Saturday, May 10, 2025

किलबिल

सुवर्णपदक

सुवर्णपदक

प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ


१९१२ सालच्या ऑलिम्पिकमध्ये ओक्लाहोमाच्या भारतीय, अमेरिकन जिमने धावण्याच्या शर्यतीत अमेरिकेचे प्रतिनिधित्व केले होते, असा उल्लेख करून खाली एक फोटो दिला होता त्या फोटोत त्या व्यक्तीने दोन्ही पायांत वेगवेगळ्या आकाराचे रंगाचे बूट घातलेले होते. गंमत म्हणजे एका बुटामध्ये चार-पाच मोजे घातल्यासारखे वाटत होते, तर दुसऱ्या बुटात एकच मोजा होता.


हा फोटो पाहताना गंमत वाटली आणि त्याच्याविषयी अधिक माहिती मिळवताना कळले की हा व्यक्ती म्हणजे ‘जिम थोर्प.’ तर धावण्याची शर्यत सुरू होण्याआधी त्याचे बूट चोरीला गेले अशा वेळेस तो अनेक कारणे देऊन स्पर्धेपासून दूर राहू शकला असता. त्याने या स्पर्धेत भाग घेऊ नये यासाठीच तर कोणीतरी बूट चोरण्याचा प्रपंच केला होता. जिमने थोडी शोधाशोध केली त्याला त्याचे बूट काही सापडू शकले नाहीत; परंतु त्याला एका कचऱ्याच्या बादलीत दोन वेगवेगळ्या आकाराचे, रंगाचे कोणीतरी फेकून दिलेले बूट सापडले. एक त्याच्या पायाच्या मापाचा असावा, तर दुसरा पायापेक्षा मोठा असावा आणि म्हणूनच त्याने धावताना मोठा असणारा बूट पडू नये म्हणून त्याखाली जास्त मोजे घातले. तो धावला. पायातली बूट विसरून त्याने आपले लक्ष काय आहे याचा फक्त विचार केला आणि आत्मविश्वासाने धावला त्याचा फायदा असा झाला की, त्या दिवशी त्याला धावण्याच्या स्पर्धांमध्ये दोन सुवर्णपदकं प्राप्त झाली.


आता आपण आपला स्वतःचा विचार करूया. जेव्हा आपल्या आयुष्यात कठीण प्रसंग निर्माण होतात तेव्हा आपल्याला त्याला कसे तोंड द्यायचे हे लक्षात येत नाही, आपली चिडचिड होते, आपले काहीतरी चुकते, आपण निराश होतो, दुःखी होतो आणि त्या अस्वस्थ मानसिक अवस्थेतच राहिल्यामुळे आपण काहीच करत नाही आणि स्वाभाविकपणे आपल्या पदरी अपयश पडते!


सर्वात सोपे उदाहरण घेऊया. आपण रोजच दिवसातून चार वेळा काहीतरी खातो. आपण जे खातो तेच आपण असतो, असे म्हटले जाते. त्यामुळे उगाचच्या उगाच आपण याला त्याला दोष देणे बरोबर नाही. काय, किती आणि केव्हा खायचे हे आपण ठरवले, तर आपले वजन आटोक्यात येते. अनेक आजारांवर आपण मात करू शकतो; परंतु हे एक-दोन दिवस करून चालत नाही, तर सातत्याने अनेक दिवस, अनेक महिने, अनेक वर्षे आपल्याला करावे लागते. इतकी साधी गोष्ट लक्षात घेऊन आपण पुढचा विचार करूया


आपण जेव्हा दुसऱ्यांच्या आयुष्यात घडलेल्या घटना पाहून त्यांनी त्यावर कशाप्रकारे मात केली हे परत परत पाहत राहतो, ऐकत राहतो. सातत्याने चांगल्या गोष्टी आपल्या कानावर पडत राहिल्या की त्याचप्रमाणे आपले विचारही त्याचप्रमाणे प्रगल्भ होतात. अशा वेळेस अचानक जेव्हा एखाद्या प्रसंगाला आपल्याला तोंड देण्याची पाळी येते तेव्हा आपले विचार आपल्याला सकारात्मकतेकडे घेऊन जातात. आपण पर्याय शोधू लागतो आणि एखादा पर्याय त्या कठीण प्रसंगातून मार्ग काढायला उपयोगी पडतो. असे एकदा घडले की आयुष्यात कोणताही कठीण प्रसंग आला की आपण अधिक आत्मविश्वासाने दुसऱ्याही प्रसंगाला तोंड देण्यासाठी पर्याय शोधू लागतो.


‘जिम’ला जसे सुवर्णपदक मिळाले तसे कदाचित आपल्याला भव्य-दिव्य यश मिळू शकत नाही; परंतु वेळ निभावून नक्कीच नेऊ शकतो!


म्हणूनच म्हटले जाते सुवर्णपदकही सोन्याची बनलेली नसतात ती आपल्या कष्टाची, जिद्दीची, प्रयत्नांची, अभ्यासूवृत्तीची, सकारात्मक विचारांची आणि इतरांपेक्षा दोन पावलं अधिक विश्वासाने पुढे टाकल्याची बनलेली असतात.


त्यामुळे कोणत्याही प्रसंगात खचून न जाता, आत्महत्येचा विचार न करता केवळ कसे जगता येईल, याचा जरी विचार केला तरी ती गोष्ट फार महत्त्वाची आहे. कारण प्रत्येक माणसाचे आयुष्य कोणत्याही गोष्टीपेक्षा अधिक मौल्यवान असते!

Comments
Add Comment