
मुंबई: ऑपरेशन सिंदूर नंतर भारत पाकिस्तानदारम्यान वाढलेल्या तणावाने आता युद्धाचे स्वरूप धारण केले आहे. याच पार्श्वभूमीवर देशातील अनेक महत्वाच्या शहरांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. दरम्यान मुंबईच्या साकीनाका येथील विमानतळाजवळ एक अज्ञात ड्रोन दिसून आला. युद्धाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत दिसलेल्या या ड्रोनमुळे संबंधित परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच, सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून अज्ञात ड्रोनचा शोध घेतला जात आहे.
भारत-पाकिस्तान तणावाच्या दरम्यान, साकीनाका विमानतळाजवळ ड्रोन दिसल्याची बातमी मिळताच सुरक्षा यंत्रणांनी तातडीने कारवाई केली. पोलिस ड्रोनचा शोध घेत आहेत. सहार विमानतळाने मुंबई पोलिस नियंत्रण कक्षाला याबाबत माहिती दिली होती. यानंतर पोलिसांनी परिसरात शोध सुरू केला. पण अद्याप पोलिसांना काहीही संशयास्पद आढळलेले नाही. हजरत जयब जलाल (गैबान शाह दर्गा) मशीद मुंबईतील साकीनाका पोलिस स्टेशनजवळ आहे. तिथल्या एका खाजगी सुरक्षा रक्षकाने ड्रोन पाहिल्याची तक्रार केली. त्याने सांगितले की काही वेळाने ड्रोन जवळच्या झोपडपट्टीत गेला.
साकीनाका परिसर सहार विमानतळाजवळ आहे. त्यामुळे ही ठिकाण अतिशय संवेदनशील मानले जाते. येथे पोलिस आणि सीआयएसएफ (केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल) चे जवान नेहमीच तैनात असतात. त्यांनी मात्र ड्रोन पाहिला नसल्याची माहिती दिली. तरीही मुंबई पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिसांनी लोकांना अफवांकडे लक्ष देऊ नका असे आवाहन केले आहे.
शोध मोहिमेला सुरुवात
ड्रोन दिसल्याचा फोन करणाऱ्याशी पोलीस बोलले आणि त्याला ड्रोनचे फोटो किंवा व्हिडिओ काढण्यास सांगितले. तसेच, पोलिसांनी ड्रोन शोधण्यासाठी परिसरात शोध मोहीम राबवली. विशेषतः साकीनाका परिसरातील झोपडपट्टी भागात ड्रोन दिसला. ड्रोनबाबत तातडीने कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत. दोन पोलिस उपनिरीक्षक त्यांच्या पथकासह परिसरात शोध घेत आहेत.
समुद्र किनाऱ्यावर गस्त वाढवली, 'सागर कवच' मोहीमेला सुरुवात
मुंबई पोलिस आणि भारतीय तटरक्षक दल समुद्रकिनारे, बंदरे, गोदी आणि सागरी मार्गांवर संयुक्तपणे गस्त घालत आहेत. संवेदनशील भागांवर सीसीटीव्ही कॅमेरे आणि ड्रोनद्वारे लक्ष ठेवले जात आहे. भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, मुंबई पोलिसांनी 'सागर कवच' नावाचे एक मोठे तटरक्षक दलाचे ऑपरेशन सुरू केले आहे.
मच्छिमारांना इशारा
मुंबईच्या किनारी भागात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मच्छिमारांना सतर्क राहण्यास आणि बोटींच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यास सांगण्यात आले आहे. समुद्रमार्गे कोणीही शहरात प्रवेश करू नये याची काळजी घेतली जात आहे. त्यामुळे मच्छिमारांच्या बोटींच्या मार्गांवर काटेकोरपणे लक्ष ठेवले जात आहे.