Friday, May 9, 2025

अग्रलेखसंपादकीय

पाकिस्तान विनाशाकडे

पाकिस्तान विनाशाकडे

पाकिस्तानचे राज्यकर्ते, लष्कर प्रमुख आणि कट्टरतावादी नेते पाकिस्तानला विनाशाच्या मार्गावर नेत आहेत. भारतात दहशतवाद्यांना पाठवून हिंसाचार आणि रक्तपात घडवायचा, लष्करी दलाच्या तळांवर हल्ले करायचे, निरपराध भारतीयांचे बळी घ्यायचे ही मालिका वर्षानुवर्षे चालूच आहे. उरी, पठाणकोट, पुलवामा, पहलगाम अशा हत्याकांडानंतर देशभरात संतापाची लाट उसळली.


दहशतवाद्यांना पाठिंबा आणि संरक्षण देणाऱ्या पाकिस्तानला कायमची अद्दल घडवा, अशी मागणी सर्वस्तरातून सुरू झाली. आता खूप झाले, आता यापुढे पाकिस्तानप्रेरीत दहशतवाद खपवून घेतला जाणार नाही अशीच भावना प्रत्येक भारतीयांच्या मनात प्रबळ होत गेली. पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल असिम मुनीर यांची प्रक्षोभक व भडकाऊ भाषणे ही दहशतवादाला उत्तजेन देणारी होती. भारताच्या विरोधात गरळ ओकणारी होती. एका देशाचा लष्कर प्रमुख शेजारी राष्ट्राच्या विरोधात भडकाऊ भाषणे कशी करू शकतो ? असिम मुनीर यांची प्रतिमाच जिहादी जनरल अशी आहे. पहलगाम येथे निरपराध हिंदू पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून दहशतवाद्यांनी पाॅईंट ब्लँक गोळ्या घालून त्यांची हत्या केली. महिलांच्या पतीला त्यांच्या डोळ्यांदेखत समोरून गोळ्या घालून त्यांचे कुंकू पुसले. भारतीय संस्कृतीत कुंकू हे अतिशय पवित्र मानले जाते. ते सन्मानाचे व विश्वासाचे प्रतीक आहे. त्या महिलांचा आक्रोश व अश्रू सर्व देशाने बघितले. दहशतवाद्यांना पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण आणि एके ४७ सारख्या स्वयंचलित बंदुका देऊन हिंसाचार घडविण्यासाठी भारतात पाठवले जाते याचे सज्जड पुरावे भारताने जगाला दाखवले आहेत. जा मोदींना जाऊन सांग, असे दहशतवाद्याने पहलगाममधील महिलांना बजावले हा त्यांच्या क्रूरतेचे कळस होता. त्याचा बदला घेण्यासाठीच भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानातील व पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले. सात शहरातील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. त्यानंतरही पाकिस्तानी सैन्याने सरहद्दीलगत भारताच्या हद्दीतील पंजाब व काश्मीरमधील वस्त्यांवर गोळीबार केला व त्यात निरापराध लोकांचे बळी घेतले. भारताने गुरुवारी रात्री लाहोर, कराची, इस्लामाबाद, फैसलाबाद, पेशावर, रावळपिंडी अशा सर्व महत्त्वांच्या शहरांवर हवाई हल्ले चढवले. भारताने ड्रोन व क्षेपणास्त्रांचा पाकिस्तानी लष्करी तळांवर मारा केला.  लाहोरपासून इस्लामाबादपर्यंत पाकिस्तानात ब्लॅक आऊट जारी करण्यात आला. इस्लामच्या नावावर दहशतवादी कारवाया घडविणाऱ्या पाकिस्तानला भारतीय हल्ल्यांपासून स्वत:ला वाचविण्यासाठी रात्री अंधारात राहावे लागले. भारत-पाकिस्तान दरम्यान अघोषित युद्ध सुरू झाले. भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली. कराची बंदराच्या दिशेने भारताच्या विक्रांत युद्ध नौकेने कूच केले आहे. चीन व तुर्की वगळता जगातील कोणत्याही देशाने पाकिस्तानला पाठिंबा दिलेला नाही. भारतावर झालेले दहशतवादी हल्ले आणि विशेषत: पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारून केलेली २६ हिंदू पर्यटकांची हत्या याने देशातील जनतेचा थरकाप तर झालाच पण पाकिस्तानवर हल्ला करून कठोर बदला घ्यावा अशी जनता मागणी करू लागली. जे जनतेला पाहिजे आहे तेच मोदींनी करून दाखवत आहेत. ऑपरेशन सिंदूर सुरू होताच सारा देश मोदींच्या नेतृत्वाचा जयजयकार करू लागला. मोदींच्या अभिनंदनाचे फलक सर्व देशभर झळकू लागले. पाकिस्तानकडून होणारी घुसखोरी भारतीय सैन्याने रोखलीच पण पाकिस्तानचे साठ हून अधिक ड्रोन नेस्तनाबूत करून हल्ले परतवून लावले.



दि. २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे दहशतवाद्यांनी हिंदू पर्यटकांचे हत्याकांड केले. तब्बल पंधरा दिवसांनी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू केले. भारतीय सैन्य दलाने ज्या सुनियोजित पद्धतीने पाकिस्तानवर ड्रोन व क्षेपणास्त्रांचे हल्ले चढवले, त्यात पाकिस्तानचे नेते व प्रशासनाची पळापळ झालेली दिसते. भारताकडे सैन्य बळ, शस्त्र बळ पाकिस्तानच्या कितीतरी पटीने जास्त आहे. भारतीय सैन्याकडे शिस्तबद्ध, त्यागी भावना तसेच देशासाठी निष्ठेने काम करणारी फौज आहे. भारताची आर्थिक स्थिती पाकिस्तानच्या तुलनने कितीतरी सक्षम व स्थिर आहे. पाकिस्तानने दहशतवादी कारवायातून भारताला डिवचण्याचे काम केले आहे. नरेंद्र मोदींसारखा कठोर व सक्षम पंतप्रधान देशात असताना पाकिस्तानने मोदींनाच आव्हान देऊन स्वत:च स्वत:साठीचा खड्डा खणला आहे. पाकिस्तानात शाहबाज शरीफ यांचे सरकार असले तरी त्यावर लष्कराचा रिमोट आहे. लष्कराच्या नियंत्रणामुळे तिथे सरकारला फार काही अधिकार नाहीत. सेना जे सांगते तेच पाकिस्तानात घडत असते. तिथे सरकारला स्वातंत्र्य नाही. लष्कर प्रमुखच जर जिहादी असतील तर सारे सरकार त्यांच्यामागे फरफटत जाताना दिसते. भारतीय सैन्य दलाने इस्लामाबादसह पाकिस्तानातील प्रमुख शहरांवर हवाई हल्ले केले तेव्हा लष्कर प्रमुख असिम मुनीर हे कुठे आहेत असे प्रश्न विचारले गेले. नंतर ते बंकरमधे जाऊन लपले असल्याच्या बातम्या झळकल्या. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या निवासस्थापासून अवघ्या वीस किमी. अंतरावर मोठे बॉम्बस्फोट झाले. देशाचा पंतप्रधान व लष्कर प्रमुख हे जर सुरक्षित नसतील, तर देशातील जनतेचे रक्षण तरी करणार कोण?  पाकिस्तान त्याच्या कर्माची फळे भोगत आहे. जशी करणी तशी भऱणी. अगोदरच हा देश आर्थिकदृष्ट्या डबघाईला आला आहे. जिहादी आणि दहशतवादी यांतच सारा देश गुरफटला आहे. भिकेचा कटोरा घेऊनच पाकिस्तान जगापुढे उभा आहे.  चीनने दिलेली शस्त्रे भारताशी लढताना कुचकामी ठरली याने चीनचीही नाचक्की होत आहे. पाकिस्तानमधील अनेक शहरातील संरक्षण प्रणाली भारतीय हवाई दलाने उद्ध्वस्त केल्याने कोणते विमान कुठून येणार याची माहिती मिळणेही तेथे बंद झाले आहे. पहलगामचा दहशतवादी हल्ला व निर्घृण हत्याकांडाला पाकिस्तानच जबाबदार आहे. त्याची शिक्षा पाकिस्ताननेच भोगलीच पाहिजे. पाकिस्तान भारताबरोबर एक हरणारी लढाई लढत आहे. पाकिस्तानची वाटचाल विनाशाकडे चालू आहे.


Comments
Add Comment