मुंबई : दरवर्षी प्रजात्ताक दिनाचे औचित्य साधून केंद्र सरकारच्यावतीने नागरी सन्मान केले जातात. पद्म पुरस्कार दिले जातात. या पुरस्कारांसाठी देशभरातून शिफारशी मागवल्या जातात. महाराष्ट्रातून पद्म पुरस्कारासाठी शिफारस करण्याकरिता राज्य शासनाने एक सात सदस्यांची समिती स्थापन केली आहे. ही समिती राज्यातील गुणवतं नागरिकांच्या कामगिरीचा आढावा घेऊन पद्म पुरस्कारासाठी राज्याच्यावतीने शिफारस करण्यासाठी नावं सुचविणार आहे. या समितीत राज्य शासनाच्या सात मंत्र्यांचा समावेश आहे. समितीच्या अध्यक्षस्थानी मंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे आमदार जयकुमार रावल आहेत. समितीत सदस्य म्हणून मंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे आमदार असलेले आणखी दोन जण आहेत. यापैकी एक आहेत ते आशिष शेलार आणि दुसरे आहेत नितेश राणे.
समितीत शिवसेनेचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी दोन मंत्री आहेत. शिवसेनेकडून दादा भुसे आणि उदय सामंत तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून आदिती तटकरे आणि माणिकराव कोकाटे आहेत.
विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांची पद्म पुरस्कारांसाठी शिफारस करण्याचे निर्देश केंद्र सरकारने राज्य सरकारला दिले आहेत. त्यानुसार, सरकारकडे प्राप्त होणाऱ्या प्रस्तावांची छाननी करून केंद्र सरकारकडे पाठवण्यासाठी योग्य व्यक्तींची शिफारस ही समिती राज्य सरकारला करेल.