
मुंबई : महाराष्ट्रात उद्धव सरकार सत्तेत असताना आणि कोरोना संकट आले असताना खिचडी पाकीट वाटपाचा घोटाळा झाला. या घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने आठ आरोपींच्या विरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सूरज चव्हाण, अमोल कीर्तिकर, सुजित पाटकर यांचा आरोपींमध्ये समावेश आहे. पोलिसांनी आरोपींवर १४.५७ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला आहे.
मेसर्स वैष्णवी किचन, सह्याद्री रिफ्रेशमेंटचे भागीदार आरोपी सुनील कदम उर्फ बाळा कदम, राजीव साळुंखे, सुजित पाटकर, तसेच ‘फोर्स वन मल्टी सर्व्हिसेस’चे भागीदार संजय म्हशिलकर, प्रांजल म्हशिलकर, प्रीतम म्हशिलकर, सूरज चव्हाण, अमोल गजानन कीर्तिकर यांनी एप्रिल २०२० ते जुलै २०२० या कालावधीत मोफत वाटप करण्यात आलेल्या खिचडीमध्ये घोटाळा केल्याचा आरोप करण्यात आला होता. याबाबत तक्रार आल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने प्राथमिक चौकशी केली.
गैरमार्गाने खिचडीवाटपाचे कंत्राट मिळविणे, पात्रता निकषामध्ये बसत नसतानाही कंत्राट घेणे, ३०० ग्रॅमचे पाकीट द्यायचे असतानाही नफा मिळविण्याच्या उद्देशाने १००-२०० ग्रॅम वजनाची खिचडी पाकिटे तयार करणे, असे गैरव्यवहार केल्याचे चौकशीतून समोर आले आहे. फक्त १००-२०० ग्रॅमची खिचडी पाकिटे अंदाजे २२ ते २४ रुपये अशा वेगवेगळ्या दरांनी घेऊन महापालिकेकडून मात्र प्रतिपाकीट ३३ रुपये घेण्यात आले. या फसवणुकी प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला.
‘फोर्सवन मल्टी सर्व्हिसेस’चे मालक संजय म्हशीलकर, प्रांजल म्हशीलकर व प्रीतम म्हशीलकर यांनी संगनमताने स्नेहा कॅटरर्सचे संजय माळी यांच्याकडून खिचडी बनवून घेतली. खिचडी वाटप योजनेकरीता पात्र नसल्याचे माहिती असताना सूरज चव्हाण आणि अमोल कीर्तिकर यांच्या मदतीने खिचडीवाटपाचे कंत्राट मिळविले आणि यासाठी बनावट दस्तावेज वापरले, असे आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासादरम्यान उघड झाले आहे.