Saturday, May 10, 2025

देशब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

India Pakistan Conflict : इथूनपुढे दहशतवादी हल्ल्याला युद्ध समजले जाईल!

India Pakistan Conflict : इथूनपुढे दहशतवादी हल्ल्याला युद्ध समजले जाईल!

भारताचा पाकला थेट इशारा


नवी दिल्ली : दहशतवादाच्या संदर्भात भारताने मोठा निर्णय घेतला आहे. भविष्यातील कोणतेही दहशतवादी कृत्य युद्ध समजले जाईल. त्यानुसार त्याला चोख प्रत्युत्तर देऊ, असा इशारा भारताने पाकिस्तानला दिला आहे.


भारताचं पाकला चोख प्रत्युत्तर


पाकिस्तानने शनिवारी पहाटे देशाच्या पश्चिम सीमेला लक्ष्य केले. त्यांनी भारताच्या लष्करी ठिकाणांवर हल्ला करण्यासाठी ड्रोन, लांब पल्ल्याची शस्त्रे, युद्धसामग्री आणि लढाऊ विमानांचा वापर केला. पण भारताने त्याला चोख प्रत्युत्तर देत त्याचे सर्व हल्ले यशस्वीरित्या परतवून लावले. या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी पश्चिम सीमेवरील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान आणि तिन्ही दलांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. यापूर्वी, चौहान यांनी सिंह यांना सुरक्षेच्या परिस्थितीची माहिती दिली.



जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी २७ हिंदू पर्यटकांची पाकिस्तानी दहशतवाद्यांनी टार्गेट किलींग केल्यानंतर भारताने ७ मे रोजी पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केली. त्यानंतर गेल्या ३ दिवसांपासून भारत आणि पाकिस्तानात ड्रोन आणि मिसाईल हल्ले सुरू होते. भारताने पाकिस्तानचे सर्व हल्ले यशस्वी परतवून लावले. दरम्यान दोन्ही देशांमधील वाढता तणाव पाहता अमेरिकेने दोन्ही देशांमध्ये मध्यस्थी केली. अमेरिकेने पाकिस्तानच्या राजकीय नेतृत्त्वाला बाजुला सारत पाकिस्तानचे डायरेक्टर जनरल ऑफ मिल्ट्री ऑपरेशन्स (डीजीएमओ) यांच्याशी चर्चा केली.

अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर पाकिस्तान शस्त्रसंधीसाठी तयार झाला. दरम्यान या शस्त्रसंधीला स्वीकृती देताना भारताने महत्त्वाची अट टाकली. भविष्यातील कोणतेही दहशतवादी कृत्य युद्ध समजले जाईल. त्यानुसार त्याला चोख प्रत्युत्तर देऊ, असा इशारा भारताने पाकिस्तानला दिला आहे. त्यानुसार दोन्ही देशांमध्ये आज, शनिवारी संध्याकाळी ५ वाजेपासून शस्त्रसंधी लागू करण्यात आली आहे.
Comments
Add Comment