
उत्तराखंड: भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या (India Pakistan Tension) पार्श्वभूमीवर, सुरक्षेच्या कारणास्तव केदारनाथ धामला जाणारी हेलिकॉप्टर सेवा बंद करण्यात आली आहे. ही माहिती अधिकाऱ्यांनी दिली. जाणून घ्या किती काळ बंदी राहणार?
भारत आणि पाकिस्तानमधील सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या चारधाम यात्रेबाबत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. सुरक्षेच्या कारणास्तव, केदारनाथ धामला जाणारी हेलिकॉप्टर सेवा पुढील आदेशापर्यंत पुढे ढकलण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
३२ विमानतळ बंद, अनेक उड्डाणे रद्द
नागरी उड्डाण मंत्रालयाने शनिवारी जाहीर केले की, उत्तर आणि पश्चिम भारतातील ३२ विमानतळ १५ मे पर्यंत नागरी उड्डाणांसाठी बंद ठेवण्यात आले आहेत. "भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) आणि संबंधित विमान वाहतूक अधिकाऱ्यांनी एअरमेनना सूचना (NOTAMs) ची मालिका जारी केली आहे ज्यामध्ये ९ ते १४ मे २०२५ (१५ मे २०२५ रोजी ०५२९ IST पर्यंत) सर्व नागरी उड्डाण ऑपरेशन्ससाठी उत्तर आणि पश्चिम भारतातील ३२ विमानतळ तात्पुरते बंद करण्याची घोषणा करण्यात आली आहे," असे मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे.
भारताने ७ मे रोजी 'ऑपरेशन सिंदूर" द्वारे दहशतवादी छावण्यांवर केलेल्या अचूक हल्ल्यांनंतर, पाकिस्तानने सीमा भागांवर केलेल्या गोळीबारामुळे, तसेच भारताच्या पश्चिम आणि उत्तरेकडील भागातील शहरांवर करण्यात आलेल्या ड्रोन हल्ल्यांच्या प्रयत्नांमुळे, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आला.
चार धाम यात्रेसाठी सर्व हेलिकॉप्टर सेवा स्थगित
भारत पाकिस्तान दरम्यानचा वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चार धाम यात्रेसाठी सर्व हेलिकॉप्टर सेवा बंद करण्यात आले आहे. ज्यामध्ये केदारनाथला जाणाऱ्या हेलिकॉप्टर सेवांचा देखील समावेश आहे, या सेवा अनिश्चित काळापर्यंत बंद राहतील.
पुढील सूचना मिळेपर्यंत या सेवा स्थगित करण्यात आल्या आहेत. उत्तराखंड सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्रीला जाणाऱ्या सर्व हेलिकॉप्टर सेवा स्थगित करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचप्रमाणे आदमपूर, अंबाला, अमृतसर, अवंतीपूर, भटिंडा, भुज, बिकानेर, चंदीगड, हलवारा, हिंडन, जैसलमेर, जम्मू, जामनगर, जोधपूर, कांडला, कांगडा (गग्गल), केशोद, किशनगड, कुल्लू-मनाली (भुंटर), लेह, लुधियाना, पटहन, मुंद्रा, पटार, राजकोट, पट्टर, लुधियाना (हिरासर), सरसावा, शिमला, श्रीनगर, थोईसे, उत्तरलाई असे एकूण ३२ विमानतळ बंद करण्यात आली आहेत.