई. त्यांचे चुलते विनायक भांडारकर हे पुनर्विवाहाचे पुरस्कर्ते व क्रियाशील सुधारक होते. भांडारकर घराणे मूळ वेंगुर्ल्याचे. तेथील त्यांच्या वास्तूत आज रमा-गोपाळ कन्याशाळा आहे.


भांडारकरांचा जन्म मालवणचा. मालवण, राजापूर व रत्नागिरी येथे आरंभीचे काही शिक्षण घेतल्यानंतर मुंबईच्या एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूटमधून हायस्कूलची परीक्षा ते उत्तीर्ण झाले व नंतर त्या इन्स्टिट्यूट कॉलेजचा अभ्यासक्रमही त्यांनी पूर्ण केला. पुढे मुंबई विद्यापीठाचे बी.ए. व एम्. ए. या परीक्षा ते उत्तीर्ण झाले. मुंबई व पुणे येथील जुन्या विद्वान शास्त्री पंडितजवळ न्याय, व्याकरण, वेदान्त इत्यादींच्या चांगला अभ्यास केला. हैदराबाद (सिंध) व रत्नागिरी येथील हायस्कूलचे मुख्याध्यापक म्हणून त्यांनी उत्कृष्ट कार्य केले. संस्कृतची दोन शालेय पाठ्यपुस्तके (प्रथम इंग्रजी व पुढे मराठी माध्यमातून) तयार केली. यामुळे हजारो विद्यार्थ्यांना संस्कृत शिकता आले. पुणे डेक्कन कॉलेजमध्ये संस्कृतचे प्राध्यापक म्हणून यशस्वी नोकरी केल्यावर १८९३ मध्ये ते सेवानिवृत्त झाले.


त्यानंतरही त्यांनी संस्कृतचा व्यासंग चालूच ठेवला. कित्येक यूरोपीय पंडितांनी संस्कृत व इतर प्राच्य भाषा यांचे त्यांच्या दृष्टिकोनातून संशोधन चालविले होते. भांडारकरांनी संस्कृतच्या या अध्ययनाला नवे चिकित्सक व निःपक्षपाती संशोधनाचे स्वरुप दिले. १८७४ साली लंडन येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय प्राच्यविद्या परिषदेत नाशिक शिलालेखासंबंधी त्यांचा निबंध वाचला गेला. १८८५ मध्ये जर्मनीतील गटिंगन विद्यापीठाने त्यांना पीएच्. डी. अर्पण केली. १८८६ साली व्हिएन्ना येथे ‘क्राँग्रेस आँफ ओरिएंटॅलिस्टस’ भरली, तिला भारतीय प्रतिनिधी म्हणून ते उपस्थित राहिले. मुंबईच्या एलफिन्स्टन कॉलेजमध्ये १८७९ पर्यंत ते संस्कृतचे प्राध्यापक होते. मुंबई विद्यापीठचे अधिछात्र व सिंडिकेटचे सदस्य म्हणून कामगिरी बजाविल्यानंतर ते कुलगुरु झाले. १९०४ मध्ये एल्एल्. डी. ही पदवी त्यांना मिळाली.


‘रॉयल एशियाटिक सोसायटी’, लंडन व मुंबई, ‘जर्मन ओरिएंटल सोसायटी’, ‘अमेरिकन ओरिएंटल सोसायटी’ इटली येथील ‘एशियाटिक सोसायटी’, सेंट पीटर्झबर्ग येथील ‘इंपिरिअल अकॅडमी आँफ सायन्स’ इ. जगप्रसिद्ध संस्थांनी भांडारकरांना सदस्यत्व दिले. प्राचीन भारतीय ज्ञानभांडाराला जागतिक प्रसिद्धी व प्रतिष्ठा मिळवून दिली. धर्म हा भांडारकरांच्या आस्थेचा व चिंतनाचा खास विषय होता. सामाजिक सुधारणांना धर्माचा व नीतीचा पाया द्यावा म्हणून परमहंस सभेतून १८६७ साली प्रार्थना समाजाची स्थापना झाली. प्रत्यक्षाप्रत्यक्ष परमहंस सभेशी पूर्वसंबंधित असल्यामुळे १८६९ साली रामकृष्णपंत प्रार्थनासमाजाचे सभासद झाले. भक्तिपर कविता आणि पदे रचिली या कामगिरीमुळे भांडारकर हे प्रार्थना समाजाचे वैचारिक संस्थापक मानले जातात.


स्त्रिया, शुद्रातिशुद्र यांचे शिक्षण, बालविवाहप्रतिबंध, विधवाविवाह, संमतिवयाचा पुरस्कार, अस्पृश्यतानिवारण, मद्यपानबंदी, देवदासीपद्धतबंदी इ. सामाजिक सुधारणा व्हाव्यात म्हणून भांडारकरांनी अविरत श्रम केले. सामाजिक परिषदेच्या कार्यात भागही घेतला. हे सर्व कार्य करीत असताना त्यांना विरोध होऊन त्यांचा छळही झाला. त्यांचा स्वभाव निःस्पृह व निर्भिड होता. १९०३ मध्ये व्हाइसरॉयच्या लेजिस्लेटिव्ह कौन्सिलचे ते सदस्य होते. १९०४-०८ या कालखंडात प्रांतिक लेजिस्लेटिव्ह कौन्सिलमध्येही ते होते. १९११ मध्ये भरलेल्या दिल्ली दरबारप्रसंगी त्यांना ‘सर’ हा किताब देण्यात आला. त्यांची वृत्ती नेमस्त होती. न्या. रानडे हयात असताना त्यांच्या सर्वांगीण कार्याला त्यानी साथ दिली व नंतरही रानडयांच्या प्रार्थना समाज आदीकरून अनेक संस्थांची धुरा वाहिली.


अर्ली हिस्टरी ऑफ डेक्कन, वैष्णविझम, शैविझम अँड अदर मायनर रिलिजन्स, ए पीप इनट् द अर्ली हिस्टरी ऑफ इंडिया, कलेक्टेड वर्क्स ऑफ श्री. आर्. जी. भांडारकर इ. त्यांची विपुल ग्रंथसंपदा त्यांच्या विद्वत्तेची साक्ष देते. एवढेच नव्हे, तर प्राचीन भारताचा सुसंगत पुराव्यांच्या आधारे इतिहास कसा शोधून काढावा, ऐतिहासिक घटनांचा प्रमाणशुद्ध अर्थ कसा लावावा, याचा उत्कृष्ट नमुना त्यांच्या ऐतिहासिक लेखनात सापडतो. त्यामुळे त्यांचे ग्रंथ हे भारताच्या प्राचीन इतिहासाचे आधारभूत ग्रंथ म्हणून स्वीकारले जातात. प्राचीन भारतातील विविध धार्मिक संप्रदायांचा आणि विविध धार्मिक तत्त्वज्ञानांचा संगतवार इतिहास दाखविण्याचे महत्वाचे कार्य भांडारकरांनी लिहिलेल्या संशोधनपर ग्रंथांनी केलेले आहे.


१८८३ साली व्हिएन्नामध्ये भरलेल्या प्राच्यविद्या विद्वानांच्या परिषदेत हजर राहिलेल्या भांडारकरांच्या अभ्यासाचा आवाका पाहून तेथले सरकार तसेच जागतिक विद्वान अचंबित झाले आणि त्यांनी भांडारकरांना सी.आई.ई. (Companion of the Order of the Indian Empire) ही पदवी देऊन सन्मानित केले. भांडारकरांच्या ८०व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या नावाने पुण्यात इ.स. १९१७ मध्ये भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था स्थापन करून तिची सुरुवात केली. रामकृष्णपंतांनी पुणे येथील ‘प्राच्यविद्या संशोधन मंदिरा’स आपल्या ग्रथांचा व संशोधन पत्रिकांचा अनमोल संग्रह देणगी म्हणून दिल्यामुळे, ही महत्त्वाची संस्था उभी राहिली. निवृत्तीतील बत्तीस वर्षे विद्याव्यासंग व समाजसेवा केल्यानंतर वयाच्या ८८ व्या वर्षी पुणे येथे त्यांचे ऋषिपंचमीस वार्धक्याने निधन झाले. या ऋषितुल्य महापंडिताच्या अस्थी पुणे प्रार्थना समाजाच्या प्रांगणात एका स्तूपाखाली ठेवण्यात आल्या आहेत.

Comments
Add Comment

अफजलखान वध : इतिहासातील सोनेरी पान

मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला नुकतीच १७ वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने सागरी सुरक्षा व्यवस्थेच्या

लिटिल मास्टर सुनील गावसकर

कोकण आयकॉन : सतीश पाटणकर सुनील मनोहर गावसकर. वेंगुर्ले उभादांडा हे त्यांचे गाव. क्रिकेटच्या इतिहासात कधीही न

हम्पी म्हणजे : दगडात कोरलेली विजयनगर साम्राज्याची वैभवगाथा

विशेष : लता गुठे आपण देश-विदेशात फिरत राहतो तेव्हा अनेक शहरं आपल्याला आवडतात पण नजरेत भरणारं आणि मनात कायम

आखिरी गीत मोहब्बतका सुना लूं तो चलूं

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे नोव्हेंबर महिन्यातला सोमवार आला तो एक अतिशय वाईट बातमी घेऊनच. आठच दिवसांपूर्वी

उर्वशी-पुरुरवाची कथा

महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरे इंद्राच्या दरबारात अनेक सुंदर अप्सरा होत्या. त्या नेहमीच चिरतरुण असल्याचे

मालकाचे घर, दादागिरी भाडोत्रीची

क्राइम : अॅड. रिया करंजकर शहरामध्ये नोकरीची आणि उद्योगधंद्याची मुबलकता असल्यामुळे ग्रामीण भागातील युवक शहराकडे