
नवी दिल्ली : पाकिस्तान आणि भारत यांच्यात सुरू झालेली लढाई आणखी तीव्र होईल असे वाटत असतानाच दोन्ही देशांनी शस्त्रसंधी करत असल्याचे जाहीर केले. या निर्णयामुळे अनेकजण चक्रावले. वेगवेगळे तर्कवितर्क सुरू झाले. पण ज्यांनी या घडामोडी अतिशय जवळून बघितल्या त्यांना पाकिस्तानने शस्त्रसंधीचा प्रस्ताव का सादर केला हे व्यवस्थित समजले. भारताच्या हवाई हल्ल्यांमध्ये पाकिस्तानच्या ११ हवाई तळांचे नुकसान झाले. हे तळ वापरता येणार नाही अशा स्थितीत पोहोचले. पाकिस्तानच्या AWACS हवाई संरक्षण प्रणालीचे नुकसान झाले. भारतीय सैन्याने वेगाने केलेल्या कारवाईमुळे पाकिस्तानच्या सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या अनेक पायाभूत सुविधांचे नुकसान झाले. पाकिस्तानच्या सैन्याचा कणा पुरता मोडला. भारतासोबत झालेल्या संघर्षामुळे आतापर्यंत पाकिस्तानचे अब्जावधी रुपयांचे अवघ्या चार - पाच दिवसांत नुकसान झाले. कोट्यवधी रुपयांची शस्त्रे नष्ट झाली. भारताने पाकिस्तानला चार दिवसांत चार मोठे धक्के दिले.
१. पाकिस्तानचे ११ हवाई तळ उद्ध्वस्त
भारतीय सैन्याने पाकिस्तानचे ११ हवाई तळ उद्ध्वस्त केले. नूर खान/चकलाला एअरबेस (रावळपिंडी), पीएएफ बेस रफीकी (शोरकोट), मुरीद एअरबेस (पंजाब), सुक्कुर एअरबेस (सिंध), सियालकोट एअरबेस (पूर्व पंजाब), पसरूर एअरस्ट्रीप (पंजाब), चुनियन (रडार/सपोर्ट इन्स्टॉलेशन), सरगोधा (मुशफ बेस) एअरबेस, स्कार्डू एअरबेस (गिलगिट-बाल्टिस्तान), भोलारी एअरबेस (कराचीजवळ) आणि जेकोबाबाद एअरबेस (सिंध-बलुचिस्तान) यांचे भारताने नुकसान केले.
२. पाकिस्तानची AWACS हवाई संरक्षण प्रणाली
भारताने पाकिस्तानची AWACS (एअरबॉर्न वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टीम) हवाई संरक्षण प्रणाली नष्ट केली. पाकिस्तानच्या एका AWACS ची किंमत पाच हजार ८४५ कोटी रुपये होती. यामुळे AWACS नष्ट झाल्याने पाकिस्तानचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले.
३. भारताच्या कारवाईत पाच मोठ्या दहशतवाद्यांसह किमान १०० दहशतवादी ठार
भारताने 'ऑपरेशन सिंदूर'द्वारे पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये कारवाई केली. या कारवाईत पाच मोठ्या दहशतवाद्यांसह किमान १०० दहशतवादी ठार झाले. मुदस्सर खादियान, हाफिज मुहम्मद जमील, मोहम्मद युसूफ अझहर, खालिद उर्फ अबू अक्सा आणि मोहम्मद हसन खान हे पाच मोठे दहशतवादी ठार झाले.
४. दहशतवाद्यांचे लाँचपॅड नष्ट
भारताच्या ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तानमधील दहशतवादाचा कणा जवळजवळ मोडला आहे. भारतीय सैन्याने दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला केला. भारतीय हल्ल्यांमध्ये दहशतवादी लाँचपॅडपासून त्यांच्या मुख्यालयापर्यंत सर्व काही उद्ध्वस्त झाले आहे.
भारताने केलेल्या कारवाईत पाकिस्तानच्या सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या अनेक पायाभूत सुविधांचे नुकसान झाले. पाकिस्तानच्या सैन्याचा कणा पुरता मोडला. पाकिस्तानच्या लष्कराच्या अनेक पायाभूत सुविधा, दहशतवाद्यांचे लाँचपॅड, पाकिस्तानचे हवाई तळ, तसेच पाकिस्तानच्या लष्कराच्या कमांड-अँड-कंट्रोल सेंटर्स, रडार साइट्स आणि शस्त्रास्त्रे साठवण्याच्या क्षेत्रांचे नुकसान झाले. पाकिस्तानच्या पसरूर आणि सियालकोट हवाई तळांची रडार प्रणाली आणि हवाई संरक्षण प्रणाली नष्ट झाली. दहशतवादी हल्ला केला किंवा भारतीयांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला तर भारत कुठेही आणि कधीही जाऊन हल्ला करण्यास समर्थ आहे, याची जाणीव पाकिस्तानला झाला. तसेच दहशतवाद संपेपर्यंत सिंधू नदी पाणी वाटप करार स्थगित राहणे म्हणजे स्वतःचे मोठे नुकसान करुन घेण्यासारखे आहे, याची जाणीव पाकिस्तानला झाली. यामुळे पाकिस्तानने शस्त्रसंधीचा प्रस्ताव भारतापुढे सादर केला आहे.