Saturday, May 10, 2025

रिलॅक्स

भय इथले संपत नाही!

भय इथले संपत नाही!

शशिकांत पवार


रात्रीची वेळ, सगळीकडे स्मशान शांतता पसरलीय, रातकिड्यांचा किर्रर्र आवाज या शांततेत आणखीन भर टाकतोय, पार्श्वभूमीला एक जुनाट पडकी हवेली दिसतेय, हवेलीच्या काचेच्या खिडक्यांमधून येणाऱ्या दिव्यांचा अंधुक प्रकाश आसमंतात भरून राहिलाय, मग एक श्वेतवस्त्र नेसलेल्या बाईची धूसर आकृती हातात मेणबत्ती घेऊन मंद हळुवार पावलं टाकत हवेलीच्या दिशेने चालायला लागते. जोडीला भीतीदायक बॅकग्राऊंड म्युझिक.


वरील वर्णन वाचून तुमचे धाबे दणाणले असतील किंवा भीतीने तुमची गाळण उडाली असेल किंवा घामाचा एक थेंब तुमच्या मानेवरून सरसरत पाठीपर्यंत ओघळत गेला असेल तर तुमचा जन्म नक्कीच ५० ते ७० च्या दशकात झालेला आहे हे नक्की. त्यावेळी बॉलीवूडमध्ये हॉरर सिनेमा म्हटलं की वरीलप्रमाणे दृश्य असणे हे आवश्यक होतं, त्याशिवाय हॉरर सिनेमा बनतच नसे. खास तिकीट काढून थेटरमध्ये घाबरायला येणाऱ्या प्रेक्षकांचा एक मोठा वर्ग त्याकाळी होता, आणि त्यावेळचे निमति दिग्दर्शक सुद्धा प्रेक्षकांची ही भीती इनकॅश करण्यासाठी असे चित्रपट काढीत असत. त्या भीतीत आणखी भर म्हणून की काय एखादं हॉरर गाणंसुद्धा चित्रपटात हमखास असे. तर सांगायचं मुद्दा हा की, बॉलिवूडमध्ये भूताळलेल्या गाण्यांची मोठी परंपरा आहे. अगदी सुरुवात करायची म्हटल्यास १९४९ साली आलेल्या अशोक कुमार ह्यांचीच निर्मिती असलेल्या ‘महल’ पासून करता येईल. त्या चित्रपटातलं “आयेगा आनेवाला’ या गाण्याची भारतीय चित्रपटातील पहिलं हॉरर गीत म्हणून इतिहासात नोंद व्हायला हरकत नाही. त्यावेळी या गाण्याचं चित्रीकरण मात्र अफलातून होतं. बागेत झोपाळ्यावर बसून मधुबाला झोके घेत घेत गाणं म्हणतेय, अशोककुमार जवळ जाताच मधुबाला गायब पण रिकामा झोपाळा आपोआप झोके घेतोय, क्षणार्थात मधुबाला तळ्यातल्या नावेत बसलेली दिसतेय, बागेतले कारंजे आपोआप चालू बंद होतेय, हवेलीतले झुंबर हलायला लागतात, काळ मांजर वाटेतून आडवं जातंय.... (तर्कनिष्ठ आणि बुद्धिप्रामाण्यवाल्यांनी लांब राहावे) सगळं काही गूढ आणि अतर्क्य. या सर्वांवर कळस म्हणजे लताचा स्वर्गीय आवाज, तिच्या आवाजामुळे गाणं वेगळ्याच उंचीवर जाते.


‘आयेगा आनेवाला’ नंतर लक्षात राहील असं हॉरर गीत म्हणजे ‘बीस साल बाद मधलं कही दीप जले कही दिल’. इथं संगीतकार हेमंतकुमार असला तरी गायिका पुन्हा आपली लताच.



गूढ गाण्यांच्या पंक्तीतलं आणखी एक यादगार गाणं म्हणजे ‘गुमनाम चित्रपटातलं “गुमनाम है कोई, बदनाम है कोई” हे गाणं, विमानात अचानक बिघाड झाल्यामुळे एका अनोळखी प्रदेशात ते उतरवलं जाते आणि सुरू होतो एकापेक्षा एक अशा गूढ मृत्यूंचा सिलसिला. अगाथा ख्रिस्तीच्या “अँड देअर वेअर नन ह्या गाजलेल्या कादंबरीवर बेतलेला ‘गुमनाम चित्रपट आजही या एकाच गाण्यामुळे लक्षात राहतो. शंकर जयकिशनच्या सदाबहार संगीताला पुरेपूर न्याय देणारी पुन्हा
लताच असते.


गूढ गाणं म्हणजे लता मंगेशकर असं एक समीकरणच तेंव्हा बनलं होतं. फक्त गूढ गाण्यांचा विचार केला तर लताचीच गाणी सर्वाधिक असतील. अशीच चटकन आठवणारी लताची गूढ गाणी म्हणजे गीत तेरे साज का (इन्तेकाम), झूम झूम ढलती रात (कोहरा), नैना बरसे रिमझिम रिमझिम (वह कौन थी) बिंदिया तरसे, कजरा बरसे (फिर वही रात), मेरे नैना सावन भादो (मेहबुबा). त्यामानाने पुरुष गायकांनी गायलेली गूढ गाणी कमी आहेत. नाही म्हणायला रफीचं “सौ बार जनम लेंगे, सौ बार फना होंगे हे उस्तादों के उस्ताद’ मधलं प्रदीप कुमारच्या तोंडी असलेलं गाणं. या गाण्याची सिच्युएशन मात्र उलटी आहे, इथं नायक प्रदीप कुमार गूढपणे फिरत असतो आणि नायिका शकीला त्याचा शोध घेत असते. गाण्याच्या शेवटी प्रदीप कुमारचा मख्ख चेहरा बघून प्रेक्षकांचा भ्रमनिरास होतो ही गोष्ट वेगळी हिंदीच्या मानाने मराठी चित्रपटात मात्र गूढ गाणी तशी फार नाहीत. पण तरीसुद्धा एका गाण्याचा उल्लेख आवर्जून करावा लागेल आणि मुख्य म्हणजे हे मराठी गाणं वर उल्लेख केलेल्या सर्व हिंदी गाण्यांचा “बाप” म्हणता येईल असं आहे.


मला चांगलं आठवतंय मी १०-१२ वर्षांचा असताना टीव्हीवर हा खेळ सावल्यांचा हा काशिनाथ घाणेकर, आशा काळे यांचा चित्रपट लागला होता. त्या चित्रपटात ‘काजल रातीनं ओढून नेला, सये साजण माझा हे सुधीर मोर्धेनी लिहिलेलं आणि पं. हृदयनाथ मंगेशकरांनी संगीत दिलेलं एक गाणं होतं. माडावरून पडल्यामुळे एका घरगड्याचा मृत्यू होतो आणि त्या धक्क्याने वेडी झालेली त्याची बायको आशा भोसलेंच्या आवाजात हे गाणं गाते तेंव्हा अंगावर सर्रकन काटा आल्याशिवाय राहत नाही. दोन कडव्यांच्या मधला म्युजिक पीस एकदम धरकाप उडवणारा आहे. लहान मुलं सोडा, मोठी माणसे सुद्धा “काजल रातीनं” सुरू झालं की चेहरा हाताने झाकून घेत हे मी स्वतः अनुभवलंय. इतर कोणत्याही गाण्यापेक्षा ‘काजल रातीनं या गाण्याने मला सर्वांत जास्त झपाटलं होते. काळ बदलला आणि लोकांच्या भीतीच्या कल्पना सुद्धा बदलल्या. सध्या मोबाईलमुळे अख्ख जग मुठीत आलंय, १०-१२ वर्षांची पोरं सुद्धा ‘द कन्ज्युरींग, एनाबेल सारखे चित्रपट बिनधास्त बघत असतात, त्यामुळे आमच्या वेळची ही हॉरर गाणी या मुलांना कितपत भीतीदायक वाटतील ही एक शंकाच आहे.


[email protected]

Comments
Add Comment