Saturday, May 10, 2025

किलबिल

स्वावलंबनात यशाचा मार्ग

स्वावलंबनात यशाचा मार्ग

लहानशा गोष्टी, मोठा अर्थ : शिल्पा अष्टमकर


 


जो दुसऱ्यावर विसंबला |


त्याचा कार्यभाग बुडाला |


जो आपणचि कष्टत गेला |


तोचि भला ||


आपल्या जीवनात एक अनुभव अनेकदा आला असेल. एखाद्या पुस्तकासाठी अथवा नोट्ससाठी तुम्ही मित्रावर विसंबून राहिलात आणि ऐन परीक्षेच्या वेळी मित्राने तुमचा घोटाळा केला. शाळेच्या गणवेशाला इस्त्री करण्यासाठी तुम्ही बहिणीवर विसंबून राहिलात आणि ऐन प्रजासत्ताक दिनी तुमची ताई कुठेतरी सहलीला निघून गेली. महात्मा गांधींचा स्वावलंबन तत्त्वावर फार भर होता. माणसाने स्वतःची कामे स्वतःच करण्याची सवय करून घेतली पाहिजे. ‘आपण मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही’ अशी मराठीत म्हण आहे. प्रत्येक गोष्टीत कुणावर तरी अवलंबून राहायचे आणि अपयश आले म्हणजे कुणावर तरी दोषारोप करायचा हा मानवी स्वभाव आहे; परंतु हा काही मोठा सद्गुण नाही. अशा स्वभावामुळे आपण आपले नुकसान तरी करून घेतो किंवा पराधीन तरी होतो.


एकदा छत्रपती शिवाजी महाराजांना पन्हाळगडावर हल्ला करायचा होता. सायंकाळी एका विशिष्ट वेळी ७००० फौज घेऊन महाराजांनी पन्हाळगडाच्या पायथ्याशी पोहोचायचे आणि त्याचवेळी नेताजी पालकर यांनी ५००० फौज घेऊन पन्हाळगडाच्या पायथ्याला यायचे असे ठरले होते; परंतु नेताजी पालकरांनी यायला खूप उशीर केला. महाराजांनी थोडा वेळ वाट पाहून पन्हाळगडावर हल्ला चढवला. पन्हाळगडावर आदिलशाची अफाट फौज होती. महाराजांचे सैन्यबळ कमी होते. परिणामतः पराभव पत्करून त्यांना विशालगडावर पळून जावे लागले. नेताजीवर अवलंबून राहिल्यामुळे महाराजांसारख्या पराक्रमी पुरुषाला पराभव पत्करावा लागला. दुसऱ्या दिवशी नेताजी फौज घेऊन विशाळगडावर महाराजांना भेटायला आला. पण महाराजांनी त्याला सरनौबत पदावरून काढून टाकले. रुसलेला नेताजी पालकर प्रथम आदिलशहाला आणि नंतर मोगलांना जाऊन मिळाला. त्या निर्माण झालेल्या कटूतेमुळे महाराजांना एक सच्चा मित्र गमवावा लागला.


म्हणून आपली दिनचर्या निश्चित करावी. दिवसभरात जी कामे करायची त्यासाठी कुणावर विसंबून न राहता त्याचे नियोजन नीट करावे. म्हणजे कुणाला दोष देण्याचा प्रश्न उपस्थित होणार नाही. आपल्या इंद्रियांना कामाचे वळण असले पाहिजे व जीवनाला एक शिस्त असली पाहिजे. ज्या गोष्टी आपल्याला झेपणार नाहीत किंवा आपल्या क्षमतेच्या बाहेर आहेत, त्या गोष्टींचा नाद सोडून द्यावा.


स्वतःचे दप्तर स्वतः भरणे, दर रविवारी आपले कपाट आवरून ठेवणे, स्वतःच्या बुटांना स्वतःच पॉलिश करणे, आपले वेळापत्रक भरणे अशी किरकोळ कामे आपली आपण करावीत त्यातून आपल्या व्यक्तिमत्त्वाला संपन्न आकार प्राप्त होईल स्वावलंबन म्हणजे स्वतःच्या कर्तृत्वावर, मेहनतीवर आणि क्षमतेवर पूर्ण विश्वास ठेवून स्वतःचे जीवन घडविणे. इतरांवर अवलंबून न राहता स्वतःच्या मार्गाने यश मिळवण्याची ही प्रक्रिया असते. स्वावलंबन ही कुठल्याही यशस्वी जीवनाची खरी सुरुवात आहे.


स्वावलंबी माणूस स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवतो. तो अपयशाने खचत नाही, उलट तो ती त्यासाठी शिकण्याची संधी मानतो. जगातील अनेक यशस्वी व्यक्ती-स्वामी विवेकानंद, अब्दुल कलाम यांनी स्वावलंबनाच्या जोरावरच यशाच्या शिखरांवर झेप घेतली.


आजच्या काळात जेवढी स्पर्धा वाढते आहे, तेवढेच स्वावलंबनाचे महत्त्वही वाढते आहे. पूर्वीच्या काळात बहुतेक लोक नशिबावर किंवा दुसऱ्याच्या मदतीवर अधिक भर देत असत. पण आता जग खूप बदलले आहे. आजच्या तरुणांनी जर स्वावलंबनाचा मार्ग स्वीकारला, तर कोणत्याही क्षेत्रात ते यशस्वी होऊ शकतात. स्वावलंबी व्यक्तीची मानसिकता ही सकारात्मक, प्रयत्नशील आणि धाडसी असते. ती अपयशाने खचून जात नाही. उलट प्रत्येक अडचण ही एक संधी म्हणून स्वीकारून, ती आपले ध्येय गाठण्यासाठी झटत राहते. स्वावलंबनामुळे माणसामध्ये आत्मविश्वास वाढतो. कोणत्याही संकटासमोर तो डगमगत नाही.


उदाहरणार्थ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन पाहा. त्यांनी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेतले, संघर्ष केला आणि शेवटी भारताच्या संविधानाचे शिल्पकार झाले. त्यांनी कोणावरही अवलंबून न राहता स्वतःच्या कर्तृत्वाने आपली ओळख निर्माण केली. हेच खरे स्वावलंबन! आज सरकारही ‘स्टार्टअप इंडिया’, ‘आत्मनिर्भर भारत’, ‘मुद्रा योजना’ यांसारख्या विविध योजनांच्या माध्यमातून तरुणांना स्वयंरोजगारासाठी मदत करत आहे. यातून हेच दिसून येते की, आज समाजाला गरज आहे अशा व्यक्तींची जी स्वतःच्या हिमतीवर उभे राहतील आणि इतरांनाही रोजगार देतील. स्वावलंबन म्हणजे केवळ आर्थिक स्वातंत्र्य नव्हे, तर मानसिक आणि बौद्धिक स्वातंत्र्यही होय. विद्यार्थी वर्गाने केवळ अभ्यासात नव्हे, तर निर्णय घेण्यात, विचार करण्याच्या पद्धतीतही स्वावलंबी होणे गरजेचे आहे. स्वतः अभ्यास करून, विचार करून निर्णय घेणारा विद्यार्थीच पुढे जाऊन मोठे यश मिळवतो. समाज, राष्ट्र किंवा संपूर्ण मानवजातीचा विकासही फक्त स्वावलंबनातूनच शक्य आहे. जेव्हा प्रत्येक व्यक्ती स्वतःला जबाबदार मानून काम करतो, तेव्हाच खरी प्रगती होते. निष्कर्षतः, स्वावलंबन हा यशाचा खरा मार्ग आहे. जो स्वतःवर विश्वास ठेवतो, कठोर परिश्रम करतो आणि अपयशांना न घाबरता पुढे जात राहतो, तोच खऱ्या अर्थाने यशस्वी होतो. म्हणूनच, प्रत्येकाने आपल्या जीवनात स्वावलंबन स्वीकारले पाहिजे.

Comments
Add Comment