Saturday, May 10, 2025

कोलाज

"ऑपरेशन सिंदूर एक शपथ रक्ताने लिहिलेली"

निशा वर्तक


ते क्षण अजूनही काळजावर ओरखडे उमटवतात. पहलगाममध्ये जेव्हा यात्रेकरूंवर भ्याड हल्ला झाला, तेव्हा दहशतवाद्यांनी मुद्दाम पुरुषांना, त्यांच्या पत्नींच्या नजरेसमोर गोळ्या घातल्या. त्या क्षणी केवळ रक्त सांडलं नाही, तर सिंदूरही पुसला गेला-सिंदूर म्हणजे सौभाग्याच, मांगल्याच प्रतीक!तेच त्यांनी पुसले होते... त्या शोकांतिक घटनेनंतर, ज्या महिलांचे हात थरथरत होते, डोळे वाहत होते, त्याचं दुःख मौनात बोलू लागलं आणि त्यातून जन्म झाला : “ऑपरेशन सिंदूर”चा.


ही केवळ सैनिकी कारवाई नव्हे,...तर एका निरपराध स्त्रीच्या विधवा झालेल्या कपाळावर पुन्हा सिंदूर फुलवण्याची शपथ होती. ते होतं एक उत्तर-निर्घृणतेला मिळालेलं राष्ट्राचं प्रत्युत्तर. या ऑपरेशनचं नाव “सिंदूर” असणं म्हणजे एका प्रेमाच्या वियोगात पेटलेल्या क्रोधाची, आणि मातृभूमीवर झालेल्या जखमेच्या बदल्याची शांत पण असामान्य घोषणा होती. आता येथे समोर उभे आहेत देशाचे वीर सुपुत्र ज्यांच्या बंदुकीतून निघणारी प्रत्येक गोळी हेच म्हणते...‘हा सिंदूर पुन्हा पुसू देणार नाही!’


‘ऑपरेशन सिंदूर” ही शब्दकळा हे नावच इतके भन्नाट वाटले आणि अगदी समर्पक!


सारा देश, सारी जनता मॉक ड्रिलच्या तयारीत गुंतली होती आणि पाकड्याला गाफील ठेऊन पहाटे एक वाजता गनिमी कावा खेळून हे ‘आपरेशन सिंदूर’ यशस्वी झाले! ७ मे २०२५, पहाटेचा काळ. भारताच्या लष्करी इतिहासात हा दिवस एका सुवर्णपानासारखा कोरला गेला. ‘ऑपरेशन सिंदूर’. ही कारवाई केवळ एक लष्करी मोहीम नव्हती, तर ती होती भारताच्या संयमाचा, संकल्पाचा आणि सामर्थ्याचा उद्‍गार.


२२ एप्रिल २०२५ रोजी काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात २६ निरपराध नागरिकांचा बळी गेला. भारताने या हल्ल्याचा शांतपणे अभ्यास केला, संयम राखला, त्यानंतर योग्य वेळी योग्य ठिकाणी प्रतिशोध घेतला. अत्यंत अचूक, नियोजनबद्ध आणि केवळ दहशतवाद्यांवर केंद्रित हल्ला.



ऑपरेशन सिंदूर म्हणजे काय?


ऑपरेशन सिंदूर अंतर्गत, भारतीय हवाई दलाने, लष्कराने आणि नौदलाच्या विशेष पथकांनी मिळून पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी तळांवर २४ अचूक हल्ले केले. ही त्रिसेनात्मक कारवाई रात्री १. ५ वाजता सुरू झाली आणि काही तासांतच भारताने आपल्या ध्येयावर विजय मिळवला. विशेष बाब म्हणजे या हल्ल्यांमध्ये कोणतीही नागरी हानी झाली नाही. हे भारताच्या मूल्यांवर अधोरेखित करणारे आहे.


भारताने या कारवाईतून एक स्पष्ट संदेश दिला. आपण शांतता राखण्याचा पुरेपूर प्रयत्न करू, पण जर कोणी निरपराधांवर हात उचलला, तर आपण शांत बसणार नाही. भारत कुठल्याही प्रकारच्या दहशतवादाला आश्रय देणाऱ्यांनाही माफ करणार नाही, हे जगाला कळून चुकलं आहे. या मोहिमेत सहभागी झालेल्या जवानांनी प्रचंड धैर्य, शिस्त आणि कौशल्य दाखवलं. अशा कारवायांसाठी केवळ युद्धसामग्री नाही, तर असतो तो आत्मविश्वास, राष्ट्रभक्ती आणि बलिदानाची तयारी. ‘ऑपरेशन सिंदूर’ हे त्या सर्व गुणवत्तांचं जिवंत उदाहरण आहे.


जगभरातून भारताच्या या संयमी पण निर्णायक कारवाईचं कौतुक झालं. अनेक देशांनी भारताच्या स्वसंरक्षणाच्या या भूमिकेला पाठिंबा दिला. भारत केवळ एक मोठी अर्थव्यवस्था किंवा लोकशाही नाही, तर जागतिक पातळीवर जबाबदार आणि सक्षम देश आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. ऑपरेशन सिंदूर म्हणजे भारताच्या रणशौर्याची शपथ. ही कारवाई फक्त प्रतिशोध नव्हती, ती होती न्यायासाठीची लढाई आणि ती लढाई भारताने अभिमानाने आणि प्रतिष्ठेने जिंकली. भारताचा प्रत्येक नागरिक आज गर्वाने म्हणतो आहे. ‘जय हिंद’...!

Comments
Add Comment