
कणकवली रेल्वे स्थानकातील ममता कक्षाचे ना. नितेश राणेंच्या हस्ते लोकार्पण
कणकवली : कणकवली रेल्वे स्थानकात स्तनदा मातांसाठी ममता कक्ष सुरू करण्यात आला आहे. यापुढील काळात जिल्ह्यातील कोकण रेल्वेच्या इतर रेल्वे स्थानकावर ममता कक्ष उभारण्यात येणार आहे. हे कक्ष उभारण्यासाठी रेल्वे प्रशासनाने मान्यता दिली आहे. याबद्दल मी प्रशासनाचे आभार मानतो, असे प्रतिपादन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले.
कणकवली रेल्वेस्थानक परिसरात पालकमंत्री नितेश राणे यांच्या सहकार्यातून ममता कक्ष उभारण्यात आला आहे. त्याचे लोकार्पण मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ना. नितेश राणे बोलत होते.
यावेळी शैलेंद्र बापट, विभागीय रेल्वे व्यवस्थापक गोकुळ सोनवणे, रेल्वे सुरक्षा आयुक्त, घनश्याम नागले, जी. पी. प्रकाश, सचिन देसाई, मधुकर मातोंडकर आदी रेल्वेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. मंत्री राणे म्हणाले, कोकणवासीयांसाठी रेल्वे हे प्रवासाचे मुख्य साधन आहे. त्यामुळे रेल्वेच्या प्रवाशांना प्रवासात व रेल्वे स्थानकांत चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणे, कोकण रेल्वे प्रशासनाची जबाबदारी आहे. नागरिकांना जलद प्रवास करता यावा, याकरिता रस्तेमार्ग व जल वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम राज्य सरकार करीत आहे. रेल्वेच्या प्रवाशांना चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात ही आमची इच्छा आहे. या सुविधा उपलब्ध होण्यासाठी आम्हाला रेल्वे प्रशासनाने सहकार्य केले पाहिजे. ममता कक्ष उभारण्यासाठी रेल्वे प्रशासनाने सहकार्य केल्याबद्दल मी रेल्वेच्या अधिकाऱ्यांचे आभार मानतो. लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही रेल्वे प्रशासनाच्या नेहमीच संपर्कात असतो. मात्र, रेल्वेसंबंधित कामांबाबत त्वरित प्रतिसाद मिळत नाही. ममता कक्ष उभारण्यासाठी रेल्वे प्रशासनाने जलद कार्यवाही केली, अशाप्रकारचे सहकार्य रेल्वे संबंधित प्रश्नांबाबत प्रशासनाने लोकप्रतिनिधींना करावे, अशी अपेक्षा राणेंनी व्यक्त केली. आरंभी मंत्री नितेश राणे यांनी ममता कक्षाचे फित कापून उद्घाटन केले. मंत्री राणे यांच्या हस्ते शैलेंद्र बापट आणि रमेश मालवीय यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी रेल्वेचे कर्मचारी, प्रवासी व भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते.