
भारत - पाकिस्तान यांच्यातल्या वाढत्या तणावाचा आयपीएल स्पर्धेला फटका बसलाय. पाकिस्तानकडून होत असलेल्या ड्रोन हल्ल्यामुळे सीमावर्ती भागात ब्लॅकआऊट करण्यात येतंय. या पार्श्वभूमीवर आयपीएलचे सामने स्थगित करण्याचा निर्णय घेतलाय. तेव्हा आयपीएलचे सामने पुन्हा खेळवले जाणार का, बीसीसीआय काय निर्णय घेणार, याकडे क्रिकेटप्रेमीचं लक्ष लागलंय.
पाकिस्तानकडून सलग दोन दिवस ड्रोन हल्ले सुरू आहेत. पाकिस्तानकडून होणाऱ्या संभाव्य हल्ल्याचा विचार करता सीमावर्ती भागात ब्लॉकआऊट करण्यात येतं. त्यामुळे धरमशाला येथे खेळवला गेलेला पंजाब किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स हा सामना अर्ध्यावर रद्द करण्यात आला. इतकंच नव्हे तर आता आयपीएल २०२५ स्पर्धा स्थगित करण्यात आलीय. भारत सरकारशी चर्चा केल्यानंतर बीसीसीआयने हा निर्णय घेतलाय. यंदाच्या हंगामातील आयपीएलचे अद्याप १६ सामने खेळायचे बाकी आहेत. यंदाच्या आयपीएलचा अंतिम सामना हा २५ मे रोजी खेळवण्यात येणार होता. मात्र भारत - पाकिस्तान तणावामुळे आयपीएल स्पर्धा स्थगित करण्यात आलीय. आयपीएलच्या स्पर्धेत प्लेऑफ आणि अंतिम सामन्यासह एकूण ७४ सामने खेळवले जाणार आहेत. यापैकी आतापर्यंत ५८ सामने खेळवले गेले आहेत.
?si=n0mS7wtEhV05hel-
या सर्व घडामोडींवर बीसीसीआय काय निर्णय घेऊ शकते ? हे पाहुयात
- एका दिवसात दोन सामने खेळवणं
- आठ ते दहा दिवसात स्पर्धा पूर्ण करणं
- अन्य देशातल्या खेळाडूंची उपलब्धता तपासणं
- सामने खेळवण्यासाठी अन्य काही स्टेडियमचा विचार करणं
- उर्वरित सामने दुसर्या देशात खेळवणं
बीसीसीआयकडून असे सर्व निर्णय घेण्यात येऊ शकतात
ऑगस्टमध्ये टीम इंडिया बांगलादेशच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात टीम इंडिया तीन टी-२० आणि ३ वनडे सामने खेळणार आहे. मात्र बांगलादेशातली अस्थिरता पाहता हा दौराही अधांतरी असल्याची चर्चा आहे. एकूणच भारत - पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीत आयपीएल अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आलीय. या पार्श्वभूमीवर बीसीसीआय कोणता निर्णय घेणार हे पाहावं लागणार आहे. तेव्हा क्रिकेटप्रेमींना वेट अँड वॉचची भूमिका घ्यावी लागणार आहे.