
मुंबई: भारत आणि पाकिस्तान (India Pakistan Tension) यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर देशभरात सतर्कता बाळगली जात आहे. याचाच एक भाग म्हणून मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिर प्रशासनाने (Siddhivinayak Temple) मोठा निर्णय घेतला आहे. मंदिर प्रशासनाने सुरक्षेच्या कारणास्तव आज, रविवारी पासून भाविकांना हार आणि नारळ अर्पण करण्यास मनाई केली आहे. हा नियम आज दिनांक ११ मे पासून लागू झाला असल्याची माहिती न्यासाच्या वतीने देण्यात आली आहे.
भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाला भाविकांनी सहकार्य करावे, असे आवाहन मंदिर प्रशासनाकडून करण्यात आले आहे. सध्याची परिस्थिती पाहता भाविकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणे आवश्यक आहे, त्यामुळे हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबई पोलिसांच्या सल्ल्यानुसार मंदिर प्रशासनाने घेतला निर्णय
मुंबई पोलिसांच्या सल्ल्यानुसार मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. सिद्धिविनायक मंदिर प्रशासनाने शुक्रवारी एक आदेश जारी केला आहे की मंदिरात प्रसाद म्हणून नारळ आणि फुलांच्या हार अर्पण केले जाणार नाहीत.
मंदिराचे विश्वस्त भास्कर शेट्टी म्हणाले की, सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी आम्हाला नारळ आणि इतर नैवेद्यांवर बंदी घालण्याचे निर्देश दिले आहेत. श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सदा स्वर्णकर म्हणाले की, दररोज हजारो भाविक मंदिराला भेट देतात आणि ते दहशतवाद्यांच्या 'हिटलिस्ट'मध्ये समाविष्ट आहे.
अन्य मंदिर ट्रस्टकडून संमिश्र प्रतिक्रिया
या निर्णयावर शहरातील इतर मंदिर ट्रस्टकडून संमिश्र प्रतिक्रिया आल्या आहेत. श्री महालक्ष्मी मंदिर ट्रस्टचे विश्वस्त विजय गपचप यांनी स्थानिक विक्रेत्यांबद्दल चिंता व्यक्त केली. "या निर्णयामुळे अनेक लहान व्यवसायांना त्रास होईल. आम्ही त्याऐवजी सुरक्षा मजबूत करण्याचा आणि तपासणी प्रक्रिया वाढवण्याचा पर्याय निवडत आहोत." अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. तर बाबुलनाथ मंदिर चॅरिटीजचे अध्यक्ष नितीन ठक्कर यांनी मंदिरात अशा प्रकारची बंदी लागू करणार नसल्याची प्रतिक्रिया प्रसारमध्यमाला दिली. बाबूलनाथ मंदिरात सिद्धिविनायक मंदिरासारखी गर्दी होत नाही. तसेच आमच्याकडे आधीच कडक स्क्रीनिंग प्रोटोकॉल आहेत. असे पुढे म्हणाले.
यापूर्वी, पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर देखील कडक पोलीस बंदोबस्ताने वेढले गेले आहे. मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस तैनात करण्यात आले असून, प्रत्येक येणाऱ्या-जाणाऱ्यावर बारकाईने नजर ठेवण्यात येत आहे.