Sunday, May 11, 2025

महामुंबईमहाराष्ट्रब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

मुंबईत दोन कोटींचा हायड्रोपोनिक गांजा जप्त

मुंबईत दोन कोटींचा हायड्रोपोनिक गांजा जप्त

मुंबई : मुंबई पोलिसांच्या अंमलीपदार्थ विरोधी पथकाने विदेशातून विमानाने तस्करी करुन शहरात आणलेला सुमारे दोन कोटी रुपयांचा हायड्रोपोनिक गांजा (वीड) जप्त केला. या प्रकरणात पोलिसांनी ३७ वर्षांच्या वीरू ठाकूर याला अटक केली आहे. अंमलीपदार्थ विरोधी पथकाच्या घाटकोपर कक्षाला अंधेरीच्या लोखंडवाला परिसरात हायड्रोपोनिक गांजाची मोठी खेप उतरल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच सापळा रचून पोलिसांनी विदेशी गांजाची तस्करी करणाऱ्या वीरू ठाकूर याला अटक केली. त्याच्याकडे सुमारे दोन किलो गांजाचा साठा सापडला. हा साठा बँकॉक, मलेशिया, थायलंड या देशातून आलेल्या प्रवाशांमार्फत तस्करी करुन भारतात आणला होता. प्रवाशांनी सामानात लपवून प्रामुख्याने कॉर्नफ्लेक्सच्या डब्यांमध्ये दडवून गांजा विमानातून मुंबईत आणला होता.


वांद्रे, खार, सांताक्रूझ, विलेपार्ले, ओशिवरा या भागातील श्रीमंत, उद्योगपती, व्यावसायिकांची तरुण मुले, बॉलीवूडमध्ये कार्यरत मंडळी यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी हा गांजा मुंबईत आणण्यात आला होता. वीरू ठाकूरच्या संपर्कातील व्यक्तींची माहिती समोर येताच भरपूर माहिती उघड होण्याची शक्यता आहे.


हायड्रोपोनिक गांजा


हायड्रोपोनिक गांजा हा उच्च प्रतीचा गांजा आहे. इतर प्रकारांपेक्षा हा गांजा तुलनेने महाग असल्याने श्रीमंत, उच्चभ्रू वर्गामध्ये याला मागणी आहे. विदेशातून तस्करी करुन मुंबईत हा गांजा आणण्यासाठी मोठी साखळी कार्यरत असावी असा पोलिसांचा अंदाज आहे. यामुळे तस्करी करणाऱ्या संपूर्ण यंत्रणेची माहिती मिळवून कारवाई करण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.

Comments
Add Comment