
पुणे: शनिवारी रात्री ८:२५ ते रात्री ८:४५ पर्यंत पुणे विमानतळावर नियोजित आपत्कालीन ब्लॅकआउट ड्रिल घेण्यात आली. संभाव्य वीज खंडित झाल्यास किंवा इतर आपत्कालीन परिस्थितींना तोंड देण्यासाठी, विमानतळाची तयारी आणि प्रतिसाद तपासण्यासाठी ही ड्रिल घेण्यात आली.
यादरम्यान, विमानतळ परिसरातील सर्व दिवे आणि वीज व्यवस्था बंद करून या ड्रिलची सुरुवात झाली. विमानतळ कर्मचारी आणि आपत्कालीन प्रतिसादकर्त्यांनी विविध आपत्कालीन प्रक्रिया राबवल्या. येणाऱ्या विमानांना २०-३० मिनिटे फिरण्याचे निर्देश देण्यात आले. प्रवाशांना माहिती आणि शांत ठेवण्यासाठी ड्रिल दरम्यान नियमित घोषणा करण्यात आल्या.
विमानतळ संचालक संतोष ढोके यांनी याबद्दल माहिती देताना सांगितले की, "विमानतळाची तयारी आणि संभाव्य आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी आमची यंत्रणा कीती सुसज्ज आहे, याबद्दल घेतलेली चाचणी आपत्कालीन ब्लॅकआउट ड्रिलद्वारे यशस्वी झाली आहे. ड्रिलमुळे सामर्थ्य समजले आणि कुठे अजून सुधारणा करणे गरजेचं आहे हे देखील समजलं"
ढोके यांच्या मते, सिम्युलेटेड ब्लॅकआउटला सहज प्रतिसाद देण्यासाठी विमानतळाची आपत्कालीन प्रतिसाद योजना प्रभावी होती. विमानतळ कर्मचारी, विमान कंपन्या आणि हवाई वाहतूक नियंत्रण यांच्यातील संवाद समाधानकारक होता आणि ड्रिलच्या आधी आणि दरम्यान केलेल्या घोषणांमुळे प्रवाशांना माहिती आणि शांत राहण्यास मदत झाली.
लष्करी कारवाई थांबवण्याच्या सामंजस्य कराराचे पाकिस्तानने केले उल्लंघन
दरम्यान, शनिवारी पाकिस्तानने दोन्ही देशांच्या डीजीएमओंमध्ये गोळीबार आणि लष्करी कारवाई थांबवण्याबाबत झालेल्या सामंजस्य कराराचे काही तासांतच उल्लंघन केले आहे. भारतीय लष्कराने देखील त्याला चोख प्रत्युत्तर दिले.
एका विशेष परिषदेत परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री म्हणाले की दोन्ही देशांमध्ये झालेल्या या सामंजस्य कराराचे पाकिस्तानने उल्लंघन केले असून, भारत या उल्लंघनांची गंभीर दखल घेतो.