Saturday, May 10, 2025

रिलॅक्स

अर्ध्या हळकुंडाने पिवळी होणारी नाटके आणि ७ बेलवलकर...!

अर्ध्या हळकुंडाने पिवळी होणारी नाटके आणि ७ बेलवलकर...!

भालचंद्र कुबल : पाचवा वेद


काही आठवड्यांपूर्वी वजनदार या नाटकाच्या मी लिहिलेल्या निरीक्षणाबाबत अनेक उलट सुलट प्रतिक्रिया मला समाज माध्यमातून ऐकायला, वाचायला मिळत होत्या. पैकी, पहिले दोन-तीन प्रयोग पाहून नाटकाबद्दल अनुमान काढून नाटकावर लिहू नये अशी समज मला दिली गेली. मी ती समज अत्यंत विनम्रपणे स्वीकारली देखिल आहे आणि पुन्हा तीच चूक करत “७ बेलवलकर” नावाच्या नाटकाचा दुसरा प्रयोग पाहून त्याबाबतचे माझे निरीक्षण मांडत आहे. याला म्हणतात जित्याची खोड मेल्याशिवाय न जाणे.


सात बेलवलकर हा जुन्या पठडीतील लेखनशैलीतला ‘फार्स’ आहे. साधारण सत्तर-ऐंशीच्या दशकात पळा पळा कोण पुढे पळे तो, दिनूच्या सासूबाई राधाबाई, झोपी गेलेला जागा झाला किंवा त्या आधी काका किशाचा, घोळात घोळ, चोरावर मोर त्याच बरोबर अलीकडच्या काळातील शांतेचं कार्ट चालू आहे, थांब टकल्या भांग पाडतो, उचलबांगडी, सर आले धावून, बिघडले स्वर्गाचे दार, ऑल दि बेस्ट इत्यादी अशी आणि अनेक फार्स मराठी रंगभूमीला नवीन नाहीत. इंग्रजीत याला “हिलॅरस” असा एक चपखल शब्द आहे, त्यामुळे फार्स या जुन्या संज्ञेत अडकून न राहता ७ बेलवलकर ही एक हिलॅरस कॉमेडी आहे, तर कॉमेडीची पहिली व्याख्या अॅरिस्टॉटलच्या विवेचनात आढळते. हा शब्द व्युत्पत्तीने जोडला गेला आहे असे दिसते. कॉमेडी या क्रियापदाचा अर्थ “आनंद करणे” असा होतो आणि विनोद अथवा हास्य रस आणि भाव या क्रियापदाशी संबंधित असलेल्या आनंदातून निर्माण होतो असे अ‍ॅरिस्टॉटलचे विवेचन सांगते.


शतकानुशतके, विनोदाची व्याख्या करण्याचे प्रयत्न अ‍ॅरिस्टॉटलने घालून दिलेल्या धर्तीवरच केले जात होते. शोकांतिका उच्च दर्जाच्या व्यक्तींशी संबंधित असते आणि विनोद नीम्न दर्जाच्या व्यक्तींशी संबंधित असतो अशा काहिशा श्रेणी विभाजनावर विनोदी साहित्याची बैठक रचली गेली होती. शोकांतिका सार्वजनिक महत्त्वाच्या बाबींवर लक्ष केंद्रित करते, तर विनोदी जीवनातील खासगी बाबींशी संबंधित असते आणि शोकांतिकेतील पात्रे आणि घटना ऐतिहासिक असतात आणि म्हणूनच, काही अर्थाने ती वास्तववादी असतात, तर विनोदाचे साहित्य केवळ बनावट असते. अ‍ॅरिस्टॉटलमध्ये देखील अशा शैलींमध्ये अंतर्निहित फरक आहे जो शोकांतिका आणि विनोदी कथेच्या उपचारांसाठी योग्य मानला जातो. जोपर्यंत कॉमिक आणि शोकांतिका शैलींचे किमान सैद्धांतिक पृथक्करण होत नाही तोपर्यंत दोन्ही शैली परिणामकारक ठरु शकत नाहीत. ७ बेलवलकर या नाटकाची बैठक थोडीफार याच विवेचनाशी मिळती जुळती आहे..कारण कॉमेडी अधिक ट्रॅजेडीचे कॉम्बिनेशन गेल्या कित्येक वर्षात बघायला मिळालेले नाही. काही जणांना हा ब्लॅक ह्युमर वाटेल तर काही जण सस्पेंन्सचा आधार घेतल्याने थ्रिलर म्हणतील; परंतु शेवटच्या क्षणी थ्रिलर जर शोकांतिकेत परावर्तीत होत असेल तर त्यास त्या व्यक्तिची “व्यक्तीसापेक्ष” ट्रॅजेडीच म्हणावी लागते.


हा तर मी कुठे होतो. तर समीक्षकानी पहिले काही प्रयोग वगळून एकदा का नाटक सेट झालं की मग त्यावर बघून लिहिण्यास काहीच हरकत नाही अशी विनंती वजा अपेक्षा असते. काहींच्या मते हे विधान सकारात्मक वृत्तांकनाच्या धर्तीवर योग्य वाटत असेल. नाट्यनिर्मितीत अथवा व्यवसायात पाय रोवून उभ्या असलेल्या निर्मात्यांची भाबडी समजूत अशीही असावी की पेपरचा वाचक वर्ग आमच्या सारख्यांची परीक्षणे वाचून नाटकाला येत असतात. तर हे धादांत असत्य आम्ही पचवलेले आहे.



नाटक कशावर चालतं? तर ते दिवसागणिक लावल्या जाणाऱ्या प्रयोगावर, कास्टिंगवर, कथानकावर चालते. मग ते कॉमेडी असो वा ट्रॅजेडी. कॉमेडीत विरंगुळ्याचे प्रमाण थोडे अधिक असते म्हणून प्रेक्षकांची पसंती अधिक असते. एखादा लोकप्रिय नटाला मध्यवर्ती भूमिका देऊन व्यावसायिक नाटक ज्यावेळी उभे केले जाते तेंव्हा त्या एकमेव मुख्य नटाच्या अनुषंगाने अ पासून ज्ञ पर्यंत नाटकाबाबतची प्रक्रिया पार पाडली जाते. उदा. त्याच्या सोयीच्या वेळेनुसार तालमी, त्या नटाच्या सोयीनुसार तालमीच्या जागा अशा अनेक बाबी एकत्र करुन कसेबसे नाटक उभे करायचे. आणि एकदा का प्रयोग सुरू झाले की, दिवसागणिक प्रयोग स्वरुप तालमी करायच्या. प्रेक्षकांना हे पहिले किमान सात प्रयोग त्यांच्या माथी मारायचे. अशा परीस्थितीत प्रेक्षकांनी नाटकाकडे पाठ फिरवली तर दोष त्यांचाच…! अशा प्रयोगांना समीक्षकांनी नकारात्मक समीक्षण लिहिले तरी दोष त्यांचाच…! हे जे काही विलक्षण गणित दृढ झाले आहे त्याला तोड नाही; परंतु याबाबत स्टोरी टेलर समीक्षक जर काहीच बोलत नसतील तर मी ते माझे कर्तव्य समजून निदान मला ज्ञात असलेल्या नाटक व्यवसायातील मंडळींचा हक्काने कान पकडू शकतो. असो. सात बेलवलकर हे नाटक अशाच गुढ आणि विनोदी पार्श्वभूमी लाभलेले कथानक म्हणून आपल्या समोर सादर होत रहाते. इस्टेटीच्या हव्यासापोटी वाड्याच्या मालकाची हत्या करुन बेलवलकरांच्या वाड्यावर हक्क सांगण्यासाठी शिरलेल्या नातेवाईकांच्या कुरघोडीचा हा फार्स आहे. सतत कुठले ना कुठले पात्र प्रवेश करत आपले अस्तित्व अधोरेखित करण्याचा हा प्लॉट आहे. नाटकात सहा बेलवलकर्स दिसतात मग सातवा कोण? या गुढतेकडे नेणारा हा फार्स आहे.


नव्या उमेदीच्या प्रमोद विठ्ठल शेलार याचे या नाटकास दिग्दर्शन लाभले आहे तर प्रकाश योजनासाठी शितल तळपदे व संदेश बेंद्रे यांचे नेपथ्य यातील जमेच्या बाजू…! बाकी किशोर चौघुले, श्रमेश बेटकर, दिशा दानडे, ओंकार मनवळ नाटक एन्जॉय करत करत अभिनय करतात. अर्थात फार्सिकल नाटकाला हीच नटांची इन्व्हॉलमेंट लागते. लिखाणात नाटक अनेक ठिकाणी फसले आहे, आणि या नाटकाला एकतर एडिट तरी करावे किंवा काही प्रसंगांचे पुनर्लेखन तरी करावे. दिग्दर्शन आणि अभिनेत्यानी तोलून धरलेला फार्स जास्तीत जास्त चालावा या करीता निर्मात्यानीही संहिता सक्षम होण्यासाठी प्रयत्न करावेत.

Comments
Add Comment