
साधारण एक जून पर्यंत केरळमध्ये मान्सून पोहोचतो. पण यंदा मान्सून केरळमध्ये २७ मे पर्यंत पोहोचेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मागील पाच वर्षांत दोनवेळा मान्सून १ जूनच्या आधी केरळमध्ये पोहोचला आहे. केरळमध्ये २०२४ मध्ये ३० मे तर २०२२ मध्ये २९ मे रोजी मान्सून पोहोचला होता.
वायव्य भारतातील किमान तापमान, दक्षिण द्वीपकल्पामध्ये मान्सूनपूर्व काळामध्ये पडणारा पाऊस, इंडोनेशियावरील वरच्या थरातील उष्णकटिबंधीय क्षेत्रीय वारा, ईशान्य हिंदी महासागरावरील खालच्या थरातील उष्णकटिबंधीय क्षेत्रीय वारा, दक्षिण चीन समुद्रावरील थर्मल रेडिएशन, उष्णकटिबंधीय वायव्य प्रशांत महासागरावरील समुद्रसपाटीचा सरासरी दाब हे तपासून भारतात मान्सून कधीपर्यंत पोहोचणार याचा अंदाज हवामान विभाग व्यक्त करतो. यंदाही याच निकषांच्या आधारे हवामान विभागाने मान्सूनच्या आगमनाची भाकीत वर्तवले आहे. वातावरणात आयत्यावेळी बदल झाला तर या अंदाजात चार ते सात दिवस पुढे - मागे फरक पडण्याची शक्यता असते.
केरळमध्ये मान्सून पोहोचल्यानंतरच महाराष्ट्रात कधी पर्यंत पोहोचणार याचा नेमका अंदाज वर्तवणे सोपो जाते. प्राथमिक अंदाजानुसार मुंबईत १० जून आणि महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात १५ जून पर्यंत मान्सून पोहोचण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रात पश्चिम किनारपट्टीला समांतर मुंबईकडे येणाऱ्या मान्सूनच्या प्रवाहात किती ताकद आहे याचाही महाराष्ट्रात येणाऱ्या मान्सूनवर परिणाम होऊ शकतो. यामुळे केरळमध्ये मान्सून पोहोचला की महाराष्ट्राबाबतचा नेमका अंदाज वर्तवता येईल, असे हवामान विभागाने सांगितले. मध्य महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये तसेच मराठवाडा, विदर्भ येथे १४ मेपर्यंत अवकाळी पावसाची शक्यता आहे, असेही हवामान विभागाने सांगितले. अवकाळी पावसामुळे राज्यातील निवडक जिल्ह्यांचे तापमान कमी होण्यास मदत होण्याचीही शक्यता आहे.