बिरदेव डोणे यांची उत्तुंग भरारी

  105

रवींद्र तांबे


मेंढ्यांना माळरानात चरायला घेऊन जाणारा व मेंढ्या चरत असताना त्यांच्यावर लक्ष ठेवत अभ्यास करणारा बिरदेव डोणे यांनी सन २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाची (युपीएससी) परीक्षा दिली होती. या परीक्षेचा निकाल मंगळवार दिनांक २२ एप्रिल २०२५ रोजी लागला. यात बिरदेव डोणे यांनी नेत्रदीपक यश संपादन केले. आता बिरदेव डोणे हा आयपीएस अधिकारी झाला आहे. यासाठी त्यांनी मेंढ्यांना सांभाळत केंद्रीय लोकसेवा आयोगाचा अभ्यास जिद्दीने, मेहनतीने आणि आत्मविश्वासाने केल्यामुळे त्याच्या आयुष्याला दिशा देणारी ही कहाणी आपल्या राज्यातील तमाम तरुणाईसाठी प्रेरणा देणारी आहे.


कोणतीही गोष्ट करीत असताना मनाची तयारी असावी लागते. तरच आपल्या मनात जिद्द निर्माण होते. त्यात आधी अपयश तर कधी यश, कधी अपमान तर कधी कौतुक होत असते. अशा परिस्थितीला समर्थपणे तोंड द्यायचे असते, तरच आपण उंच भरारी घेऊ शकतो. यासाठी सातत्य असावे लागते. हीच बाब बिरदेव डोणे यांनी केली. घर छोटे, त्यात मेंढ्यांचा वावर, त्यामुळे अभ्यासासाठी पुरेशी जागा नसल्यामुळे घराच्या व्हरांड्यात व माळरानात मेंढ्या चरताना अभ्यास करायचा. म्हणजे “ना घर ना लाईट” अशी परिस्थिती. पुरेशा मूलभूत सुविधा नसताना आणि घरची आर्थिक परिस्थिती बिकट असताना सुध्दा त्यांनी आपले ध्येय सोडले नाही. त्यावर मात करत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात उत्तुंग भरारी घेतली आहे.


आता त्याचे कौतुक सर्व स्तरातून करण्यात येत आहे. सध्या त्याचे सत्कार सुद्धा होऊ लागले आहेत. तेव्हा आजच्या तरुण पिढीनी त्यांनी जे अभूतपूर्व यश संपादन केले त्याचा आदर्श घेऊन आपण सुद्धा अशाच प्रकारे यश संपादन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यासाठी आपल्याला त्या क्षेत्रातील आवड असावी लागेल. नियमित अभ्यास तरच यश आपल्या जवळ येते. त्याच बरोबर आपल्या जीवनात चांगल्या मित्रांची सोबत असणे गरजेचे असते. बिरदेव डोणे यांनी सुद्धा चांगल्या मित्रांची संगत केली.



कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यामधील यमगे या छोट्याशा गावातील मेंढपाळ कुटुंबातील बिरदेव बलव्वा सिद्धप्पा डोणे यांने इतिहास घडविला. वडिलांचे शिक्षण बारावीपर्यंत झालेले तर आई निरक्षर होती. आपला मुलगा मोठा साहेब व्हावा या जिद्दीने त्यांनी त्याला शिक्षण दिले. त्याचे कुटुंब मेंढ्या पाळून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असत. त्यामुळे घरची आर्थिक परिस्थिती बेताची नसताना सुद्धा वडिलांसोबत मेंढ्यांची राखण करीत सन २०२४ च्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात ५५१ वी रँक मिळवत त्यांनी उज्ज्वल यश संपादन केले. ही गोड बातमी बिरदेव कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यामधील जोडकुर्ली या बहिणीच्या गावी त्यांच्या काकांच्या मेंढ्या माळरानात चरवत असताना २२ एप्रिल, २०२५ रोजी दुपारी अडीच वाजता त्याला मित्राचा फोन आला आणि आपण केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पास झाल्याची बातमी समजली. यासाठी त्यांनी पोस्टातील सरकारी नोकरीचा राजीनामा दिला होता. त्याच्या  मोठ्या भावाने सुद्धा त्याला सैन्यात जाण्यासाठी प्रेरित केले होते. दोन दु:खद घटना घडून सुद्धा अंतिम संस्काराला त्याला येता आले नव्हते. याची खंत त्यांनी बोलून दाखविली. त्यावेळी त्याला अश्रू अनावरण झाले. त्याचा मोबाइल सुद्धा चोरीला गेल्याने त्याची तक्रार घेण्यास कशी टाळाटाळ केली होती याचा अनुभव सुद्धा त्याला आला आहे. आता मात्र त्याच क्षेत्रातील प्रशासकीय अधिकारी झाला आहे.


बिरदेव डोणे यांच्या घरच्या परिस्थितीचा विचार करता केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊनसुद्धा खांद्यावरील घोंगडी सोडली नाही. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल लागल्यानंतर मेंढीलासुद्धा त्यांनी कडेवर उचलून घेतले होते. त्याची आनंद मिरवणूक काढण्यात आली त्यावेळी सुध्दा त्यांनी आपल्या खांद्यावर घोंगडी व डोक्यावर पांढरी टोपी परिधान केली होती. कारण त्याच्या यशाची साक्ष ती घोंगडी व टोपी सांगत होती. त्यांने आता इतिहास घडविला आहे. बिरदेव आपल्या यशाची वाटचाल सांगत असताना भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आनंदाने सांगायला विसरला नाही. हीच खरी मोठी शक्ती त्याच्या जीवनात होती. महत्त्वाची बाब म्हणजे, पहिल्या दोन प्रयत्नामध्ये जरी त्याला अपयश आले तरी त्यांनी जिद्द सोडली नाही आणि तिसऱ्या प्रयत्नात इतिहास घडविला.बिरदेव डोणे यांनी पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयातून स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये पदवी प्राप्त केली असली तरी त्याचे शालेय शिक्षण गावच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. जय महाराष्ट्र हायस्कूलमध्ये त्याचे माध्यमिक, तर मुरगुड येथील शिवराज विद्यालयातील कनिष्ठ महाविद्यालयात शैक्षणिक उत्कृष्टतेचा पाया रचला. त्याला दहावीमध्ये ९६ टक्के, तर बारावी विज्ञान शाखेमध्ये ८९ टक्के गुण मिळवून पहिला क्रमांक पटकावला होता. त्यावेळी तत्कालीन शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी त्याच्या यशाचे कौतुक करण्यासाठी शाळेला पत्र पाठविले होते. बिरदेव डोणे याला केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या लेखी परीक्षेत ७७५ गुण, मुलाखतीत १६० गुण असे एकूण ९३५ गुण मिळाले होते. यासाठी त्यांनी समाजशास्त्र हा वैकल्पिक विषय निवडला होता. त्यांनी या संधीचे सोने केले असेच म्हणावे लागेल. यावरून त्याचा आत्मविश्वास सहज लक्षात येतो. याचे आत्मपरीक्षण आजच्या तरुणाईने करणे गरजेचे आहे.


यासाठी केवळ आर्थिक परिस्थिती असून चालत नाही तर लागते ती म्हणजे मनाची तयारी, मनाची जिद्द, मनाची मेहनत, मनाचा आत्मविश्वास तरच यशवंत होऊ शकतो हे बिरदेव डोणे यांनी देशाला दाखवून दिले आहे. त्याबद्दल तमाम महाराष्ट्र जनतेच्या वतीने आयपीएस बिरदेव डोणे याचे अभिनंदन करून त्याला त्याच्या पुढील देशसेवेला आणि प्रशासनातील कारकिर्दीस हार्दिक शुभेच्छा..!

Comments
Add Comment

सेमीकंडक्टर उत्पादनांत आत्मनिर्भरता येणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच राष्ट्राला संबोधित करताना या वर्षाअखेर देशातील पहिली सेमीकंडक्टर चिप

बेस्ट निवडणुकीतून संदेश

मुंबई . कॉम मागील आठवड्यातच राजकीय धामधुमीत एका घटनेने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. बेस्ट उपक्रमातील कर्मचारी

विद्यार्थ्यांनी मोबाइलचा अतिवापर टाळावा

मोबाइलच्या अतिवापरामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत. ही त्यांच्या भविष्याच्या

शहरांचे पर्यावरणीय आरोग्य ढासळतेय...

बदलत्या हवामानाचा परिणाम शहरांवर मोठ्या प्रमाणात होत आहे. यामुळे शहरातील कथित सामान्य सुरक्षित जीवन सातत्याने

अडचणीचा ठरतोय अमेरिकन व्हिसा

सध्या अमेरिका व्हिसा देताना लॉटरी प्रणालीऐवजी वेतनआधारित निवड प्रक्रिया राबवत आहे. एच-१ बी व्हिसाचे सर्वाधिक

आत्महत्यांचे वाढते प्रमाण

आत्महत्या या गंभीर आणि संवेदनशील विषयांवर आपण आज चर्चा करणार आहोत, हे खूप महत्त्वाचे आहे. आजकाल आत्महत्येचे