
येत्या काही दिवसांत ३५ अनधिकृत बांधकामे हटवणार
मुंबई : मुंबईत अनधिकृत बांधकामांविरोधात मुंबई महापालिका प्रशासनाने कठोर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. तसेच वर्सोवा (वेसावे) येथील अनधिकृत पाच बहुमजली इमारतींवर महापालिकेच्या के (पश्चिम) विभाग कार्यालयाच्या वतीने कारवाई करत या इमारतींचे बांधकाम जमीनदोस्त केले.
वेसावे भागातील पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या दलदलीच्या प्रदेशावर आणि सागरी किनारा व्यवस्थापन क्षेत्रात (कोस्टल रेग्यूलेशन झोन) ही अनधिकृत बांधकामे बांधण्यात आली होती. त्यामुळे संबंधितांना वेळोवेळी नोटीस बजावून बांधकाम तोडण्यासंदर्भात महापालिका प्रशासनाच्या वतीने कळविण्यात येत होते; परंतु त्यांच्याकडून काही कार्यवाही न झाल्याने तसेच दलदलीच्या भागातील या अनधिकृत बांधकामामुळे जीवितहानी होण्याची शक्यता असल्याने महापालिका उपायुक्त (परिमंडळ -४) डॉ. भाग्यश्री कापसे आणि सहायक आयुक्त (के पश्चिम) चक्रपाणी अल्ले यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.

मुंबई : रोहित शर्मा पाठोपाठ विराट कोहलीनेही कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली तरी रोहित शर्मा प्रमाणेच ...
वेसावे भागातील सागरी किनारा व्यवस्थापन क्षेत्रातील (कोस्टल रेग्यूलेशन झोन) तेरे गल्लीतील कुटूर हाऊस, वेसावे पंप हाऊससमोरील साईश्रद्धा निवास, गोमा गल्ली येथील नागा हाऊस, मांडवी गल्ली येथील झेमणे हाऊस, बाजार गल्ली येथील गणेश सागर या इमारतींचे मागील वर्षभराच्या कालावधीत अनधिकृतपणे बांधकाम करण्यात आल्याचे निदर्शनास आले होते. या पार्श्वभूमीवर तोडक कारवाई हाती घेण्यात आली.
दरम्यान, वेसावे भागातील सागरी किनारा व्यवस्थापन क्षेत्रात (कोस्टल रेग्यूलेशन झोन) अशाप्रकारच्या आणखी ३५ अनधिकृत इमारती बांधण्यात आल्याचे महापालिकेच्या निदर्शनास आले आहे. ही बांधकामेही याच कारवाई अंतर्गत पुढील काही दिवसांमध्ये ही कारवाई करण्यात येतील, असे महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात येत आहे.