Monday, May 12, 2025

देशमहत्वाची बातमी

'सर्व लक्ष्य साध्य झाले, सर्व भारतीय वैमानिक सुरक्षित परतले...', लष्कराने दिली ऑपरेशन सिंदूरची संपूर्ण माहिती

'सर्व लक्ष्य साध्य झाले, सर्व भारतीय वैमानिक सुरक्षित परतले...', लष्कराने दिली ऑपरेशन सिंदूरची संपूर्ण माहिती

नवी दिल्ली: दिनांक ७ मे रोजी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी छावण्यांवर, ऑपरेशन सिंदूरद्वारे करण्यात आलेल्या हवाई हल्ल्याची आणि त्यानंतर उद्भवलेल्या परिस्थितीत पाकिस्तानविरुद्धच्या कारवाईची माहिती देण्यासाठी तिन्ही भारतीय सैन्यांनी रविवारी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत, नौदल ऑपरेशन्सचे महासंचालक (डीजीएनओ) व्हाइस अॅडमिरल एएन प्रमोद, भारतीय हवाई दलाचे महासंचालक एअर ऑपरेशन्स एअर मार्शल ए.के. भारती आणि डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी 'ऑपरेशन सिंदूर' संबंधित संपूर्ण माहिती दिली.


रविवारी झालेल्या या पत्रकार परिषदेत  एअर मार्शल ए.के. भारती म्हणाले की, आम्ही ठरवलेले लक्ष्य पूर्णपणे साध्य केले आहे आणि आमचे सर्व वैमानिक सुरक्षितपणे घरी परतले आहेत. भारतीय सशस्त्र दलांबद्दल ते म्हणाले की, आमचे सैन्य सध्या अतिशय सतर्क आहेत आणि कोणत्याही संभाव्य धोक्याला तोंड देण्यासाठी सज्ज आहेत.


एअर मार्शल ए.के. भारती यांनी स्पष्टपणे सांगितले की भारताचे उद्दिष्ट शत्रूला योग्य उत्तर देणे आहे आणि मृतदेह मोजणे नाही. ते पुढे असे देखील म्हणाले की, आम्ही ज्या काही पद्धतीचा आणि साधनांचा वापर केला, त्यांचा शत्रूवर इच्छित परिणाम झाला आहे. त्यामुळे किती जण मारले गेले? किंवा किती जण जखमी झाले? हे मोजणे आमचे काम नाही.  एअर मार्शल भारती यांनी स्पष्ट केले की भारताचे उद्दिष्ट अनावश्यक विनाश नाही तर दहशतवादाशी थेट जोडलेले लक्ष्य नष्ट करणे आहे.



'आम्ही तिथे हल्ला केला जिथे पाकिस्तानला सर्वात जास्त नुकसान झाले', एअर मार्शल एके भारती


एअर मार्शल एके भारती म्हणाले की, भारताने पाकिस्तानवर हल्ला केला जिथे त्याचे सर्वात जास्त नुकसान झाले. आम्ही संपूर्ण पश्चिम आघाडीवरील पाकिस्तानच्या हवाई दलाच्या तळांवर, कमांड सेंटरवर, लष्करी पायाभूत सुविधांवर आणि हवाई संरक्षण प्रणालींवर लक्ष्य केले. भारतीय हल्ल्यांमध्ये चकलाला, रफिक आणि रहीम यार खान सारख्या महत्त्वाच्या हवाई तळांचा समावेश होता. यानंतर, सरगोधा, भुलारी आणि जेकबाबाद सारख्या इतर महत्त्वाच्या लष्करी तळांवरही हल्ला करण्यात आला. ते म्हणाले की, या सर्व ठिकाणांच्या प्रत्येक यंत्रणेला लक्ष्य करण्याची आणि त्यापलीकडे जाण्याची पूर्ण क्षमता आमच्याकडे आहे.



'३ दिवस चाललेला संघर्ष युद्धापेक्षा कमी नव्हता, आमचे ५ सैनिक शहीद झाले' - डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई


डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी पाकिस्तानी सैन्याच्या झालेल्या नुकसानीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, नियंत्रण रेषेवर (एलओसी) ३५-४० पाकिस्तानी सैनिक मारले गेल्याच अंदाज आहे.  जेव्हा ऑपरेशन सिंदूर सुरू करण्यात आले तेव्हा पाकिस्तानी सैन्याने भारतीय सैन्य आणि भारतीय सशस्त्र दलांच्या पायाभूत सुविधांनाही लक्ष्य केले. ते म्हणाले की, आमचे लक्ष्य फक्त दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर होते, पण जेव्हा पाकिस्तानने आमच्या पायाभूत सुविधांवर हवाई घुसखोरी आणि हवाई कारवाया सुरू केल्या तेव्हा आम्ही जड शस्त्रे वापरली.  ते पुढे असे देखील म्हणाले की "३ दिवस चाललेला संघर्ष हा एखाद्या युद्धापेक्षा कमी नव्हता. आमचे सर्व वैमानिक सुखरूप परतले आहेत." ऑपरेशन सिंदूरमध्ये आपले ५ सैनिक शहीद झाल्याचेही त्यांनी सांगितले.



अरबी समुद्रात केली गेली 'ऑपरेशन सिंदूर' ची चाचणी


भारतीय नौदलाचे महासंचालक नौदल ऑपरेशन्स (डीजीएनओ), व्हाइस अॅडमिरल ए.एन. प्रमोद म्हणाले की, पहलगाम हल्ल्यानंतर, भारतीय नौदलाचे वाहक युद्ध गट, पृष्ठभागावरील लढाऊ युनिट्स, पाणबुड्या आणि नौदल विमान वाहतूक संसाधने पूर्ण युद्ध तयारीत समुद्रात तैनात करण्यात आली होती. ते म्हणाले की, हल्ल्याच्या ९६ तासांच्या आत, आम्ही अरबी समुद्रात अनेक शस्त्र चाचण्यांदरम्यान आमच्या रणनीती आणि ऑपरेशनल प्रक्रियांची चाचणी घेतली आणि त्यात सुधारणा केल्या. भारतीय नौदलाच्या शक्तिशाली उपस्थितीमुळे पाकिस्तानला त्यांचे नौदल आणि हवाई दल बंदरे आणि किनारी भागात मर्यादित ठेवावे लागले, ज्यावर सतत लक्ष ठेवले जात असे.



कराची देखील लक्ष्य होते


व्हाइस अॅडमिरल प्रमोद यांनी 'ऑपरेशन सिंदूर' संबंधित झालेल्या या पत्रकार परिषदेत एक धक्कादायक खुलासा केला. ते म्हणाले की, आमची शत्रूवर प्रत्युत्तराची पद्धत संयमी, संतुलित, चिथावणीखोर आणि जबाबदार होती. गरज पडल्यास हल्ला होऊ शकेल अशा ठिकाणांना लक्ष्य करण्याची तयारी देखील आम्ही केली होती. ज्यामध्ये कराचीचाही समावेश होता. त्यांनी असेही स्पष्ट केले की भारतीय नौदल अजूनही पूर्ण ताकदीने समुद्रात उपस्थित आहे आणि कोणत्याही प्रतिकूल कृतीला निर्णायक प्रत्युत्तर देण्यास ते सज्ज आहेत.



शस्त्रसंधीनंतर काही तासांतच पाकिस्तानने केले उल्लंघन


शनिवारी, १० मे रोजी संध्याकाळी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीची अधिकृत घोषणा केली होती. त्याला काही तास होत नाहीच तोच, पाकिस्तानने त्याचे उल्लंघन केले.  श्रीनगरसह, भारताच्या  अनेक भागात पाकिस्तानचे ड्रोन आणि स्फोटांचे आवाज ऐकू आले. पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्यानंतर काही तासांतच भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने कठोर भूमिका घेतली आहे. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानच्या या कृतीला प्रत्युत्तर देण्यासाठी लष्कराला कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Comments
Add Comment