Saturday, May 10, 2025

देशब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

पाकिस्तानचे नीच कृत्य! रुग्णालयं, शाळा लक्ष्य करत युद्धाची मर्यादा ओलांडली

पाकिस्तानचे नीच कृत्य! रुग्णालयं, शाळा लक्ष्य करत युद्धाची मर्यादा ओलांडली

पाकिस्तानकडून रुग्णालय व शाळांवर हल्ले- कर्नल कुरेशी


नवी दिल्ली : भारताने केवळ दहशतवादी तळांवर हल्ला करत संयम दाखवला, पण पाकिस्तानने मात्र आता युद्धाची सगळी नैतिकता फेकून दिली आहे. भारतीय लष्कराच्या कर्नल सोफिया कुरेशी यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले की, पाकिस्तानने भारतातील रुग्णालयं, शाळा आणि नागरिक रहात असलेल्या वस्ती भागांवर हल्ले चढवलेत. या पत्रकार परिषदेला परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी आणि विंग कमांडर व्योमिका सिंगही उपस्थित होते.


कर्नल कुरेशी म्हणाल्या, “शुक्रवारी पाकिस्तानने श्रीनगर, अवंतीपुरा आणि उधमपूरमधील वैद्यकीय सुविधा टार्गेट केल्या. पंजाबमधील हवाई तळावर क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. हे फक्त युद्ध नाही तर ही मानवतेवर आघात करणारी हिंसा आहे!”


पाकिस्तानने भारताच्या सीमावर्ती भागात २६ पेक्षा जास्त वेळा हवाई घुसखोरीचा प्रयत्न केला. पठाणकोट, भूज, भटिंडा, उधमपूर येथील लष्करी ठिकाणांवर ड्रोन आणि लांब पल्ल्याची शस्त्रं वापरून केलेले हल्ले भारतीय जवानांनी मोठ्या धैर्याने परतवले. शनिवारच्या पहाटे १.४० वाजता पंजाबच्या हवाई तळाला हाय-स्पीड क्षेपणास्त्रांनी लक्ष्य केले गेले. त्याच वेळी श्रीनगरमध्येही पाक हवाई दलाने कारवाईचा प्रयत्न केला. पण भारतीय हवाई संरक्षण यंत्रणेने त्वरित चोख प्रत्युत्तर दिले.



भारताच्या संयमाचा गैरफायदा घेऊ नका!


परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी स्पष्ट सांगितले की, “पाकिस्तान भारताच्या पायाभूत सुविधांचे नुकसान झाल्याचे खोटे दावे करत आहे. धार्मिक स्थळांवर क्षेपणास्त्र डागल्याचा दावा तर पूर्णपणे हास्यास्पद आहे.”


दरम्यान, पाकिस्तानने आपले सैन्य सीमेकडे हलवायला सुरुवात केली असून, भारत यावर बारकाईने लक्ष ठेवून आहे. विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी सांगितले, “भारत शांततेचा मार्ग राखू इच्छितो, पण जोडीला देशाच्या सुरक्षेचाही संपूर्ण बंदोबस्त केला आहे. योग्य वेळी, योग्य ती किंमत मोजली जाईल.”


पाकिस्तानने आता जगासमोर स्वतःचा खरा चेहरा दाखवला आहे, जो केवळ दहशतवादाचा नव्हे, तर मानवताविरोधी कृत्यांचा आहे. भारत अशा प्रत्येक हालचालीला दहापट जोरात प्रत्युत्तर देईल, हे पाकिस्तानने लक्षात ठेवावे, अशा इशाराही मिसरी यांनी दिला आहे.

Comments
Add Comment