
भारत - पाकिस्तान दरम्यान वाढत असलेल्या तणावामुळे आयपीएल २०२५ स्पर्धा स्थगित करण्यात आली आहे. ही स्पर्धा स्थगित झाली नसती तर नियोजनाप्रमाणे आयोपीएल २५ मे पर्यंत होती. पण तणाव वाढल्यामुळे आठ मे रोजी पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना रद्द करण्यात आला. यानंतर आयपीएल स्थगित करण्यात आला. आता भारताची पुढील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा ही थेट इंग्लंडमध्येच होणार आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यात २० जून ते ४ ऑगस्ट या कालावधीत पाच कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. या मालिकेसाठी संघाची निवड होण्याआधीच रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनी आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. यामुळे इंग्लंडविरुद्ध मैदानात उतरणाऱ्या भारतीय संघात रोहित शर्मा आणि विराट कोहली नसतील. भारताच्या कसोटी संघासाठी नव्या कर्णधाराचा विचार करावा लागेल. ही सर्व प्रक्रिया बीसीसीआय पुढील काही दिवसांत पूर्ण करणार आहे.
अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती भारताच्या कसोटी संघासाठी नव्या कर्णधाराचा विचार करेल. तसेच कसोटी संघात कोणत्या नव्या खेळाडूंना संधी द्यावी याचाही विचार करेल.
विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधील कामगिरी
विराट कोहलीने १२३ आंतरराष्ट्रीय कसोटी सामने खेळून ४६.८५ च्या सरासरीने ९२३० धावा केल्या. त्याने ३० शतके आणि ३१ अर्धशतके केली. कसोटी क्रिकेटच्या एका डावात नाबाद २५४ धावा ही विराट कोहलीची सर्वोत्तम खेळी आहे.
रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधील कामगिरी
रोहित शर्माने ६७ आंतरराष्ट्रीय कसोटी सामने खेळून ४०.५७ च्या सरासरीने ४३०१ धावा केल्या. त्याने बारा शतके आणि अठरा अर्धशतके केली. कसोटी क्रिकेटच्या एका डावात २१२ धावा ही रोहित शर्माची सर्वोत्तम खेळी आहे. कसोटी क्रिकेटमध्ये रोहितने गोलंदाज म्हणून ३८३ चेंडू टाकले आणि दोन बळी घेतले आहेत.