Saturday, May 10, 2025

कोलाज

‘श्याम‌’ची चटका लावणारी एक्झिट

‘श्याम‌’ची चटका लावणारी एक्झिट

प्रासंगिक
महेश धर्माधिकारी


‌‘श्यामची आई‌’ या प्रथम राष्ट्रपतीपदक विजेत्या मराठी चित्रपटात श्यामची अजरामर भूमिका साकारणारे माधव वझे यांनी इहलोकीची यात्रा संपवली. दर्जेदार अभिनेता, कसबी नाट्यदिग्दर्शक आणि निष्पक्ष नाट्यसमीक्षक म्हणून प्रसिद्ध असलेल्या वझेंनी प्रायोगिक रंगभूमीला मोठे योगदान दिले. चित्रपटांमध्ये अभिनय करताना त्यांनी रंगभूमी हेच आपले पहिले प्रेम असल्याचे दाखवून दिले. या मनस्वी कलाकाराला मानाचा मुजरा. एखाद्या कलाकाराचा जन्म एखादी खास भूमिका साकारण्यासाठीच व्हावा, अशी नियतीची योजना असू शकते. त्या कलाकाराने एकदा ही भूमिका साकारल्यानंतर पुन्हा त्या भूमिकेत दुसऱ्या कोणत्याही कलाकाराचा विचारही केला जाऊ शकत नाही. अशा काही अगदीच मोजक्या कलाकारांमध्ये माधव वझे यांचं नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. विष्णूपंत पागनीस यांनीही संत तुकारामांची भूमिका अशीच अजरामर करून ठेवली आहे. पण बालवयात ‌‘श्यामची आई‌’मधला श्याम इतक्या समरसतेने रंगवण्याची ही चित्रसृष्टीच्या इतिहासातील अनोखी घटना म्हणावी लागेल.

माधव वझे यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाल्यानंतर त्यांचा उत्साही, हसरा आणि निरागस चेहरा डोळ्यांसमोर तरळून गेला. या वयातही पूर्ण कार्यक्षमतेने काम करणारे आणि जिन्याच्या पायऱ्या भरभर उतरून आपली दुचाकी घेऊन सगळीकडे फिरणारे माधव वझे आजही डोळ्यांसमोर दिसतात. ‌‘श्यामची आई‌’ नंतर फारसे चित्रपट न केल्याचे कारण विचारल्यावर ते नेहमी म्हणत, ‌‘श्यामची आई‌’ आणि ‌‘वहिनीच्या बांगड्या‌’ केल्यानंतर वडिलांनी स्पष्ट सांगितलं की आता प्रथम शिक्षण पूर्ण करायचं, पोटापाण्याची व्यवस्था करायची आणि नंतरच चित्रपट आणि नाटकांचा विचार करायचा. अर्थात त्या काळाचा विचार केला तर त्यांचे म्हणणे बरोबरच होते. पण विशेष माधव वझे यांचे वाटते की त्यांनी वडिलांचा सल्ला तंतोतंत पाळला.

माधव वझे यांनी पुण्याच्या वाडिया कॉलेजमध्ये इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून काम केले. तिथेही ते विद्यार्थीप्रिय प्राध्यापक ठरले. प्राध्यापक म्हणून काम करत असताना त्यांची कलेची सेवाही सुरू होती. त्यांनी अनेक प्रायोगिक नाटके दिग्दर्शित केली आणि त्यात अभिनयही केला. त्याचवेळी ते जाणकार नाट्यसमीक्षक म्हणूनही नावारूपाला आले. खरे तर आज अवघे कलाविश्व त्यांना साक्षेपी नाट्यसमीक्षक म्हणून अधिक ओळखते. निवृत्तीनंतर मात्र त्यांनी कलेला पूर्णपणे वाहून घेतले. परशुराम देशपांडे यांनी मराठीत रूपांतरित केलेल्या शेक्सपियरच्या ‌‘हॅम्लेट‌’ या नाटकाचे दिग्दर्शन त्यांनी केले होते. २०१३ मध्ये रंगमंचावर आलेल्या या नाटकात कनक दात्ये आणि नेहा महाजन यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. वझे यांनी राज्य नाट्य स्पर्धेमध्ये उत्कृष्ट अभिनयासाठी रौप्यपदके मिळवली. त्यांनी भारतीय आणि पाश्चात्य प्रथितयश नाटककारांच्या नाटकांच्या प्रयोगाचे दिग्दर्शन केले. गोवा येथील कला अकादमीच्या नाट्य विभागामध्ये अभ्यागत प्राध्यापक म्हणून काम करणारे वझे आंतरराष्ट्रीय नाट्य समीक्षक संघाचे सभासद होते. नाट्य संघाच्या देश-परदेशातील अधिवेशनामध्ये त्यांनी शोधनिबंध सादर केले. आंतरराष्ट्रीय नाट्य समीक्षक संघाच्या माध्यमातून त्यांनी अनेक देशांना भेटी दिल्या. त्या दौऱ्यांमध्ये त्या-त्या ठिकाणच्या रंगभूमीचा अभ्यास करण्याचे मोठे काम त्यांनी केले.

देशातील विविध ठिकाणच्या रंगकर्मींना आपल्या या अनुभवाचा फायदा व्हावा असे त्यांना मनापासून वाटे आणि या नवरंगकर्मींना मार्गदर्शन करण्यास ते सदैव तयार असत.‘श्यामची आई‌’ शिवाय त्यांनी २००९ मध्ये आलेल्या ‌‘३ इडियट्स‌’, २०१६ मध्ये आलेल्या ‌‘डिअर जिंदगी‌’, २०१९ मध्ये आलेल्या ‌‘छप्पर फाड के‌’ अशा काही हदी चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. ‌‘थ्री इडियट्स‌’मधील आत्महत्या केलेल्या तरूण मुलाच्या वडिलांची भूमिका अगदी काही सेकंदांचीच होती; पण तगड्या अभिनेत्यांच्या गर्दीतही मुलाच्या अंत्यविधीच्या वेळी शोकातिरेकाने रडणारे वडील विशेष लक्षात राहतात, यातच त्यांच्यातील अभिनेत्याचे यश आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान माधव वझे आणि आमीर खान यांच्यात रंगभूमी आणि मेथड अभिनयावर सखोल चर्चा झाली. वझे यांची भेट होण्यापूर्वी आमीर खानने त्यांच्याबद्दलची सर्व माहिती मिळवली होती. त्यावेळी वझे यांनी आमीरला मेथड ॲक्टिंगचे ट्रेनिंग दिले, असेही म्हटले जाते. १९५३ मध्ये ‌‘श्याम‌’ साकारल्यानंतर त्याच वर्षी त्यांचा ‌‘वहिनीच्या बांगड्या‌’ हा दुसरा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटालाही रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. त्यात माधव वझे यांनी छोट्या दिराच्या भूमिकेचे अक्षरश: सोने केले.

अभिनय, दिग्दर्शन आणि नाट्यसमीक्षा याबरोबरच त्यांचे विविध वृत्तपत्र आणि नियतकालिकांमध्ये लिखाण नियमित सुरू होते. पूर्वीच्या लेखकांप्रमाणे तेही कागदावर पेनने लेख लिहीत. पण काळ बदलला त्याप्रमाणे वृत्तपत्रे आणि नियतकालिकांच्या मागणीतही बदल झाला. प्रत्येकाला आता संगणकावर टाईप केलेले लेख हवे होते. वझे यांनी या वयात संगणकावर लेख टाईप करणे आणि नंतर ते संबंधितांना इमेल करणे हे सगळे शिकून घेतले. विशेष म्हणजे याबद्दल त्यांनी कधीही तक्रार केली नाही. एखादी नवी गोष्ट शिकताना त्यांच्या चेहऱ्यावर एखाद्या लहान मुलाप्रमाणे कुतूहलमिश्रित जिज्ञासा दिसायची. उतरत्या वयात या गोष्टी शिकणे बरेच कठीण असू शकते, हे बऱ्याच ज्येष्ठ नागरिकांना माहीत आहे; परंतु वझे यांनी हे आव्हान कपाळावर एकही आटी येऊ न देता लीलया पेलले. एखाद्या मोठ्या कलाकाराने आत्मचरित्र लिहावे, त्याची जोरदार प्रसिद्धी करावी आणि स्वत:च त्याचे गोडवे गात फिरावे ही सर्वसाधारण प्रथा. पण माधव वझे यांनी लिहिलेले ‌‘श्यामची आई, आचार्य अत्रे आणि मी‌’ हे आत्मचरित्र याला अपवाद ठरते. एक तर यात कुठेही असामान्य कार्य केल्याचा आव नाही. न समजणाऱ्या, जड शब्दांचा भडीमार नाही. सहजसोपी शैली आणि वाचकाशी संवाद साधत त्यांना गुंतवून ठेवणारे हे पुस्तक एका बैठकीत वाचून काढावे असे आहे.

यातही गंमत अशी आहे की, १९५३ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटाबद्दल त्यांना आत्ता का लिहावेसे वाटले असेल असा प्रश्न पडतो. या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाच्या वेळी त्यांनीच या प्रश्नाचे उत्तर दिले होते. ते म्हणाले, आपल्याला आत्मचरित्र किंवा काही आठवणी लिहायच्या असतील, तर त्या प्रामाणिकपणे लिहिता यायला हव्यात. ‌‘श्यामची आई‌’शी संबंधित काही व्यक्ती हयात असताना आपल्याला वाटते ते जसेच्या तसे लिहिणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांनी हे पुस्तक इतक्या उशिरा लिहिण्याचा निर्णय घेतला आणि अगदी प्रामाणिकपणे लिहिले, हे वाचताना नक्की जाणवते. या पुस्तकात त्यांनी ‌‘श्यामची आई‌’च्या चित्रीकरणाच्या वेळच्या अनेक आठवणींना उजाळा दिला आहे. पुण्यातील टिपिकल वाड्यात वाढलेल्या लहानग्या माधवची राहण्याची व्यवस्था मुंबईत अत्र्यांच्या घरी करण्यात आली होती. अत्र्यांच्या घरातले वातावरण मात्र अगदी पाश्चात्य पद्धतीचे होते. त्यामुळे माधवची तिथे काहीशी घुसमट होऊ लागली. त्याच्या अभिनयात अत्र्यांनी पूर्वी पाहिलेली सहजता दिसेना. पर्यायाने कलाकार बदलण्याचा निर्णय घेण्यापर्यंत वेळ आली. शेवटी अत्र्यांच्याच टीममधल्या कोणी तरी त्याला स्वत:च्या घरी एका चाळीसारख्या ठिकाणी राहायला नेले. तिथे गेल्यावर माधवला घरातल्यासारखे वाटले, त्याच्या अभिनयात सहजता आली आणि पुढे इतिहासच घडला.
वनमालाबाईंबद्दलच्या अनेक आठवणीही त्यांनी या पुस्तकात शब्दबद्ध केल्या आहेत.

‘भरजरी गं पितांबर दिला फाडून‌’ हे गीत स्वत: प्र. के. अत्रे यांनी लिहिले आहे. हे गीत लिहीत असतानाचा प्रसंग वझे यांनी फारच छान वर्णन केला आहे. कर्जाचे थकलेले हप्ते वसूल करण्यासाठी वसूली अधिकारी आला तेव्हा ते हे गीत लिहीत होते... त्यावेळी माधव वझेही तिथे हजर होते. अत्र्यांनी त्या अधिकाऱ्याला थोडे पैसे काढून दिले आणि पुन्हा गीतलेखनात मग्न झाले. अशा परिस्थितीत इतक्या अवीट गोडीचे गीत त्यांच्या लेखणीतून उतरले, यातच त्यांची प्रतिभा दिसते. आता ‌‘श्यामची आई‌’मधील सर्व कलाकार इहलोक सोडून गेले आहेत. मध्यंतरी वनमालाबाई गेल्या तेव्हा या टीममधले आपणच मागे उरलो असल्याचे ते म्हणाले होते. आता आईचा लाडका श्यामही त्याच्या आईकडे गेला. ही टीम परलोकी पुन्हा एकत्र आली तर ‌‘श्यामची आई‌’सारखीच दर्जेदार कलाकृती तिथेही तयार होईल हे नक्की.
Comments
Add Comment